श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“आप की ऩजरो ने समझा…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

… अलिकडे अलिकडे  रिक्त हस्ताने रात्र माझ्या दारी अवतरते… उदासीचा घनघोर काळा अंधार बसतो पहाऱ्याला.. अन रात्रभर दार सताड  उघडेच असते… कुणी येईल याची आतुरतेने वाट पाहात राहते… निराशा पदरी पडते पण कुणाचेही पाय इकडे वळत नाहीत… आलेली रिक्त रात्र मग सकाळ होताच तशीच निघून जाते दारातूनच.. उसासे भरून.. सगळया मोहल्यात तर दररोज संध्याकाळपासून दिव्यांची रोषणाई उजळून टाकत असते रंगीबेरंगी दारं, खिडक्या आणि भिंतीनां… अप्सरांचे मुखवटे दारी, सज्जात घुटमळत असतात मुरकत, भुवया उडवत, कंबर लचकत आपल्या नव्या नव्या सावजाच्या प्रतिक्षेत… साज शृंगाराने नटलेले शरीर, अत्तराचा घमघमाट, मोगऱ्याच्या गजऱ्याचा नाजूक सुकोमल फुलांचा पसरलेला सुगंध सारा माहोल धुंद करून सोडलेला असतो.. सुंगधी केवड्याच्या बनात नागीण लपून बसते तशी इश्काच्या माशुकी सळसळत राहतात आपल्या हवेलीत, हवेलीच्या वाटेवर… रात्र गडद होत जाते तशी हळुहळू इश्काचे माशुक येतात चोर पावलांनी दबकत दबकत… आपल्या मनाच्या

दुखऱ्या जखमेवर प्यारीचा हळवा कोपरा शोधत… व्यवहाराच्या सौद्या नुसार प्रेमाची देवाणघेवाण  इथं रात्रभर चालते… घडी घडीला दार खिडक्यांची उघड मीट होत राहते… डोळयांची उघडझाप व्हावी तशी… भिडू बदलत गेला तरी पण  आतली प्रीतीचा खेळ  मात्र उत्तरोतर रंगत रंगत जातो… लखलखाटात प्रेमाचा मिना बाजार रात्रभर  झळाळून निघत असतो इथं… पोटाच्या वितभर खळगी साठी, परिस्थितीच्या दुर्दैवी वरवंट्याखाली चेपून चिपाडं झालेली शरीरं नि मेलेली मनं घेऊन माशुकीं  हतबलतेने उसने हासू चेहऱ्यावर दाखवत आयुष्यातली आपली एकेक रात्र कमी कमी करत जातात… थकलेलं शरीर, मरगळलेलं मन, चुरगाळलेल्या चादरी, काळवंडून सुकुन कोमजलेल्या मोगऱ्याच्या कळ्यांच्या बाजेवर सैलावून पडतं… त्राणं नसलेलं आंबलेलं  शरीर दिवस तसाच लोळून काढतं… दोरीवर टाकलेले विरलेले, डागळलेले कपडे लोंबत असतात विस्कटलेल्या मनाच्या चिंध्या चिंध्या झाल्यासारख्या… मग पुन्हा संध्याकाळ झाली कि बेगडी प्रेमाची झुल अंगावर पांघरून घेतली जाते… अंगावरील वस्त्राच्या धागे सुटलेल्या कलाबुताचे दिव्याच्या उजेडात क्षीणपणे चमकताना दिसतात..

… मी ही त्यांच्यांतील एक… पोरसवदा वयात फसलेली.. नशिबाच्या फेऱ्यात अडकलेली… घरादाराने, समाजाने कलंकित म्हणून लाथाडलेली या वस्तीत कधी कशी आले काही कळलेच नाही… त्या सगळ्या लपंट देहातील.. वखवखून उसळून आलेली वासनाने शेवटी चांदनी बाजारापर्यंत आणून सोडले…. समज आली पण त्या मागचं गांभिर्य लक्षात येणारं वयं कधी आलचं नाही…. निराधाराला आधार अमिनाबाईची हवेली…. नजरेची जरब असणारी अमिनाबाई… वसुलीची पक्की…. कुठल्याही पुरूषात गुंतून पडायचं नाही हा एकमेव नियम मात्र कटाक्षाने पाळण्यास सांगितला जाई… दावणीला बांधलेल्या माजाला आलेल्या बैलांच्या  नाकात वेसणीचा रज्जू असतो तसा हवेलीची मोहर उजव्या हातावर ठसठशीतपणे गोंदवलेली असल्याने तिथून बाहेर पडण्याचा मार्ग कायमचा बंद केलेला… असं असतानाही.. असचं एका रात्री बऱ्याच उशीराने त्याचं येणं झालं होतं.. ओळखी नंतर  त्याचं येणं मग सुरूच झालं…. अमरप्रेममधील नायका सारखा… घरच्या स्त्री कडून झिडकारला गेलेला… प्रेमाचा भुकेला… आणि मी… नकळत त्याच्यात गुंतून गेलेली… या नरकातून माझी सुटका तोच करेल या आशेवर विसंबलेली… माझ्या मनीचे गुज ओळखले त्यानें आणि   लवकरच येथून बाहेर घेऊन जाईन असा विश्वास दिला… या नरकातून फक्त मरणच सुटका करतं हेच सत्य असतं आणि बाकी सगळचं झुट असतं… हे मानायला नादावलेलं मन कुठे तयार असतं… अचानकपणे हळूहळू त्याचं येणं कमी कमी होतं जातं… खोट्या कारणांची ढाल तो पुढे करत राहतो… त्याचा उधवस्त होणारा संसाराच्या मोहात तो अडकून पडतो.. कमळात अडकलेल्या भुंग्यासारखा.. आणि येणं बंद होतं  काहीही न कळवता सवरता… आशाळभूतपणे रोजची रात्र त्याचीच वाट पाहण्यात जाते… आज तो नक्की येईल.. पण तो त्यानंतर कधीच फिरकला नाही…

नेहमी सारख्या बाकीच्या आपआपल्या कोठीत दार बंद करून राहिल्या….. मला कुणी भेटलचं नाही त्या रात्री… वाटलं आजची रात्र आपल्याला फाके पडणार आणि त्यात  अमिनाबाई चे गाली गलौच ऐकून घ्यावे लागणार ते वेगळे… रात्रभर तारवटलेले दिवे  वाट पाहत राहीले, पहाटेला चला उशिराने का होईना पण आता तरी प्रकाश मिटून पडून राहता येईल. म्हणून… पण तसं काही झालं नाही… आता आता माझे डोळे सुद्धा भरून वाहणे विसरून गेलेत… आणि आणि… अलिकडे अलिकडे  रिक्त हस्ताने रात्र माझ्या दारी अवतरते… उदासीचा घनघोर काळा अंधार बसतो पहाऱ्याला.. अन रात्रभर दार सताड  उघडेच असते… कुणी येईल याची आतुरतेने वाट पाहात राहते… शमा जलती रही परवाने कि आने कि पैगाम पर… निराशा पदरी पडते पण कुणाचेही पाय इकडे वळत नाहीत… आलेली रिक्त रात्र मग सकाळ होताच तशीच निघून जाते दारातूनच  गुणगुणत… जी हमे मंजूर है आपका ये फैस़ला…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments