श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“फसले गं बाई मी फसले…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

फसले गं बाई मी फसले… कायमची फसले…प्रेमविवाह का म्हणूनी केला… त्याच्या दिलेल्या शपथा, आणा भाका प्रीतीच्या अनुनायाच्या होत्या त्या सगळ्याच भुलथापा… कशी कळेना कुठल्या धुंदीत मी त्याला हो म्हणूनी बसले.. अन आता लग्नानंतर डोळे ते उघडले… होता तो आभास सारा  माझ्या मनी सत्यचं  भासला… पण वेळ गेल्यावर लक्षात आले… फसले गं बाई मी फसले… कायमची फसले… जानू तुला काय हवं ते मी दयायला तयार आहे… गाडी,बंगला, सोनं नाणं, नोकर चाकर, बॅंकेत बिग बॅलन्स.. सारं सारं काही तयार आहे…या खेरीज अजुन तुला काही हवं असेल तर हा चाकर आणायला एका पायावर उभा आहे.. अगदी आकाशीचा चंद्र, तारे हवे असल्यास ते सुद्धा मी तुझ्या ओंजळीत आणून टाकतो… पण पण.. आपण आता लग्न मात्र लवकरच करूया… माझ्या घरचे सारखे मला टोचत असतात  वश्या तुझ्या प्रितीचा मोहर तर कधीचा बहरलाय आता त्याला फळं कधी दिसणारं… आम्ही बाबा आता थकलोय बघ.. घरात आम्हाला निदान पाणी पिण्यास देणारी सुन लवकरच आण… या घराची घेउन टाकू दे सगळीच जबाबदारी एकदा म्हणजे आमच्या जिवाला स्वस्थता लाभेल आमच्या… असं त्याचं  त्यावेळी च्या भेटीत सारखं सारखं टुमणं असायचं… मग मीही मनांत म्हटलं.. नाहीतरी असं चोरुन चोरुन किती दिवस बाहेर भेटायचं.. कधीतरी त्याच्या अंतरंगात आणि आपल्या हक्काच्या घरात नि माणसात राजरोसपणे कधी राहयाचं.. विचार केला पक्का आणि माझ्या घरच्यांनीही त्यावर मारला होकाराचा शिक्का..एका क्षणात मी मिस ची मिसेस झाले आणी आणि..हवा भरलेले फुगे फुटत जावेत तसे नशिबाचे फुगे फुटू लागले… मी बरचं काही मिस केलेली मिसेस झालीयं असं लक्षात आलं… आणि याचा राग कधीतरी काढायचा असं मनाशी ठरवलं… होयं हो माझंही त्याच्यावर खरंखुरं प्रेम असल्यानं मलाही आता हे सारं निभावून नेणं भाग होतचं.. खऱ्या प्रेमाची किंमत मोजणं सुरू झालं होतं.. त्यालाही कळावी  प्रेमात लबाडी केलेली किंमत  काय असते ती… शाॅंपिग माॅलच्या भरमसाठ खरेदीसाठी त्याचा खिसा पाकिटाचा, एटीएम चा खुर्दा सुफडा साफच करून टाकण्यासाठी.. खरेदीची बाडं ची बाडं दिली त्याच्याकडे सांगितलं  हे तुला निट सांभाळून घरी न्यायचं बरे…तु त्यावेळी मला दिलेल्या भुलथापांची शिक्षेचा हा ट्रेलरचं दाखवला आहे बरं… आता इथून पुढे मेन पिक्चर सुरु होईल आपल्या संसारात आणि तो खरा खराच असेल… आपल्या प्रिती मधे आता खोट्याला कधीच थारा नसेल… पाहिलासं का तो आकाशीचा चंद्र कसा हसतोय गालफुगवून लबाड पाहतोय आपल्या कडे कसं बनवलं तुला म्हणून चिडवतोय मला… मला तो चंद्र देखील हवायं तू मारे त्यावेळी म्हणाला होतास तुझ्यासाठी हवा तर आणून देतो मग आता का मागे सरकतोस… अरे बोलना काहीतरी मगापासून मीच बोलतेय आणि तु ढिम्मच आहेस कि.. जानु माझ्यावर रागावलास..

.. नाही जानु तुझ्यावर आता रागावणार नाहीच मुळी… रागावलोय फक्त मी माझ्यावर.. त्यावेळी काहीही करून तुला लग्न करून घरी आणायची हाच उद्देश होता माझ्यापुढे.. म्हणून तुला बोलून दाखवत होते आभासाचे पाढे… त्यावेळी मी बोलत होतो नि तू ऐकत होतीस.. सारं काही मनात साठवतं होतीस.. भावी जीवनाचं चित्रं पाहात होतीस… अगदी मनासारखं घडेल हेच तुला वाटतं असे… नशिबाने लग्न लवकरच झाले नि आणि चित्र सारे फिरले…भ्रभाचा भोपळा तो फुटला… आणि मला दिले बारा मुलूख तोफेच्या तोडांला… काय करतो बिचारा केलेल्या चुकांची किंमतच आहे एव्हढी जबरी चुकवता चुकवता आयुष्य येई जेरी…बोलून सांगू कुणाला… कळा या लागल्या जीवा… आता तू बोलतेस… बोलत राहतेस आणि मी फक्त ऐकण्याचचं काम करतो…भारवाही हमालं बनलोय..दाबून मुक्याचा मार सोसतोय… त्यावेळी दिलेल्या खोट्या नाट्या शपथा, आणा भाकांची किंमत आता आयुष्यभर मोजत बसणार… त्याला माझी ना कधीच असणार नाही… पण पण जानू आता तो आकाशीचा चंद्र काही माझ्या कडे मागू नकोस.. झाल्या या खरेदीलाच माझा सुफडा साफ झाला… खिशात आता दिडकीही शिल्लक उरली नाही गं… थोडसं ठेवं शिल्लक पुढच्या खेपेला… आधीच खांदा नि हात भाराने गेलेत अवघडू दुखायला… नि डोकं लागलयं गरगरायला… माझं काही म्हणणं नाही  हा बंदा गुलाम आहेच सदैव तुझ्या सेवेला… आणि आणि तो  तसाच हवा असेल तर… घरी गेल्यावर   तुझ्या नाजूक हाताने बाम चोळून देशील माझ्या   डोक्याला… जमलं तरं पहाशील.. तसं माझं आता तुझ्याकडे काहीचं मागणं… म्हणणं नाही.. तसचं काही नाही…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments