श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“खडाष्टक…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

आता तुला सांगायची काही काही सोय राहिली नाही… आम्हीपण एकेकाळी सासुरवाशीण होतो पण हि ही असली थेरं काही आम्ही कधीच केली नाहीत… बाळबोध वळण आणि  पारंपारिक संस्काराचे माहेरचं लेणं घेऊन हिथं सासरी आले… सासु सासऱ्यांचे नि वडीलधाऱ्यांचे शब्द कधी खाली पडू नाही दिले… ना कधी मी माझ्या माहेरच्या घराण्याचं नाव बद्दू केलं… सासरच्या लोकांनी डोळ्यात तेल घालून माझी कुसळाएव्हढी चुक कुठे सापडते का जंग जंग शोधून पाहिलं… मी पण काही कच्चा गुरूची चेली नव्हती सगळ्यांनाच पुरून उरली होते… तेव्हा कुठे माझा या घरात टिकाव लागला.. मग घरच्यांनाही लक्षात आल्यावर माझा नाद सोडून दिला… तिथून पुढे या घरात माझा शब्दाला दिला जाऊ लागला मान… मी म्हणेल ते आणि म्हणेन तेच होऊ लागले प्रमाण.. प्रत्येक गोष्ट माझ्या संमती शिवाय इथली घडत नाही… अगदी माझ्या बाळ्याचं तुझ्याबरोबर लग्न करण्याचा शिक्कामोर्तब सुध्दा मी केल्यानंतरच झालंयं बरं… या घरासाठी कितीतरी खस्ता मी खाल्ल्या आहेत… तेव्हा आता कुठे हे चार दिवस सुखाचे दिसताएत… हे डोक्यावरचे केस उगाच पांढरे नाही झाले..लांबसडक केस गळत झडत बारीक झाले ते काही अंबाडा बांधण्यासाठी कापून नाही घेतले… ठसठशीत लाल कुंकुवाचा टिळा कपाळी रेखिला ते सौभाग्य माझे धडाडीचे ठणठणीत आहे म्हणून…चांगले मिनाक्षी सारखे डोळे होते पहिल्यांदा जेव्हा मी घरी इथे आले.. सगळ्यांवर जरब बसवता बसवता त्याच्या खाचा झाल्या आणि सोडावाॅटर काचेच्या चष्मा नाकी बसला…देहाच्या कुडीला शोभेल अशी कानातली कुडी नि नापसंतीचा नाकाचा मुरका मारताना चमकणारी नथीची जोडी.. कधी बाळे वेगळी केलीच नाही… घसघशीत तासाच्या वाटीचे सोन्याचे लखलखीत मंगळसूळत्राने गळा शोभून दिसतो..सौभाग्यवतीचा अलंकार तो इतर डागांना लाजवतो…भुंड्या हाताने कधी घरभरच काय पण बाहेर सुद्धा पडले नाही.. कांकणाची किणकिण वाजवी सुवासिनीचा हिरवा चुडा… अंगभर स्वच्छ, नीटनेटके वस्त्रप्रावरणे लेवेलेलाच पाहिला प्रत्येकाने आमचा उभयतांचा जोडा… अहो ऐकलतं का…. मी काय म्हणत होते अशी दबकत हळु आवाजात बोलणं होत असे आमचं… सुनबाईचं बोलणं म्हणजे सोळा आणे तोळा  असं कौतुक सासु सासऱ्या कडून व्हायचं…घराला लावली चांगली शिस्त त्यामुळे आलय़ उजागिरीला… सासुचा नि सासऱ्यांच्या मनी विश्वास तो दुणावला… सुनबाई आता आमची काळजी मिटली…आमच्या माघारी आता तूच या घराण्याची परंपरा पुढे चालू ठेवशील यात आम्हाला संदेह नाही…नातसून बघणं काही आम्हाला शक्यच होईल असं वाटत नाही… ती आता तुझी जबाबदारी चांगली पार पाडशील हि आहे आम्हला खात्री…

 

पण पण कसचं कायं.. बरं झाले माझे सासु सासरे मागे नाही राहिले… नाहीतर तुला असे पाहून त्यांच्या जिवाला नुसता एकेक घोर असते लागले .. माझं मेलीचं नशिबच फुटकं.. आमच्या बाळ्याचं बाशिंगबळच हलकं… एकतरी कौतुकाचा गुण हवा होता गं तुझ्यात… तुझं असं मोकळं ढाकळं वागणं पाहून कळ जाते माझ्या मस्तकात… काय ती तुझी एकेक थेरं… किती किती सांगून पाहिलं बाईच्या जातीला  हे शोभत नाही बरं… केस मोकळे सोडले हडळी सारखे काय म्हणे  केसांचं पोनिटेल मानेला जड होत नाही.. कान झाकले गेले असल्याने कुड्या, रिंगने कान ओघळत नाही..कानात हेडफोन सदैव अडकलेले… इतरांचे बाहेरील बोलणे म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेणे..कधी कुणाचं ऐकून घ्यायची सवयच नाही पहिल्या पासून… मी माझी राजी स्वतंत्र चालीची लाडावलेली कन्या माहेरा पासून…कपाळावर कुंकूच काय साधी टिकली पण तू लावत नाहीस… अन मला म्हणते जीनवर टिकली कुणी लावत नाही… गळयात काही नाही,हातातली कांकणं तर आता शोकेस मधे बसली हात झाले भुंडे,ना कपाळावर टिकली..साडीचा बोंगाळा आता ओल्ड फॅशन झाला… आणि  ठिक ठिकाणी फाटलेल्या जीन टाॅपने उघडे अंग दाखवण्याचा राजरोस स्टाॅलच उघडला…अरेला कारे नवऱ्याला चोविसतास करते…पुरे झालं आई तुमचं आता जमाना तो गेला.. मी पण नोकरी करुन चार पैसे मिळवते तर माझ्या डोक्याला शाॅट कशाला… तुमच्या आमच्या जमान्यात पडलय जमिन अस्मानाचं अंतर…  तुम्हाला पटलं तर राहते ईथे नाहीतर जवळ करते माहेर माझे निरंतर..रांधावाढा उष्टी काढा, संसाराचं लेंढार वाढवा हि पाॅलिसी जुनाट ठरली.. अब हम दो और हमारा एक ही करियर प्रणाली आली…आता सगळचं सारं बदलयं…त्याच्यशी आम्ही जुळवून घेतलयं.. तुम्हाला ते पटवून घेता येतयं का ते पहा… नाहीतर इथं कधीही या घरं आपलचं आहे असं म्हणायला भाग पाडू नका… 

अगं अगं सुनबाई डोक्यात अशी राख घालून घेऊ नकोस बाई… सुनबाई घर तुझचं आहे.. पण चार दिवस सासूचे आहेत  तिलाही तू हवी आहेस… वेगळं व्हायचं मला… हा विचार सुद्धा मनात आणू नको बरं… संध्या छाया कुणालाच चुकली नाही बरं…जोवर आहे कुडीत राम तोवर  जसं जमेल तसं घरकाम बघते … नाहीतर तूच उद्या सगळीकडे गवगवा करशील नवऱ्याची  आई कुठे काय करते? …

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments