श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ ! नथ एक सौंदर्य आभुषण ! ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
पारंपरिक स्त्री अलंकार आभुषणात नथीचा थाट न्याराच असतो. आपल्या मराठमोळ्या संस्कृतीत विवाहच्या वेळी सालंकृत कन्यादान करतांना पायाच्या बोटातील जोडवी पासून डोक्यावरच्या बिंदीपर्यंत सर्व प्रकारच्या विविध नक्षी कलाबुतीने सजलेले अलंकार नि आभुषणाने नटलेली चि.सौ.का. आपण पाहात आलो आहोत. यात नाकातील नथ हा आगळा वेगळा आकाराने छोटेखानी पण तितकाच तो नाजूक नजाकतीने घडवलेला दागिना ,तो त्या स्त्रीच्या सौंदर्यात भरच घालतो. काही वेळा असाही प्रश्न पडतो की नथीमुळे सौंदर्य खुलले आहे कि मुळच्या स्त्री सौंदर्याने नथीची शोभा वाढली. थोडसं खट्याळ पणे बोलण्याची मुभा घेतली तर असं म्हणता येईल की नाक कसे का असेना… चपटं,नकटं,बसकं,बाकदार, धारदार, अपरं, चाफेकळी, वगैरे वगैरे….चेहऱ्याचा रंग कुठला का असेना…गौरवर्ण, गहूवर्ण,काळासावळा, ….पण नाकात ती अडकवलेली नथ मात्र तो चेहरा छान सजवून टाकतो…
नथीचा तो आकडा,एक सोनेरी तार आणि त्यात जडावलेले ते नाजूक लोभस मोती, हिरे,निलमणी,त्यांना एकमेकांना बांधून घेणारे ते छोटे छोटे लाल पिवळे मणी आणि सर्वात मेरु म्हणजे चमचम करणारा तो पाचुचा डाळिंबी वा हिरा म्हणजे क्या कहना ?…
स्त्रियांचा मुळात नटण्यामुरडण्या चा स्थायीभाव आहे. तशातच नाकातील नथीमुळे भर पडली नाही तरच नवल. मुरकणे म्हणजे काय असते स्त्रियांना सांगावे लागत नाही पण नाकातील नथीचा तो लडिवाळ मारलेला मुरका बघून ….
तसे बघायला गेलं तर नथीसाठी आधी नाक टोचून घेणं आवश्यक ठरतं.. नाजूक नजाकतीच्या सौंदर्याखाली सुद्धा एक वेदना दडलेली असते पण ती आनंददायी असते.. आता आजकाल चापाच्या सुद्धा नथ बाजारात उपलब्ध आहेत…नथीचं वजन हलकं असलेलं पाहिले जातं म्हणून तर नाकाला झेपेल इतकेच मोती, पाचूची जडणघडण बघतली जाते नाहीतर नाका पेक्षा मोती जड झाला तर नाक ओघळले म्हणून समजा…आणि ही म्हण रुढ झाली..
…तिकडे उत्तर भारतात नथीनी ,राजस्थान मेवाडात मोठ्या रिंगा असलेले नथीचे प्रकार प्रचलित आहेत…और क्या सौंदर्य खुल जाता है..?
…मला वाटतं आता नथ पुराणास पूर्ण विराम द्यावा .नाहीत तर तुम्ही म्हणाल एव्हढा नथीतुन तीर मारून आम्हाला नवीन ते काय सांगितले?…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470.
ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈