श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “पैश्याचं झाडं…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
राम्या! रग्गड झाली बाबा तुझी शाळासुळा… आरं शाळंत जातुयास कि रोज रोज नवा नव्या खर्चानं बापाच्या सदऱ्याचा खिसाचं फाडतूयासं… आज का म्हनं नवीन वही पायजेल, उदयाला नविन कसलसं पुस्ताकं.. कंपास पेटी, पेन्सल, पट्टी , रबरं, ह्याचं रोजचं विकात घेणं असतयाचं.. काव आला बाबा तुझ्या शाळा शिकण्याचा… आरं लेका शाळतं काय दुसरं शिकवित्यात कि न्हाई.. का नुसतं उगी आज ते आना आनि हे आना एव्हढ्यावरचं शाळा चालली व्हयं… ते बी शाळा सुरू व्हायच्या टायमाला योकदाच काय ते भाराभर घेऊन दिल्यालं असतानं पुन्हा पुन्हा कसली हि पिरपिर चालूच असती.. कवा संपायची रं हि रटरट.. इथं दिवसरात घाम गाळवा तवा कुठं घराचा खुटाना चालतूया… पैश्याचं झाडं अगदी दारात लावलेलं असल्यागत..मागन्याचं भूत कायमचं मानेवरचं बसल्यालं..खाली उतराया मागना व्हयं…काय गरज लागली कि तोड चारपाच पैश्याची पानं भागीव तुझी नडं असं सांगायला येतयं व्हयं… कष्टाबिगर पैका उगवत न्हाई.. आमच्या सारखं ढोर मेहनतीचं काम तुला पुढं करायला लागु नये म्हनुशान दोन चार बुकं शिकलास तर कुठं बी चाकरी करून चार घास सुखानं खाशिला.. म्हनुन ह्यो शाळंचा आटापिटा करायला गेलो तर गळ्यात हि नसस्ती पीडाच पडलीया बघं.. जरा म्हनुन दम खावा इळभर तर तुझ्या शाळंचा एकेक नव्या खर्चाचा वारू चौखूर उधळलेल्या.. आम्ही बी शाळंत गेलो व्हतो.. एक दगडी काळी पाटी नि पेन्सल यावरच शिकलो शाळा सुटं पर्यंत.. कधी वही लागाया न्हाई तर कधी पुस्तकाचं नावं न्हाई.. सगळं घोकंपट्टीचा आभ्यास हुता… आजबी समधं हाताच्या बोटावर नि तोंडावर सगळं आपसूकच येतयं… नि तुमचं टकुऱ्यात तर शिरतं न्हाई पन डझनावारी वह्याचीं रद्दी वाढत जाती… आन तु एकला असतास तरी बी काय बी न कसंबी चालवून घेतलं असतं पर एकाला सोडून तुम्ही चार पाच असताना माझा कसा टिकावं लागावा रं.. एक मिळविनार आनि पाचसहा तोंड खानार..समध्यास्नी लिवता वाचता आलं म्हंजे माप रग्गड झालं… तू थोरला हाईस तवा झाली एव्हढी शाळा लै झाली.. आता कामाधंद्याचं बघुया.. अरं बाबा बाकी सगळी सोंग करता येत्यात पन पैश्याचं सोंग न्हाई आनता येत… आनि त्याचं झाडं बी कुठं लागलेलं नसतयं.. हे तुला आता कळायचं न्हाई.. तू बाप झाला म्हंजी तवा समधं कळंल…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈