श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “आत्मनिर्भर…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
… अजुन किती पैसे पैसै करतेस गं…पाकिट तर केव्हाच रिकामं करून झालं… शर्टाचे नि पॅंटचेही खिसे सगळे झाडून झाडून दाखवले… आता माझ्या जवळ एक दिडकी देखील शिल्लक ठेवली नाही… नोकरी धंद्याचा माणूस मी ,मलाही काही किरकोळ खर्च वगैरे रोज करावे लागतात कि … आणि तू तर मला कफ्फल्लकच करून सोडलसं… तरी बरं तुला महिन्याच्या पगाराचा नि त्यानंतर केलेल्या सततच्या मागणीनुसार दिलेल्या पैशाचा हिशोब कधीच मागितला नाही… आणि इनमिन दोघचं आपण नवरा बायको घरात राहत असताना एव्हढे भरमसाठ पैसै लागतातच कशाला.. त्यात माझं दिवसाचं जेवणखाण, चहापाणी तर बाहेरच्या बाहेर निपटत असतं…ती तुझी सतरा महिला मंडळ, अठरा भिशीची वर्तुळं, किटी पार्टीची महिला संमेलनं, साडी ड्रेसेचे सतराशेसाठ exhibitions…गेला बाजार माॅल मधील शाॅपिंग,अख्खं टाकसाळ जरी तुझ्या हाती दिलं तरी तुला ते कमीच पडेल… आणि आणि एव्हढी ढिगानं ढिग खरेदी करूनही कुठल्याही समारंभासाठी म्हणून नेसण्यासाठी एकही साडी तुझ्याकडे कधीच नसते…याबाबत तु कायम चिंतित राहतेस… मला ते दर वेळेला न चुकता ऐकवून दाखवतेस.. यावर मी काही आहेत त्या साड्यांमध्ये सुचवू पाहतो तेव्हा वसकन अंगावर येत म्हणतेस शी या कार्यक्रमाला असल्या साड्या काही उपयोगाच्या नाहीत.. त्याला ती तसलीच हवी… मागच्या वेळी माझी घ्यायची राहून गेली… आता ती साडी नसेल तर मला काही या कार्यक्रमला जायला लाज वाटेल बाई… म्हणजे थोडक्यात काय आली नवी खरेदी… मी आता असं करतो साड्यांच्या दुकानातच नोकरी करतो.. म्हणजे निदान तुला साड्यांचीं चिंता कधीच भेडसावणार नाही…
… तुम्ही सारखं सारखं माझ्या साडीवर काय घसरताय… तुम्हा पुरुषांना त्यातलं काय कळणार म्हणा… आणि तुम्ही दिवसभर ऑफिस मध्ये असता मग मी काय घरी बसून माश्या मारू… विरंगुळा म्हणून महिला मंडळ, भीशी क्लब, किटी पार्टी, यातून चार शहाण्या , हूशार बायकांच्या सहवासात काढते… कितीतरी नवी नवीन गोष्टी कळतात…आजं जगं कुठं चाललयं आणि आजची महिला कुठे आहे… याचं वास्तवातलं भान येतं… तो आपल्या केंद्र सरकारने केलेला महिला आत्मनिर्भर चा कायदा आता मला चांगलाच समजलाय बरं… सारखं सारखं उठसुठ तुमच्या कडून किती दिवस पैश्यासाठी याचना ती करावी म्हणतेय मी… मलाही वाटतं आता आपण आत्मनिर्भर व्हायला हवं… आणि आणि तुम्ही मला ते तसं होऊ देण्यास तयार असायलाचं हवं… नाही का?.. मग देताय ना दर महिन्याला माझे म्हणून खास आत्मनिर्भरतेचे पैसे…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –nandkumarpwader@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈