सौ राधिका भांडारकर
✈️ प्रवासवर्णन ✈️
☆ चला आसाम मेघालयाला… भाग – 3 ☆ सौ राधिका भांडारकर ☆
शाळेच्या भूगोलात सर्वाधिक पाऊस पडणारे क्षेत्र म्हणजे चेरापूंजी हे वाचलं होतं .आज प्रत्यक्ष चेरापूंजी ला भेट देण्याची उत्सूकता अर्थातच खूप मोठी होती. ड्रायव्ह अतिशय सुखद होता. आजूबाजूला उंच उंच डोंगर ,डोंगरावर उतरलेले मेघ,वळणावळणाचे रस्ते,न बोचणारे परंतु गार वारे, भुरभुर पडणारा पाऊस सारेच खूप प्रसन्न होते. वातावरण अतिशय आल्हाददायक होते. खासी व जायैती हिल्स हा भूभाग खासी जमातीच्या अधिपत्याखाली होता अठराशे तेहतीस साली हा भाग ब्रिटिशांच्या राजवटीखाली आला आणि त्यांनी मेघालया ची राजधानी चेरापूंजी न ठेवता शिलॉंग येथे हलवली. येथील डोंगराळ भाग व सौम्य हवामानामुळे शिलॉंग ची तुलना स्कॉटलंड सोबत केली जाते.
चेरापुंजीत पर्यटकांसाठी खास आकर्षण म्हणजे येथील कोसळणारे धबधबे!
येथील एलिफंटा फॉल्स ला आम्ही भेट दिली. हा धबधबा तीन टप्प्यांमध्ये वाहता जातो .शंभर दीडशे पायऱ्या खाली उतरून टप्प्याटप्प्यावर या धबधब्याचे दर्शन विलोभनीय आहे. जिथून धबधब्याची सुरुवात होते तिथला भाग हा हत्तीच्या मस्त का सारखा दिसतो म्हणून त्यास एलिफंटा फॉल्स म्हणतात . मात्र आता डोंगर दगडांची पडझड झाल्यामुळे तसा आकार दिसत नाही. अतिशय नयनरम्य असा हा धबधबा ! सूरमयी संगीत ऐकताना आणि खळाळत पाणी बघताना जळू ब्रम्हानंदी टाळी लागते .
सेव्हन सिस्टर्स धबधबा बघताना ही मन असेच हरवून गेले. नोहकालिकिया वॉटर फॉल निर्मितीमागे एका आईची कहाणी आहे .तिचा दुसरा नवरा तिच्या मुलाचा द्वेष करत असतो . एकदिवस तो त्या मुलाची हत्या करतो आणि त्याचे मांस शिजवून तिला फसवून खायला देतो. हे जेव्हा तिला कळते तेव्हा दुःखाने ती बेभान होते व या कड्यावरून खाली उडी मारते. जणू तिच्या दुःखाने निसर्गही कोसळतो आणि निसर्गाच्या अश्रुंच्या रूपात हा भव्य धबधबा आपल्याला पहायला मिळतो नोहकालिकिया हे आईच नावच या धबधब्याला दिले आहे. या मागची कहाणी भीषण असली तरी निसर्गाचे हे रूप विलक्षण आहे डोळ्याचे पारणे फिटते .
मेघालयात नैसर्गिक गुहा ही खूप आढळतात. माऊस माय केव्ह ही अशीच एक नैसर्गिक गुहा आहे. 150 मीटर आत चालत जावे लागते. वाकून, सांभाळून ,उड्या मारत आत चालावे लागते. गारवा आणि पावसाचा शिडकावा मनाला आनंद देतोच .पण हे थोडं साहसी काम आहे.
चेरापुंजी ची ओळख शाळेच्या भूगोलात झाली होती मुसळधार पावसाचे गाव !आज आम्ही त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत होतो मजा वाटली अतिशय रम्य ठिकाण येथील रामकृष्ण मिशनला भेट देऊन आम्ही शिलाँग ला परतलो .शिलॉंग चे मूळ वंशज गोरी आणि खासी जमातीचे आहेत. पण ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली ख्रिश्चन धर्माचा प्रसार होऊन शिलॉंग मध्ये ख्रिश्चन संस्कृती उदयास आली. शीलॉंग हे राजधानीचे शहर असूनही येथे रेल्वे व रस्त्यांचा विकास झालेला आढळला नाही. मात्र पहाडी प्रदेशामुळे चढ-उताराचे अरुंद रस्ते, आणि पर्यटकांची गर्दी यामुळे वाहन कोंडी आढळते. परंतु वाहन चालक अतिशय काटेकोरपणे रस्त्याचे नियम पाळत असल्याने व शिस्तीने गाड्या चालवत असल्याचे ही अनुभवास आले.पादचारीही शिस्तीने फूटपाथवरुनच चालतात.शाळेतली मुले,आॉफीसात जाणारी आणि इतर सारी माणसं कुठून कुठे पायीच चालत जातात असेही आढळले.
शीलाँगमध्ये प्रामुख्याने इंग्लीश भाषाच बोलली जाते.
काहीशी त्यांची राहणी युरोपीअन पद्धतीची वाटली. मेघालयवासी खरोखरच शांत प्रवृत्तीचे वाटले. कष्टाळु आणि उत्साही वाटले.
गोल गोबरे गाल, ठेंगण्या गोल बांध्यांची ही तुरतुर चालणारी माणसे पाहताना मजा वाटली.
(पुढच्या भागात आसाम,तिथली लोकसंस्कृती आणि पर्यटनावर वाचूया.)
क्रमश:…
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈