सुश्री वर्षा बालगोपाल
बोलकी मुखपृष्ठे
☆ “कथापौर्णिमा” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
छान दाट निळे ••• काळे भासणारे आकाश ••• त्यात असंख्य लुकलुकणार्या चांदण्या, तारे तारका••• या सगळ्या गोपिकांत शोभून दिसणारा कृष्ण जणू हा पूर्णचंद्र••• पृथ्वीवर डोंगरांवर झाडांवर पाण्यात सगळीकडे सांडणारा हा लक्ख प्रकाश ••• हे सगळे पाहताना भान हरपलेले एक प्रेमी युगूल तळ्याकाठी झाडाखाली बसलेलं ••• हितगूज करण्यात मश्गूल असलेलं•••
सुंदर लोभस असे हे चित्र. कोणत्याही रसिक मनाला भुरळ घालणारं•••
पण काय सांगते हे चित्र? फक्त पौर्णिमेची रात्र आहे एवढच? मला नाही तसे वाटतं•••
हे संपूर्ण चित्र कितीतरी कथा सांगतेय असे वाटतं
०१) धरती आणि आकाश यांना जोडणारी ही डोंगराची रांग दु्रून चांगली दिसत असली तरी त्यांच्या आयुष्यात आलेले चढ उतार, खाचाखळगे यांचे दर्शन त्या युगुलाला देते. त्याचेच स्पष्ट प्रतिबिंब पाहून ते विचार करू लागले••••
०२) आयुष्यात कितीही अंधार असला तरी ब्लू मूनची रात्र कधीतरी येतेच जीवनात. याचा अनुभव ते दोघे घेत होते•••
०३) दोघेही व्याकूळ••• समदु:खी••• आपापली कथा, व्यथा सांगताना तो पूर्णचंद्र त्यांच्या कथा ऐकायला केव्हा झाडावर विसावला हे त्यांना कळलेच नाही•••
०४) नर्गिस राजकपूरचा प्रभाव असलेले दोघे झाडाची छत्री करून एकत्र त्यामधे गुजगोष्टी करत असताना चांदण्याची बरसात होत आहे•••
०५) आपल्या जीवनाचा निर्णय घेताना साशंक असणारे ते दोघे••• विचारमंथनातून त्यांच्या अंतरंगावर ऊमटलेल्या लहरी••• यातून त्यांच्या जीवनात एक शरदचंद्रीय निर्णयाची आलेली जीवन उजळणारी कोजागिरी पौर्णिमा •••
अशा अनेक कथांचे कथन करणारे केशरयुक्त रंगाचे कथापौर्णिमा हे शब्द•••
लेखिकेच्या नावाप्रमाणेच पुनवेची छत्री घेऊन आपल्या शब्द चांदण्यांना लकाकते रूप देऊन प्रत्येक कथेतून साराचा पूर्णचंद्र घेऊन येणार याची ग्वाही•••
तरीही एक कहाणी मला या चित्रातून समजली ती कवितेतून सांगावी वाटते .
☆ सुरेल मैफिल ☆
रात सांगते एक कहाणी
चमचमणा-या ता-याची
गज-याला स्पर्श करून
गंधाळणा-या वा-याची
वारा गाई एक गाणे
लकेर घेऊन हास्याची
मंजूरवाने पुलकीत होऊन
मोहरणा-या प्रितीची
प्रीत छेडी एक तराणा
साथ तया आरोहाची
अवरोह ये मागूती
सुरूवात मल्हाराची
मल्हार हा भारी जीवन
साथ तया असे तुझी
भूपाळी ते भैरवी
सुरेल मैफिल दोघांची
हे सगळे म्हणजे कथापौर्णिमा या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ. या कथा संग्रहात १५ कथा असल्याने दिलेले कथापौर्णिमा हे नाव संयुक्तिक असले तरी कितीतरी कथाबिजे मनात देणारे हे मुखपृष्ठ आहे एवढे नक्की.
इतके बोलके मुखपृष्ठ करणार्या गंगाधर हवालदार यांना धन्यवाद आणि या मुखपृष्ठाची निवड केली म्हणून रसिक आंतरभारतीचे प्रकाशक नांदुरकर आणि लेखिका पूनम छत्रे यांचे आभार.
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈