श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ कागदी होडी ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆

बालपणातला पाण्यात  कागदाची होडी करून सोडणे हा खेळ खेळण्यातला आनंद काही औरच असतो नाही…पूर्वापार हा खेळ चालत आलेला आहे… अरे पाण्यात जाऊ नका भिजायला होईल, सर्दी पडसं होईल असा काळजीपोटी घरच्यांच्या रागवण्याला अक्षतांच्या वाटाण्या लावून हा खेळ खेळण्याची मजा लुटणे हा तर बालकांचा नाद खुळा असतो. बालकांचं कशाला तुम्हा आम्हा मोठ्या माणसांना देखील अजूनही त्यात गंमतच वाटत असतेच की… पाण्याच्या प्रवाहात आपली कागदी बोट अलगदपणे सोडताना किती काळजी घेत असतो, कधी ती पटकन वाहत वाहत पुढे पुढे जाते तर कधी सुरुवातीलाच पाण्यात  आडवी होते भिजते मग काही केल्या ती सरळ होतच नाही ती तशीच पुढे पुढे वाहत जाते.. मन जरा खट्टू होतं..पण चेहऱ्यावर उमलणारा तो आनंद मात्र शब्दातीत असतो… कधी एकट्याने तर कधी मित्र मैत्रिणींच्या सोबत हा खेळ खेळायला जास्त मजा येते… माझी पहिली तुझी दुसरी, त्याची मागेच राहिली तर अजून कुणाची वाटेत अडकली.. नकळतपणे स्पर्धेचं स्वरूप येते.. वेळंचं भान हरपून   खेळात मग्न झालेले मन सगळं विसरायला लावतं.. शाळेची वेळ आणि हा खेळ एकमेकांशी घटट नातं असलेला असतो… अभ्यास नको पण खेळ मात्र हवा अशी  मुलं मुली अगदी बिनधास्तपणे हा खेळ खेळण्यासाठी मागेपुढे पाहत नाही… मग कुणी आई ताई दादा बाबा तिथं येऊन पाठीत धपाटे घालून ओढून नेतात. तेव्हा मात्र मान वेळावून सारखं सारखं पुढे पुढे जाणाऱ्या त्या होडी कडे मन आणि लक्ष खिळलेले असतं.. विरस मनाला होडीचा क्षणैक आनंद पुढे बसणारा  मार नुसता झेलत राहतो.. 

.. खरंतर या खेळातच आपल्या जीवनाचं सारं दडलंय असावं असं मला वाटतं.. प्रवाहात आपली जीवननौका अशीच जात असते… आपण काळजी कितीही घेतली तरी वाटेतल्या प्रवाहात अनेक अडथळे, भोवरे यांना पार करून आपल्याला आपल्या इप्सिताचा किनारा गाठायचा असतो ते ही आनंदाने… हेच तर तो खेळ सुचवत असतो… पण अजाण वयात निखळ आनंदा पुढे हे कळणार कसे… आणि मोठे होते तेव्हा हा आनंदाला विसरणे कधीही शक्य होणार नसते… बालपणीचा काळ सुखाचा आठवतो घडी घडी… पाण्यासंगे पुढे चालली माझीच ती होडी होडी… 

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470.

ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments