श्री नंदकुमार पंडित वडेर

? प्रतिमेच्या पलिकडले ?

“अशीच श्यामल वेळ..सख्या रे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

.”.. तुमची काही हरकत नसेल तर इथे या बाकड्यावर थोडावेळ बसावं म्हणतो.!”..

..”. मगं बसा की!.. माझी कसली हरकत आली आहे.?. या बागेतला बाक तर सार्वजनिक आहे… कोणीपण बसू शकतो त्याला हवा तेवढा वेळ… मात्र बाक आधीच पूर्ण भरलेला असेल तर मग बसायला मिळायचं नाही बरं… आणि मी तर या बाकावर एकटीच बसलेली आहे.. तसा बाकीचा बाक मोकळाच आहे की!… “

.”..  एक विचारु,मी तुम्हांला रोज या वेळेला इथं असचं या बाकावरं एकटचं बसलेलं पाहत आलेलो आहे… त्यावेळी मी मागे तिकडे झाडाजवळ  उभा राहून संध्याकाळची शोभा पाहता पाहता या शोभेकडे कसे डोळे खिळले जातात तेच कळेनासं होतं… अगदी अंधार पडू लागला की तुम्ही उठून जाईपर्यंत हि नजर मागे पर्यंत वळत जाते… “

.”.. माझा काय पाठलाग करत असता कीञ काय या वयात देखील?… शोभतं का तुम्हाला असलं वागणं.?.. आणि माझं नावं शोभा आहे हे कसं शोधून काढलतं तुम्ही?… हेरगिरी वगेरे नोकरीपेशा तर करत नव्हता ना रिटायर्ड होण्याआधी… “

.”.. वा तुम्ही सुद्धा कमी हुशार नाहीत बरं.!.. मी पूर्वी काय करत होतो हे बरोबर ओळखलतं… बायका मुळीच जात्या हुशार असतात हे काही खोटं नाही.!.. “

..”. तुम्हाला ही  बाग फार आवडते असं दिसतयं… नेहमी संध्याकाळी इथं जेव्हा येता तेव्हा माझी आणि तुमची येण्याची वेळ कशी अगदी ठरवल्याप्रमाणे  जुळते… “

.”.. मला देखील ते लक्षात आलयं बरं.!. पण मी काही ते चेहऱ्यावर माझ्या दाखवून दिलं नाही!… उगाच परक्या माणसाला गैरसमज व्हायचा… आणि आणि… “

…” आणि आणि काय.?.. “

“.. न.. नको.. नाहीच ते!.. काय बोलून दाखवयाचं ते!…तुम्हाला म्हणून  सांगते या बागेशी माझं नातं खूप खूप जुनं आहे… ही  संबंध बाग माझ्या ओळखीची आहे… इथं खाली तळ्याजवळ गणपतीचं सुंदर मंदिर आहे… संध्याकाळच्या वेळी आरतीला वाजणारी किण किण झांज तो घंटानाद ऐकू येतो तेव्हा आपलं मन तल्लीन होऊन जातं… अगदी स्वतःला विसरून जायला होतं… . पण सात वाजले कि बागेचा रखवालदार कर्कश शिट्या मारून सगळ्यांना बाहेर जायला भाग पडतो… आणि तसं घरी आईनं पण ताकीद केलेली असायची कुठल्याही परिस्थितीत संध्याकाळी सात च्या आत घरात आलचं पाहिजे म्हणून… मग त्या भीतीनं पावलं झपझप टाकत घरी जाणं व्हायचं… जी लग्नाच्या आधी शिस्त तिनं लावली ती लग्नानंतरही तशीच पाळली गेली… तेव्हा आई होती आता सासूबाई आहेत.. एव्हढाच फरक… “

“… बस्स एव्हढाच फरक.!. आणखी काही फरक पडलाच नाही!

… त्यावेळी कुणाची तरी वाट पाहणे होत असेलच की.. मग कधीतरी नेहमीपेक्षा जास्त उशीर झाला असणारं की.. आईची बोलणी खावी लागली असतील… चवथीच्या चंद्राची कोर खिडकीतून डोकावून बघत असताना… आईला संशय आला असेल…  मग घरच्यांना त्या चंद्राचा शोध लागला… आणि ही चंद्राची शोभेची पाठवणी केली असचं ना! “

… ” माझ्या देखील अशाच आठवणी आहेत… आणि इथं आल्यावर त्या एकेक उलगडत जातात…”

… ” काय सांगतायं अगदी सेम टू सेम… म्हणजे पाडगांवकर म्हणतात तसं प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आमचं सेम असतं.. अगदी तसचं की  हे…

बरं झालं बाई तुमची या निमित्ताने ओळख  झाली…अंधार पडायला लागला..आणि तो रखवालदार दुष्ट शिट्या मारतोय.. बाहेर निघा म्हणून… मग मी येऊ चंद्रशेखर… “

..” शोभा काय हे.. किती छान रंगला होता खेळ.. कशाला मधेच घाई केलीस खेळ थांबविण्याची.. .  तुझं नेहमीच असं असतं जरा म्हणून कल्पेनेत वावरायचं नाही.. सदानकदा वास्तवात राहणारी तू… “

” पूरे चंद्र शेखर.. घरी सुना नातवंड आहेत आपल्या.. त्यांना विसरून कसं चालेल… आपला आजचा खेळ परत उद्या यावेळेला पुढे सुरू करुया… “

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments