सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “उजेडाचे मळे” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

परदेशात मोठमोठ्या चित्रांचे लिलाव होतात आणि त्याला करोडो रुपये मिळतात. मला फार आश्चर्य वाटायचे, काय असतं एवढं या चित्रात? का त्याला एवढी किंमत मिळते? कशी ठरते ही किंमत.

कुतुहल म्हणून मी काही चित्रे त्या दृष्टीने पाहिली आणि नंतर त्याची कथाही वाचली तर समजले की वरवर दिसते तसे ते चित्र नसतेच मुळी. त्यामधे खूप गूढार्थ सामावला आहे. ही चित्रे मॉडर्न आर्ट म्हणून विक्रीस ठेवलेली होती. 

अचानक पुरुषोत्तम सदाफुले सरांच उजेडाचे मळे पुस्तक हाती पडले आणि त्या मुखपृष्ठाकडे पहातच राहिले. खरोखर मॉडर्न आर्ट असलेले चित्र वाटले.

सहज बघितले तर असंख्य उडणारे पक्षी••• थोडं नीट पाहिलं तरं माणसाच्या डोक्यातून आलेले विचार पक्षी••• 

परंतु जरा वेगळ्या दृष्टीने पाहिले आणि त्यातील गहनता जाणवत गेली•••

मध्यभागी असणारी माणसाची आकृती ही फक्त माणसाची नसून कारखान्यात जाम करणार्‍या एका कामगाराची आहे. कामगारांच्या समस्या कारखान्यातील प्रश्नांमुळे निर्माण झाल्या आहेत हे दाखवण्यासाठी कामगाराचे हृदय कारखान्याच्या आकाराचे जणू काळीज चिरले जात आहे हे दर्शवते. त्या समस्यांचे विचार पक्षी रुपाने उडू पहात आहेत.

कामगाराचे मन जरी हिरवे असले तरी आजूबाजूचा परिसर प्रदुषणामुळे पिवळा पडत चालला आहे आणि याच प्रदुषणात जगणे अवघड होऊन हे पक्षी हा परिसर सोडून उडून जात आहे आणि बिचारा कामगार जरी अवघड झाले तरी असहाय्य होऊन या प्रदुषणात, कारखान्यात होरपळत आहे.

कामगारांचे प्रश्न कोण सोडवेल? मी सोडवू शकेन का? कसे सोडवता येतील हे प्रश्न या कामगार विषयीच्या प्रश्नांची पाखरे डोक्यात घिरट्या घालत आहेत.

विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली। नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची विचारधारणा सगळ्यांनी विशेषतः कामगारांनी तरी विसरली नाहीच पाहिजे म्हणून हा क्रांतीसूर्य सतत कामगाराच्या विचारात तळपत आहे. कामगारांबद्दलचे विचार त्याला मूर्त रूप येत नसल्याने हा अर्धाच सूर्य तळपत आहे हे सांगणंयासाठी लाल रंगाचा सूर्य आणि त्याची पांढरी आभा दाखवली आहे. 

कारखान्याच्या भोवती वाढणारा कचरा, त्यातून निघालेले धुरांचे पक्षी,बाहेर पडणारी रसायने यातून कामगारांचे जीवन धोक्यात येऊन कामगार हिरवा- निळा पडत आहे. 

अगदी लहान मुलाच्या नजरेतून बघितले तर ती लहानमुलाची आकृती आत लाल मधे पांढरे आणि खाली हिरवे असलेले कलिंगड खाण्याचा विचार करत आहे. पण हे कलिंगडही म्हणावे तितके शुद्ध राहिले नाही हे दुर्दैव.(माहित आहे की कलिंगड आणि लेखन यांचा दुरान्वयेही काही संबंध नाही पण लहानमुल सहज असे म्हणेल म्हणून तोही अर्थ निघू शकतो असे सुचवायचे आहे)

असे अनेक सांकेतिक विचार प्रश्न घेऊन येणारे हे चित्र आणि त्याला तितक्याच सच्चतेने उत्तर देणारे सच्चेपणा आणि निरागसता यांचे प्रतिक असलेले निळंया रंगातील आकाशाचेही निळेपण घेऊन येणारे वाचकांच्या मनात फुलवणारे उजेडाचे मळे.

खरेच असे मॉडर्न आर्टने खुलणारे  सरदार जाधव यांचे हे वेगळेच चित्र मुखपृष्ठ म्हणून निवडणार्‍या प्रतिमा पब्लीकेशनच्या डॉ.दीपक चांदणे ,अस्मिता चांदणे आणि लेखक पुरुषोत्तम सदाफुले यांचे आभार.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments