श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“आवाज दे कहाॅं है…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

..”अगं अल्के! तू मला काही विचारू नयेस आणि मी तुला सांगू नये अशी गत झाली आहे बाई अलिकडे माझी… आताच पाहते आहेस ना.. तुझ्या डोळ्यासमोरच त्यांचं काय चाललं आहे ते… अस्सं सारखं दिवसरात्र याचं पिणं चालूचं असतं घरात… जळ्ळा मेला काय तो करोना आला आणि तेव्हापासून माझ्या आयुष्याचं मातेरा करून गेला बघ… त्यावेळेपासून याचं वर्क फ्राॅम होम जे सुरू झालयं ना तेव्हा चोवीस तास त्या लॅपटॉपमध्ये डोकं खुपसून बसतात.. सारखा सारखा दहा दहा मिनिटाला चहाची ऑर्डर सोडत असतात… घर नाही तर कॅन्टीनच करून ठेवलयं त्यांनी.. आणि मला सारखी दावणीला जुंपून ठेवलीय त्यांनी… हक्काची बायको आहे मी त्यांची पण पगारदार मोलकरणीसारखी नाचवत असतात हरकामाला…पूर्वी ऑफिसला जात होते तेव्हा बरं होतं बाई.. आठवड्यातून एकदा सुट्टीच्या वेळेला काय तो  पिटृटा पडायचा.. पण आता हा माणूस चौविसतास घरात असतो त्यानं मला अगदी विट आलाय बघ… बाईच्या जातीला थोडा आराम, मनासारखं काही करु म्हटलं तर कसली सोय उरली नाही… हौसमौज तर केव्हाच केराच्या टोपलीत गेली… मगं अती  झालं नि हळूहळू आमच्यात तू तू मै मै सुरू झालं…घरं दोघाचं आहे.. जबाबदारी दोघांनी सारखी घेतली पाहिजे असं सगळ्याची समसमान वाटणी करुन घेऊया म्हटलं तर मला म्हणाले , मी इथं असलो तरी ऑफिसात असल्यासारखेच आहे असं समज.. जसा ऑफिसला जात होतो.. उशीराने घरी येत होतो कधी कधी पार्टी करून येत होतो अगदी तसचं वागलं तर मला ऑफिसात काम केल्याचा फिल येईल… त्यावेळी लाॅकडाऊन असल्याने बाहेर जाऊन असले काही थेरं करता येत नव्हती पण जसं लाॅकडाऊन बंद झालं पण ऑफिसने मात्र काॅस्टकटिंगच्या नावाखाली ऑफिसची जागाच विकून टाकली आणि सगळयांनाच  वर्क फ्राॅम होम सुरू करायला काय सांगितले… तेव्हा पासून रोजची यांची संध्याकाळ एका पेगने सुरू झाली… आणि हळूहळू हळूहळू आता  खंबा पर्यंत   पोहचली बघं.. मग कसली शुद्ध राहतेय… रात्रभर पेगवर पेग ढोसणं तोंडी लावायला चणेफुटाणे कधी काही.. आणि मग तर्र झालं कि तसचं लुढकणं.. सकाळी उशिरापर्यंत झोपणं.. हॅंगहोवर झाला कि तोंडाचा पट्टा सुरू करणं कि परत उतारा म्हणून पेग घेणं.. चढत्या क्रमानं वाढतं जातं… तरी बरं घरात आम्ही दोघचं असतो.. मुलबाळं, मोठं कुणी असतं तर शोभायात्राच निघाली असती… अलिकडे या बेसुमार नि बेताल पिण्या पुढे बायको देखील त्यांना ओळखेनाशी होते बऱ्याच वेळेला..कधी कधी अति पिणं झाल्यावर मलाच डोळा मारून सांगतात जानू चल माझ्याघरी… आय लव्ह यू व्हेरी व्हेरी मच… ती घरवाली नुसती कामवाली झालीयं.. तिच्यात तुझ्यासारखा काही चार्म राहिला नाही… असं बरळत असतात… आणि पुढे कुठेतरी सोफ्यावर पडून जातात… असं हे रोजचचं चाललंय बघं… माझा आयुष्याचा तमाशाच झालायं… सुदैव इतकं कि त्यांची नोकरी अजून शाबूत आहे… म्हणून घरं तरी चालतयं.. पण किराणाच्या बिलापेक्षा बाटलीचं बिलं कैकपटीने जास्त येतेयं… बाटल्यांचा हा खच पडतो आठवड्याला… चुकून मागच्या आठवड्यात दोनचार बाटल्या कमी झाल्या असतील नसतील.. तर त्या दिवशी कचरेवाल्यानं विघारलं देखील बाईजी इस हप्ते बाटली बहुत कम दिखती है…साब ने पिना छोड दिया लगता है… अरे ऐसा हमरा नुकसान मत करो भाभी… ‘आता सांग काय म्हणू मी या दुर्देवाला…सगळं ऑनलाईन मिळतं असल्याने बाहेर कुणाला कसलीच शंका येत नाही बघ.. आणि सोसायटीत आता याचंच तेव्हढेच वर्क फ्राॅम होम असल्याने बाकी सगळे ऑफिसला बाहेर जातात…तसं घरीही कुणाचं येणं जाणही नसतचं मुळी..म्हणजे घरी याचचं राज्य..अख्खी सोसायटी यांच्या या सुखी माणसाबद्दल असुयेने बघतात… . आणि त्या शेजारच्या पाजारच्या साळकाया माळकाया तर मला बघून सारखं नाकं मुरडत असतात… काय नशिबं एकेकीचं.. सगळं काही सुपात नि सुखात देतो देव त्यांना नाहीतर आपलं बघा.. मेला हा जन्म नकोसा करून टाकलाय या संसाराने… अगं अल्के  तुला सांगते… दिसतं तसं नसतंच मुळीच.. जावं त्याच्या वंशा म्हणजे कळतील त्या यातना… अगं अल्के मला तर बाई घरी कुणाला बोलवायचं म्हटलं तरी अंगावर काटा येतो.. हा माणूस कधी कसा बरळेल काहीही सांगता येत नाही… तरी बरं जास्त पिणं झालं कि यांची जीभ जड होते समोरच्याला त्यांचं बोलणं स्पष्ट कळतं नाही तेच बरं… मला आता त्याची सवय झाली आहे.. त्यामुळे मला सगळं बोलणं कळतं… आता हेच बघ.. इतकं पिणं चाललयं तर मला डोळा मारून सांगतात कि त्या स्विटहार्ट चा मोबाईल नंबर  मला देशील काय? म्हणजे तुझा नंबर त्यांना हवा आहे… आता सांग मी हसावं कि रडावं यांच्या पुढे नि माझ्या नशिबापुढे… मला वाटतं तू फार वेळ थांबू नये.. तू आता निघालेलं बरं… माझं कायं रोज मरे त्याला कोण रडे… पण बरं वाटलं बऱ्याच दिवसांनी कोणीतरी माझी आपुलकीने चौकशी केली!…मोहर गळून गेलेल्या वसंत ऋतूतल्या आम्रवृक्षासारखं जिवन झालयं माझं!… कोकिळाच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत विराणी गात बसलेल्या कोकिळेसारखं!. “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments