श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

किरण शलाका… ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

आज मलाही वाटलं  नभातून खाली उतरून यावे. तुझे चरण स्पर्शाने पवित्र व्हावे.. नेहमीच तुझ्या अवतीभवती असतो लता तरूंचा घनदाट काबिला,  श्वापदांच्या पदभाराने  त्या भुईवरची पिकली पानांचा नाद कुरकुरला..विविध रानफुलं नि पर्णांच्या  गंधाचा परिमळाचा अत्तराचा फाया कुंद हवेत दाटून बसला..पान झावळी अंधाराच्या कनातीत सुस्त पहुडलेला असतो धुक्याचा तंबू.. गगनाला भेदणारे इथे आहेत एकापेक्षा एक उंच च्या उंच बांबू.. विहंग आळवती सूर संगिताचे आपल्या मधूर कंठातून शाखा शाखा  पल्लवात दडून..दवबिंदुचे थेंब थेंब ओघळती टपटप नादाची साथ साधती  त्यासंगितातून…  तुझे ते वरचे शेंड्याचे टोक बघायला  रोजच मिळत असते मजला.. किती उंच असशील याचा अंदाज ना बाहेरून  समजला… नभ स्पर्श करण्याची तुझी ती महत्त्वकांक्षा पाहून मी देखील निश्चय केला आपणही जावे तुझ्या भेटीला आणि व्हावे नतमस्तक तुझ्या पुढे… सोनसळीच्या किरणाचे तुझ्या पायतळी घालावे सडे…अबब काय ही तुझी ताडमाड उंची..त्यावर काळाकुट्ट अंधाराची डोक्यावरची कुंची..किती थंडगार काळोखाचा अजगर वेटोळे घालूनी बसलाय तुला.अवतीभवती तुझ्या हिरव्या पिवळ्या पानांफुलाचा पडलाय पालापाचोळा.. कुठला दिवस नि कुठली रात्र याचे भान असे का तुला.जागं आणण्यासाठी रोजच यावे तुझ्या भेटीला  वाटे मजला.बघ चालेल का तुला? एक नवचैतन्य लाभेल मजमुळे तुजला..? प्रसन्नतेची हिरवाई हरखेल नि हसवेल तुझ्या भवतालाला.. पिटाळून लावेल तुझ्या उदासीपणाला.. मग बघ असा मी रोजच येत जाईन चालेल का तुला?.

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments