श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ प्रतिमेच्या पलिकडले : काय भुललासी वरलिया रंगा… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

“साहेब रागावणार नसाल तर एक सांगु का तुमास्नी ! ह्यो तुमच्या पायातल्या बुटाची जोडी बघा अस्सल चामड्याची हायं बघा… त्येला नुसतं साधं पालीस करत जा..ते जेव्हढं नरम राहिलं तेवढा बुट चांगला टिकंल नि चालताना पायाला बी लै आराम वाटंल… ते चमकणारं पालीस याला बिलकुल वापरू नगा… ते काय वरच्या वर चमकत राहतयं त्येचं काय खरं नस्तया…म्या बी साधंच पालीस करून देतू.. चालंल नव्हं तुमास्नी?.. “

.. ” मालक , पण तो बुट आधीच तसला, त्यातं तुम्ही त्याला साधं पालीस करायला सांगताय… मग तो चमकदार दिसणार कधी? चारचौघात माझी इमेज उठून कशी दिसेल? मालक तुमचा तो पूर्वीचा जमाना गेला, आता सारं काही दिसण्यावर जगरहाटी चाललेय !.. फॅशनबाज कपडा, चेहऱ्याला रंगरंगोटीचा मुलामा, डोक्यावरचे केसांचं कलप केलेलं टोपलं, डोळ्यावर काळा निळा चष्माची झापडं नि पायात भारी किंमतीचे ब्रॅंडेड बुट असा जामानिमा असल्याशिवाय माणूस जगात आपली छाप उमटवू शकत नाही… असा जो नाही तो आजच्या जमान्यात पुवर चॅप, मागासलेला ठरतो.. कुणीच त्याला विचारत नाही.. मग त्याची उपासमार होणार कि नाही… मालक एक वेळ घरात जेवायला नसलं तरी चालतं पण माणसानं दिसायला अगदी भारी असलं पाहिजे..आणि तुम्हाला कसं काय कळलं या बुटाचं चामडं अस्सल आहे ते? “

“साहेब तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे.. आजचा जमाना वरच्या दिखाव्यालाच भुलतो बघा.. त्याला आतला माणूस ओळखता येत नाही…दिखाव्यातचं सारं आयुष्य घालवून आपून काय मिळविलं तर मोठं शुन्य…उगा आपला खायला कार नि भुईला भार होऊन राहण्यात काय मतलब… काही विचारानं चाललं आचारानं वागलं तरचं आपल्या बरोबर समाजाचं बी भलं होईल.. ते जिणं बघा कसं सोन्यावाणी चमचमणारं असतयं… अन जे चमकतयं ते समधं सोनं कुठं असतया… हि ओळखण्याची पारख माणसात असायला हवी… तुमच्या पायातला बुटाचा जोड हा अस्सल चामड्याचा आहे हे म्या वळखणार नाही तर कोण वळखणार ..  तिथं पाहिजे जातीचे ते येरागबाळयाचं काम नोहे… आणि अस्सल असतं तेची किंमत असते… त्येला बाहेरची कशाची जोड लागत नसते.. माणूस दिसायला साधा असला तरी विचारानं  भारी असल्यावर चारचौघात चमकल्याबिगर राहत नसतो… ते चोखोबा  सांगुन गेलं नव्हं का…… 

“ काय भुललासी वरलिया रंगा… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments