सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “मनाचा गूढ गाभारा” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

नुकतेच म्हणजे २६ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रकाशित झालेले  मनाचा गूढ गाभारा पुस्तक हातात पडले आणि मुखपृष्ठ पहातच राहिले. 

गर्द हिरवट रंगावर एक दिवटी, त्याचा प्रकाश आणि वर असलेले मनाचा गूढ गाभारा हे शब्द. बस्सऽऽऽ एवढेच चित्र! पण किती बोलके आहे•••

०१) गाभारा या शब्दातून देवालय प्रेरित होते आणि मग त्या दृष्टीकोनातून बघितले तर गाभार्‍यातील अंधार हा कधीच काळा नसतो तर तो कधी निळा कधी हिरवा असा मोरपंखी असतो. तोच भाव या रंगातून प्रेरित होतो आणि अशा गाभार्‍यात पेटणारी नव्हे तर तेवणारी ही दिवटी गाभारा उजळून टाकत आहे. हा प्रकाश सूर्य वलयासारखा शाश्वत आहे आणि त्याची आभा ही एक सकारात्मकता एक चैतन्य देणारी आहे.

०२) नंतर विचार करता मनाचा शब्द गाभार्‍यातून घुमतो आणि मग हा गाभारा हा अंतरात्म्याचा आहे त्यातील भाव कधीच लवकर स्पष्ट होत नसतात आणि या गूढतेवर दिवटीची तेजोवलये पडली तर मनातील गर्तता सकारात्मकतेने चैतन्याने उजळून स्पष्ट होऊ लागते.

०३) ही दिवटी नीट पाहिली तर ही साधी पणती नसून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर यांच्या ज्ञानेश्वरीवर असलेल्या दिवटीसारखी आहे. त्याच ज्ञानशक्तीचे रूप घेऊन आलेली आहे आणि हा ज्ञानप्रकाश गूढ असला तरी गीतेतील जीवनाचे सार सांगून अर्जूनाला नैराश्येच्या तमातून बाहेर काढणार्‍या कृष्णवर्णिय आभा सारख्या सदोदित उर्जा देणारा आहे.

०४) मनाचा गूढ गाभारा या अक्षरांकडे नीट पाहिले तर गाभारा हा शब्द केशरी आणि पिवळ्या रंगात आहे. त्या रंगातच गाभारा हा अंधारी नसून तेजाने भरलेला आहे असे सांगितले आहे. गूढ शब्द पिवळ्या रंगात आहे. म्हणजे ही गूढता आता प्रकाशमय होईल हा संकेत दाखवते. हा रंग सोन्याचा असल्याने शुद्ध सोन्यासारखे मौलिक काही या गाभार्‍यातून येणार आहे असे सुचवते. किंवा रस्त्यावरिल सिग्नलमधे असणारा पिवळा सिग्नल जसे लाल रंगाचा धोका जाऊन पुढचे लवकरच सुकर होईल त्यासाठी तयार रहा अशी सूचना देत असतो आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करा सांगतो तसेच गूढ आता बोलून सगळे स्पष्ट होईल सुचवते. नंतर मनाचा शब्द बघितला तर सगळे मळभ जाऊन सारे काही हिर्‍यासारखे चमचमणारे सफेद रंगातील विचार असणार आहेत. ते अगदी स्पष्ट असणार आहेत. हे सुचवते.

०५) सहज लेखकाच्या नावाकडे लक्ष गेले आणि यापुस्तकाच्या लेखकाचे नावही किती समर्पक आहे असे वाटले. अभिजीत काळे•••

अभिजीत म्हणजे कृष्ण ; जो अंतर्मनातील  गूढार्थ वाचक अर्जूनाच्या मनापर्यंत घेऊन जाणार आहे आणि ये हृदयीचे ते हृदयी घातले याची अनुभूती देणार आहे. 

किंवा काळ्या गर्ततेवर सदा विजय मिळवून अजेय राहणारे असे अभिजीत काळे मनातील गाभार्‍याचे रहस्य उलगडणार आहेत.

०६) पुस्तकातील अंतरंगाशीही तादात्म्य साधणारे हे चित्र आहे. हे पुस्तक १०१ गझलांचा संग्रह आहे. गझल म्हणजे उला आणि सानी मिसर्‍यांनी दोन ओळीतून मोठा अर्थ सांगणारी शेर रचना. तर हे चित्र म्हणजे मनाचा गूढ गाभारा या शब्दांचा उला मिसरा आणि चित्राचा सानी मिसरा या शेरात लपलेला तेजोमय गर्भितार्थ सांगू इच्छितो.

०७) लेखक अभिजीत काळे यांना मी ओळखत असल्याने त्यांचा संस्कृत सुभाषिते अध्यात्म यांचाही मोठा अभ्यास असल्याने ती केशरी सात्विकता, ती सत्यता प्रखर असूनही मंद आणि शीतल प्रकाशाप्रमाणे मनापर्यंत घेऊन जाणारी गूढ असले तरी सहज सोप्या शब्दांनी तेजोवलयाप्रमाणे परावर्तित होणारी शब्दरचना घेऊन येणारी गझलरचना सकारात्मकतेच्या आभेला स्पर्श करणार असल्याची ग्वाही देते.

०८) अंतरंगात डोकावल्यावर समजते की गझलकार अभिजीत यांनी ‘मन’ हे तखल्लुस ( टोपणनाव) घेऊन गझल लेखन केले आहे म्हणून त्या नावाचा लिलया उपयोग करून घेत गझलसंग्रहाला नाव दिले आहे. या अर्थाने देखील मग अर्थाला नवे आयाम लाभतात आणि ‘मनाच्या’ गूढ गाभार्‍यातील रहस्य जाणून घ्यायला आपले मन सज्ज होऊन अंतरंगात डोकावलेच पाहिजे असे वाटून केव्हा गझलेच्या प्रवाहात न्हाऊ लागतो हे कळत नाही.

असे छोटा पॅकेज मोठा धमाका असणारे मुखपृष्ठ अभिजीत काळे यांच्याच संकल्पनेतून श्री सुरेश नावडकर, श्री शिवदादा डोईजोडे, श्री साईनाथ फुसे यांनी चितारले आणि प्रकाशक गझलपुष्प पिंपरी- चिंचवड यांनी स्विकारले याबद्दल सगळ्यांचे मन:पूर्वक आभार

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments