श्री नंदकुमार पंडित वडेर

 

? प्रतिमेच्या पलिकडले ?

☆ “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे…” ☆ श्री नंदकुमार पंडित वडेर 

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… हा संत तुकाराम महाराजांचा अभंग आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे… गाता गळा असणारे सुस्वर सुरात नि भक्ती माधुर्यात तो आळवून आळवून म्हणतात… कानाला ऐकायला देखील तो गोड वाटतो… आणि आणि अभंग तुकयांचे हे साहित्याचे अभिजात लेणं आहे असं नि असचं आपण प्रशंसोग्दार काढतो… बस्स इतकं नि इतकच संत तुकाराम महाराजांच्या प्रती नि त्यांच्या अभंगाप्रती आमचा आदर व्यक्त होतो.. फार फार तर त्यांच्या भक्तीमय जीवनाचा नि त्यांच्या अभंगगाथेचा आम्ही वाड्मयीन दृष्टीने सखोल अभ्यासही करतो.. आपल्याला उच्च विद्याविभूषिताचं प्रमाणपत्र मिळतं आणि आणि कालांतराने विस्मृतीत जातं… पण पण संत तुकाराम महाराजांची अभंगगाथा खऱ्या अर्थाने आपण आपल्या जीवनात आत्मसात करतो काय?.. त्यातल्या एकातरी अभंगातील ओळीची उक्ती आपण प्रत्यक्ष जीवनात उतरवतो काय? त्यावर खेदानं नाही हेच उत्तर आपल्या मिळतं… काही हाताच्या बोटावर मोजता येतील अशी प्रसिद्धी परांङगमुख मंडळी आहेत त्यांना या तुकाराम महाराज कोण आहेत किंवा त्यांची अभंगगाथा म्हणजे काय आहे माहीत नसताना वा निरक्षर सामान्य मंडळीतील एखादाचं स्वतःचं जगणचं तुकाराम महाराजांच्या जीवन शिकवणीनुसार घडत जाताना दिसतं.. मला या ठिकाणी अभंगगाथेच्या तपशीलात न शिरता फक्त वरील वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे… या अभंगांबाबत बोलणार आहे… संत तुकारामांच्या काळात त्यांनी विठ्ठल भक्ती करताना माणसातला देव जसा पाहिला तसा आजूबाजूच्या भोवतालातही देव त्यांना दिसला.. निसर्गाच्या सानिध्यातही देवाचं स्वरूप त्यांना आकळत होतं… आपण जशी आपल्या कुटुंबाची आपल्या गणगोतांची, शेजारीपाजारी, मैत्र यांच्याशी जन्माने बांधले जातो.. आपला ऋणानुबंध जपतो, वाढवतो.. त्यात असते ती माया, प्रेम स्नेह.. यातून मोहपाशात बद्ध होतो.. ऐहिक, भौतिक, सांसारिक गरजांच्या परिपूर्तीसाठी आपलं जगणं इतरांवर तसचं निसर्गावरही अवलंबून असतचं असतं… एकमेकां साह्य करू अवघे धरू सुपंथ… अगदी त्याच धर्तीवर… यात दिले घेतले या व्यावहारीक अटळ गोष्टी येतातच त्या माणसांच्या जीवनाशी निगडीत असतात.. निसर्गाच्या बाबतीत आपलं काय योगदान.. आपण फक्त त्याच्याकडून घेतो घेतो आणि घेतो… देत तर काहीच नाही… उलट जीवनातील अती हव्यासापोटी निसर्गाचा ऱ्हास करण्याकडे कलाकलाने विकृती पछाडली गेलीय.. लोकसंख्येचा उद्रेक, त्याचा पडणारा भूमीवरचा भार, त्यातून वाढलेल्या वाजवी अवाजवी गरजांची कुऱ्हाड निसर्गाच्या अंगोपांगावर पडली… झाडांच्या कत्तली बरोबर जंगल संपत्ती स्वार्थीपणा ने ओरबाडून नामशेष करण्यात धन्यता वाटू लागली… याचा परिणाम पर्यावरणाचा समतोल बिघडत बिघडत आज अशी परिस्थिती आहे कि संपूर्ण र्हास झाला आहे… सुख समृद्धी मानवी जीवनात आली ती निर्सागाचा बळी देऊन… निर्सागाने मात्र याबाबत कुणाकडे तक्रार करावी… मुक्याने सारे सहन केले काहीही दोष नसतात.. सगळे आपले मुक्त हस्ताने लूटून देत असताना त्याला अस्तित्वहिनता आली… जमिनीची धूप, पाण्याचे स्त्रोत, लाकूड, वनौषधी, जंगलातले पशू पक्षी सारे सारे काही नाहीसे झाले.. मानवी जीवाला साह्यभूत होत असलेली हि संपत्ती नामषेश झाली… उष्णता वाढली, पाऊस रोडावला, या सारख्या धोक्याच्या संकेताने निसर्गाने मानवाला सांगून बघितले… पण ऐकण्याच्या मनस्थितीत तो असेल तर ना… मग प्रत्येक गोष्टीचा इव्हेंट करण्याची सांसर्गिक लागण असलेले आपण नेहमीचं येतो पावसाळा त्यावेळी वृक्षारोपण करण्याचा सामाजिक मानसिकतेचा आजार फैलावतो.. माणसांच्या झुंडीच्या झुंडी वृक्षारोपण करताना फोटोत दिसतात.. संकल्पाचे लाखातले आकडे ओक्याबोक्या वसुंधरेला हिरवाईची शाल पांघरू पाहतात.. आजचा वृक्षलागवडीचा उत्सव संपला की उद्या तिथचं सगळे वृक्ष माना टाकून पडलेले दिसतात… मगं परत पुढच्या वर्षी याच वेळी हाच खेळ… पैश्याचा चुराडा, वेळेचा अपव्यय, फक्त प्रसिद्ध चा तरू फुलून येण्यासाठी… राजा बोले नि दल डोले अशी बुद्धिची दिवाळखोरी असल्यावर हेच घडत असते…. पण थोडं इथं थांबा काही माणसं जन्माला येतात तेव्हा त्याचं विधिलिखित काही वेगळं असतं.. सामान्यातील सामान्या सारखे प्रतिकुल परिस्थिती जगताना दारिद्र्य, अज्ञाना बरोबर परंपरेच्या सामाजिक साखळ्यांच्या जाचातून जात असताना नि दुःखाच्या उन्हात कुठेतरी सुखाची शलाका चमचमताना पाहताना त्यांना आपल्या जीवनाचा अर्थ नकळतपणे गवसतो.. तेव्हा त्यांच्या हातून नियतीने जगाला अचंबित करणारं कार्य घडवून आणते… कर्नाटक राज्यातील थिम्माक्का दगडाच्या खाणीत काम करणारी.. चारचौघी सारखी लग्न संसाराची, मुलाबाळांची छोटी छोटी स्वप्न पाहणारी.. पण मातृत्व तिच्या नशिबातच लिहिलेले नव्हते.. घरचे, दारचे, समाजातले तिला वांझोटी म्हणून सतत पैरण्याने ढोसत जीवन नकोसं करणारे.. तिलाही मनातून खूपणारा आपण आई होऊ शकत नसल्याचा सल… खूपच उदास करून सोडे… पण तिनं त्यावर मार्ग शोधून काढला.. आपल्या घरापासून ते खाणीच्या जाणाऱ्या महामार्गावर चार कि. मी. च्या परिसरात वडाची झाडं लावायला सुरुवात केली… रोज जाता येता थोडा वेळ थांबून त्या झाडांची निगराणी, पाणी वगेरे बघत गेली.. बरोबरीच्या लोकांनी तिच्या या छंदाची कुचेष्टा केली… काही विघ्नसंतोषीनीं तर तिच्या पश्चात त्यातील काही झाडांना उखडून सुद्धा टाकले… तरीही थिम्माक्का डगमगली नाही कुणावर रागावली नाही आपली झाडं लावत गेली वाढवत गेली… आपला वंशवेल तिने असा वृक्षवेलातून वाढवत नेला…. आज त्या चार कि. मी. च्या रस्त्यावर या वडाच्या झाडांचे डेरेदार वृक्ष डौलाने उभे असून थंडगार सावली पसरुन बसलेत… थोडी थोडकी नव्हेत तर तीनशे च्या जवळपास तिने लावली हि वडाची झाडं आज दिमाखात उभी आहेत.. आणि गमंत म्हणजे तिची कुचेष्टा करणारेच जाता येता त्याच झाडाच्या सावलीत क्षणभराचा विसावा घेतायेत… थिम्मक्काच्या अलौकिक कार्याची दखल सातासमुद्रापार असलेल्या अमेरिकेच्या एका पर्यावरणविषयक संस्थेने घेतली नि आपल्या संस्थेच ‘थिम्माक्का रिसोर्सेस फाॅर एन्व्हायरमेंट एज्युकेशन ‘ असं चक्क नामकरण केलयं… आणि आपल्या इथे.. खरंच… मिडियावाले, शासन, प्रशासन, किती आंधळे आणि बहिरे असतात याच सत्याला नेहमी प्रमाणे जागले… असो… माझे त्या थिम्मक्काच्यासाठी विशेष कृतज्ञतेपोटी निशब्द होउन विनम्रतेने कर माझे जुळून येतात…

©  नंदकुमार पंडित वडेर

विश्रामबाग, सांगली

मोबाईल-99209 78470 ईमेल –[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments