सुश्री वर्षा बालगोपाल

? बोलकी मुखपृष्ठे ?

☆ “वेध सामाजिक जाणिवांचा” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

काळी जमिन••• त्यात नवीन अंकुरलेले एक रोपटे••• या रोपट्याला पाणी देणारा एक हात••• एवढेच चित्र. 

पण पाहताक्षणी विचाराच्या रोपट्याला तरतरी आली एवढे खरे.त्याकडे पाहून अनेक विचार मनात तरळून गेले.

०१) सध्या सगळीकडे प्रदुषण वाढले आहे. पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. मग अशावेळी पर्यावरण पूरक काही कार्य करायला हवे आणि झाडे लावली पाहिजेत हे तर सुचवायचे नसेल?

०२) नुसते झाडे लावली पाहिजेत असे नव्हे तर तसा संकल्प केला पाहिजे. मग हा संकल्प हातावर पाणी सोडून केला तर त्याला अर्थ प्राप्त होतो. तसा संकल्प केला आहे हे सूचित करायला म्हणून हातावर पाणी सोडले आहे असे देखील हे सूचित करते.

०३) बरं ! संकल्प करताना पाण्याचे महत्व किती आहे हे जाणून पाण्याचा एक एक थेंब अनमोल आहे याची सामाजिक जाणिव आहे म्हणून हातावर सोडलेले संकल्पाचे पाणी देखील वाया न घालवता ते छोट्याशा रोपट्यावरच सोडून सामाजिक जाणिव आणि रोपट्याचे जीवन दोन्ही जपले आहे.

०४) कोणतेही रोपटे ••• ते जर वाढवायचे असेल तर त्याची उचित काळजी घेतलीच पाहिजे. मग रोपटे लहान असल्याची जाणिव ठेऊन त्याला जगवण्यासाठी हा हात तयार आहे हे सांगायला हात आहेच. पण हातावर पाणी सोडून हळूहळू ते पाणी रोपट्याला दिले तरच ते छान तग धरू शकते हा निसर्ग नियम आहे .त्याची आठवण ठेऊन आत्मियतेने प्रेमाने रोपटे वाढवले पाहिजे हे कृतीतून दर्शवले आहे.

०५) रोपटे हे नव्या पिढीचे आणि हात हे जुन्या पिढीचे प्रतिक मानले तर त्याला संस्काराचे पाणी दिले तर रोपटे व्यवस्थित वाढते ही कौटुंबिक भावना देखील यातून व्यक्त होते.

०६) आज उंगली थामके तेरी तुझे चलना मैं सिखलाउँ। कल हाथ पकडना मेरा जब मैं बूढा हो जाउँ। हीच भावना ते रोपटे वाढवणार्‍याच्या मनात आहे. कदाचित  आज तू मोठा व्हावेस म्हणून मी तुला पाणी देत आहे. पण मी जेव्हा म्हातारा होईन तेव्हा तुझ्या पारावर बसेन तुझ्या शितल छायेखाली बसून मी आनंदी होईन. तुझ्या अंगावरचे पक्षी पाने फ़ळे फुले माझे दु:ख कमी करतील. एवढेच नव्हे तर किमान भूक भागवण्याची सोय माझी होईलच पण इतरांनाही त्याचा उपयोग होईल. एवढा उदात्त विचार, आशावादही त्यात दिसतो.

०७) हे रोपटे पाण्यामुळे तरतरीत तर झालेले दिसत आहेच पण या उपकाराची फेड मोठे होऊन मी छत्र होऊन नक्कीच तुमच्या उपयोगी पडेन हे दिलेले मूक अभिवचन यातून स्पष्ट होते.

०८) सगळीकडे सिमेंट जंगल होत असताना काळी आई विकण्याचा कल असताना काळी आई जपली पाहिजे या जाणिवेतून या काळ्या आईला पर्यायाने सगळ्यांना धन धान्य देणार्‍या या सोन्याच्या तुकड्याला जपण्यासाठी आलेला हा मदतीचा हात आहे.

०९) जमिन म्हटले की शेतकरी आलाच. मग त्याच्याही काही समस्या असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी पुढे आलेला हा हात आणि वाचा फोडण्यासाठी आलेले हे झाड आहे असे सुचवायचे असेल.

१०) माणसाचे आयुष्य हे झाडासारखे असते. कितीही खाचखळगे अडचणी असलेल्या जमिनीवर जन्म झाला तरी वडिलधार्‍यांच्या मदतीच्या हाताचा मान राखत आपण स्वत: स्वत:च्या पायावर भक्कमपणे उभे राहिले पाहिजे आणि इतरांच्या उपयोगी पडले पाहिजे. झाडाचा एकही भाग कधीच वाया जात नाही हा गुणही चाणाक्ष लोकांनी अंगिकारायला हवा. असे पण हे चित्र सांगते.

११) अजून अवलोकन करत असताना वेध सामाजिक जाणिवांचा हे नाव बघताना वेध शब्दच मनाचा प्रथम वेध घेतो. आणि हा वेध सामाजिक जाणिवांचा आहे याची जाणिव करून देतो.

१२) मग एक कल्पक विचारही आला, हे झाड सैनिक, पोलीस, डॉक्टर, वकिल अशा अनेक पेशातील व्यक्तींचे प्रतिक मानले तर त्यांची कामाप्रती असलेली आस्था प्रेम हे जाणून त्याच्या उदात्त कार्याची भावना याचे भान सगळ्यांनी ठेऊन त्यांच्यासारखे कार्य करताना आपल्या स्वार्थावर पाणी सोडले पाहिजे. 

१३) किंवा स्वार्थावर पाणी सोडले तर परमार्थाच्या रोपट्याचे झाड होऊन जीवन कृतार्थ करू शकतो हा अध्यात्मिक अर्थ पण निघू शकतो.

जेवढे जास्त अवलोकन करू तेवढे जास्त अन्वयार्थ या चित्रातून निघतात. या पुस्तकाचे लेखक श्री अरूणजी बोर्‍हाडे यांच्या कार्याशी निगडीत आणि स्वत:च्याही असलेल्या समाजाप्रतीची कळकळ आणि कृती स्पष्टपणे उलगडणारे हे चित्र निर्मिती पब्लिक रिलेशन्स यांनी तयार केले आणि दुर्गभान प्रकाशनने ते मुखपृष्ठ म्हणून स्विकारले आणि लेखक अरुणजी बोर्‍हाडे यांनी पण त्याची निवड केली म्हणून सगळ्यांचे मन:पूर्वक आभार.

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments