श्री नंदकुमार पंडित वडेर
प्रतिमेच्या पलिकडले
☆ “लाडकी बायको…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर ☆
.. वसुधा पुस बरं ते डोळे.. तुला असं रडताना पाहून मला खूप यातना होतात गं…खरंच मला खूप वाईट वाटतयं मी तुझ्याशी लग्न केल्यापासून नीट वागायला हवं होतं.. सतत तुला मी रागावत होतो, चिडत होतो..माझं तुला कधीच काहीही पटत नव्हतचं… त्यात तुझे माहेरचे ते सगळे दिड शहाणे माझ्यापासून काडीमोड घे म्हणून सांगत होते.. मी एव्हढा मानसिक त्रास देत असताना.. तरीही तू मला सोबत राहिलीस.. जे मी मिळवून आणत होतो त्यात तूच समाधानी राहत होतीस नि मला अर्धपोटी ठेवत होतीस.. काटकसरीचा संसाराचे धडे मला गिरवायला दिलेस पण तू मात्र ऐषआरामी दिवस काढलेस.. मला सारं दिसत होतं, कळत होतं.. पण मी त्यावरून तुला साधं काही न विचारता भांडण तंटा, वादविवाद करत राहिलो तुझ्याशी… तुम्ही माझी हौसमौज भागविणार नाही तर मग शेजारचे जोशी, मराठे येणार काय मला हवं नको विचारायला असं जेव्हा तू डोळयात पाणी आणून विचारत असायचीस तेव्हा माझी तळपायाची आग मस्तकात जायची… असं असूनही तुझं माझ्यावर खरं प्रेम करत राहिलीस?.. आणि मी शंका घेत घेत खंगत गेलो… अशक्त झालो.. माझ्या सेवा करण्याच्या नावाखाली तुझा चंगळवाद अधिकच फुलून येत होता… मी तुला एकदा चांगलेच धारेवर धरले देखिल.. पैसै काही झाडाला लागत नसतात गं.. निदान मिळकत पाहून तरी खर्च, उधळपट्टी करत जा म्हणून त्यावर तू फणकाऱ्यानं म्हणालीस.. तुमच्या पैश्याची मला आता गरजच नाही माझ्या खात्यात आता दरमहा 1500/रुपये लाडकी बहीण योजनेमार्फत जमा होत आहेत, शिवाय एस. टी. चं अर्ध तिकिटात माहेराला जाता येतेयं, शिलाई मशीन आता फुकटात घरी येणार आहे, मुलींच्या शाळेची फी माफ झाली आहे… वेळ पडलीच तर मी ब्युटी पार्लर चा छोटा व्यवसाय महिला स्टार्टअप मधून सुरू करेन.. आता नवऱ्याच्या मिजाशीवर जगण्याचे दिवस कधीच संपले.. तेव्हा तुम्ही आता तुमचं तेव्हढं बघा…. तुझ्या त्या सरकारला बरी या लाडक्या बहिणीची त्या बदमाष भावाची काळजी घेता आली.. आणि आम्ही नवऱ्यानं काय घोडं मारलं होतं त्या सरकारचं… आमच्याच पगारातून तो प्रोफेशनल टॅक्स, इन्कम टॅक्स, भरमसाठ कापून घेऊन, आयजीच्या जीवावर बायजी उदार झाल्याचा सरकार आव आणतयं अशी सरकारी योजना पाहून माझा संताप संताप झाला आहे… आता मी देखील सरकारनं लाडकी बायको हि योजना कधी आणतील याचीच वाट बघून राहिलो आहे… ती योजना आली कि मग मी पण तुझ्या मिजाशीवर, तालावर नाचायला पळभरही थांबणार नाही… मग बसं तू तुझ्या माहेरीच सगळ्या लाडक्या योजनांच्या राशीत लोळत… आणि मी आणि सरकारी योजनेतील लाडकी बायको घरी आणून तिच्या बरोबर सुखाने संसार सुरू करतो…
© नंदकुमार पंडित वडेर
विश्रामबाग, सांगली
मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈