सुश्री तृप्ती कुलकर्णी

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “पाऊस –गद्य जलचित्रं…” ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी 

सगळ्यांना एकाच रंगात रंगवणारा हा पाऊस आपला ‘ओला रंग’ किती तऱ्हेने उधळतो ते बघण्यासाठी शहरांमधला पाऊसही बघायला हवा. या ओल्या रंगाची एक गंमत म्हणजे हा ओला रंग प्रत्येकाचा निराळा असतो. ज्याच्या त्याच्या कोरडेपणाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारा. त्या ओल्या रंगाची मी पाहिलेली ही दृश्यं… एका अर्थाने माझ्यासाठी जलचित्रं !

जलचित्र १

एक तरुणी, छत्री घेऊन बसस्टॉपवरती उभी असते. तिच्या लाल भडक छत्रीवर पावसाचे पारदर्शी थेंब टपटप असा हलकासा गहिवरलेला आवाज करत पडत असतात. छत्रीवर पडल्यावर क्षण दोन क्षण ते थेंब तिच्याशी हितगुज करण्यात ‘रंगून’ जातात. आणि पुन्हा अलवारपणे तिला निरोप देतात, ते आपली ओलसर खूण तिच्यावर उमटवूनच. काहीसं लालसर रंगाचं बिंब सामावलेलं त्यांचं क्षणभराचं रूपडं गळून पडताना एखाद्या नाजूक फुलाची पाकळी गळून पडावी तसं मोहक दिसतं. त्या मोहक दृश्याकडे पहात असतानाच पुन्हा माझं लक्ष त्या तरुणीकडे जातं. 

जलचित्र २

भिजू नये म्हणून अंग चोरून उभ्या असलेल्या तिच्या मनात मात्र पावसाच्या धारा बरसत असाव्यात, असं ती ज्या मायेने ओल्या केसांवरून हात फिरवते ना त्यावरून वाटतं. ती वारंवार बस स्टॉपकडे कधी बस येईल या आशेने बघत असते. ही तिची आशा छत्रीच्या आत बाहेर चुळबुळ करणाऱ्या तिच्या पावलांवरून दिसते. तिच्या सॅंडलच्या आत पावसाचे थेंब काळ्या रंगाच्या पट्ट्यांशी हितगुज करत बसलेले दिसतात. पावलांच्या मागेपुढे होण्याने त्यातले काही थेंब घरंगळत जाऊन अंगठ्यावरती बसतात. तिथल्या नेलपॉलिशचा लाल रंग त्यांना  जास्त जवळचा वाटत असावा का…  का छत्री बद्दलचा जिव्हाळा असावा? कोण जाणे. 

निराशेने ती मनगटावरच्या घड्याळात डोकावते. त्यालाही पावसाची थोडीशी लागण झालेली असते. त्यावर दोन चार शिंतोडे उडालेले असतात. ते पाहून खांदा आणि मान यांच्या पकडीत छत्री तोलून धरून ते पावसाचे शिंतोडे ती आपल्या दुपट्ट्यानं हळुवारपणे पुसते. आणि हे करताना नकळत तिची छत्री थोडीशी कलते आणि ती तरूणी भिजते. मग पुन्हा एका हातात छत्री धरून दुसऱ्या हाताने आपलं डोकं पुसण्याची तिची केविलवाणी धडपड फसते. पावसाची धार तिला संधी मिळताच बिलगते. शेवटी अपरिहार्यतेने ती स्वतःला कोरडं ठेवण्याचा प्रयत्न सोडून देते. आणि आपली नजर पुन्हा बसस्टॉपवर वळवते. 

जलचित्र ३

आपसूकच माझं लक्षही मग पुन्हा बस स्टॉपकडे जातं. तोही तिच्यासारखाच शरणागत असतो. आपला स्थिर कोरडेपणा विरघळू देणारा… इतक्यात बस येते. ती देखील निथळतच असते. तिच्या टपावरून गळणारं पाणी जणू कुणीतरी अभिषेक करत असल्यासारखं एका धारेत, एका ओळीत पडत असतं. बंद खिडक्या स्वच्छ झालेल्या असतात. त्यावरून ओघळणारे पावसाचे थेंब स्वतःच स्वतःचं एक चित्र रेखाटत असतात‌. एरवी ज्यांच्याकडे बघितलं की धूर आणि काळोख याशिवाय काहीही दिसत नाही असे बसचे जाडजुड टायरसुद्धा न्हाऊमाखू घातलेल्या गुटगुटीत बाळासारखे स्वच्छ दिसतात. इतके की वाकून किंचित डोळे मोठे करून बघितलं तर त्यांचं नावसुद्धा दिसतं. या सगळ्या पार्श्वभूमीवर पायऱ्या मात्र मळकटलेल्या असतात. नितळतेचा असा हळवा स्पर्श त्यांना फारसा लाभत नाही. जरा स्वच्छता झाली की कोणीतरी आपला ठसा उमटवून जातंच. 

जलचित्र ४ 

बस थांबताच इतक्या वेळ आपला घेर फुलवून पावसात मनसोक्त भिजणाऱ्या, वेळप्रसंगी एकमेकींवर कुरघोड्या करणाऱ्या या रंगीबेरंगी छत्र्या आपल्या मर्जी विरुद्ध का होईना मिटून जातात. त्यांना आपल्या एका हातात धरून सगळेजण घाईघाईत बसमध्ये शिरतात. कोरडेपणा शोधू लागतात. पण एव्हाना या ओल्या रंगाने आतमध्येही प्रवेश केलेला असतोच. खिडकी जवळच्या सीटवर बसण्याची एरवी कोण अहममिहिका लागलेली असते. पण आता मात्र त्यांच्या या आरसपानी रूपाचं कौतुक करायचा कुणाचाही मूड नसतोच, उलट त्यांच्याकडे काहीशा नाराजीने बघतच अंतर राखून बसलं जातं. 

जरा बऱ्यापैकी कोरडी सीट बघून मी बसते.‌ माझ्या  निथळणाऱ्या छत्रीला प्रथेप्रमाणे पायापाशी ठेवते. तिकीट काढण्यासाठी पैसे देताना मला जाणवतं कंडक्टर आणि ड्रायव्हर दोघंही जवळपास अर्ध्याहून अधिक भिजलेले आहेत… पण जणू हा ओलावा त्यांच्या अंगाला जन्मजात चिकटल्यासारखे ते सरावाने वावरत आहेत. हळूहळू लोक जसे येऊ लागतात तसं मला जाणवू लागतं की सारं काही या पावसानं व्यापलंय. प्रत्येकजण थोडा तरी ओला आहेच. हे ‘ओलं दुःख’ म्हणावं का ‘ओलं सुख’ म्हणावं ?? काहीही असेल, पण ते सगळ्यांना एकाचवेळी बिलगतंय हे नक्की. 

आणि मग मला जलरंगात न्हायलेली अशी निरनिराळी चित्रं दिसू लागली. एखादं झाड, पावसात मनमुराद भिजणारी लहान मुलं, मोठ्या घेरदार आजोबा छत्रीत दाटीवाटीने उभं राहिलेलं एखादं कामगाराचं कुटुंब, बस स्टॉपवरची मोबाईल वर बोलणारी माणसं, एका कोपऱ्यात थोडीशी कोरडी जागा भरून खाणे दाणे विकणारा, एवढ्या भर पावसात रेनकोट घालून पाणी पुरीच्या ठेलाला प्लास्टिकने झाकून उभा असणारा पाणीपुरीवाला इ.इ. 

एखाद्या भलंमोठं चित्र त्याच्या इतर बारीकसारीक तपशीलासह प्रत्येक चौकोनात विशिष्ट पद्धतीने चित्रकाराने चित्रीत करावं… नजाकतीने त्याच्या आवश्यकतेनुसार काढून रंगवावं आणि मग हळूहळू एक अखंड चित्र पुर्ण व्हावं…. तसं हे दृश्य मला दिसू लागतं. आता पुढचे अनेक दिवस पाऊस नावाचा चित्रकार अशी अनेक चित्रं काढण्यासाठी सरसावलेला असणार आहे आणि त्यातली काही दृश्यं मला पुन्हा मोह घालणार आहेत.

©  सुश्री तृप्ती कुलकर्णी

७ ) प्रतिमेच्या पलीकडले —

              “ पाऊस – गद्य जलचित्रं “ 

               लेखिका : तृप्ती कुलकर्णी

पाऊस –गद्य जलचित्रं ….. 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments