श्री कौस्तुभ परांजपे
☆ “डी. लिट. … आणि… डिलीट…” ☆ श्री कौस्तुभ परांजपे ☆
काही शब्दांच्या भोवती एक वेगळंच वलय असतं. आपल्या बाबतीत तो शब्द नुसता ऐकल्यावर त्याचा अर्थ नीट समजून न घेता आपण आनंद व्यक्त करायला सुरुवात करतो. अगदी ते होणं शक्य नसलं तरी…… असाच गोंधळ झाला होता तो शब्दाचा. आणि घेतलेल्या अर्थाचा.
मला एक फोन आला. त्या व्यक्तीने मुद्द्याला हात घालत सरळ बोलायला सुरुवात केली…… (सरळ मुद्याला हात घातल्याने तो कोणत्या गावाचा असावा हे समजलं असेल.)
मी…….. अमुक अमुक……. आम्ही विचारपूर्वक तुमचे नांव आमच्या डिलीट च्या लिस्ट मध्ये घेतले आहे. तुम्हाला पुर्व कल्पना असावी म्हणून फोन करतोय. आपलं काही म्हणणं असेल तर विचार करून अर्ध्या तासात सांगा…..
माझ्याबद्दल घेतलेल्या निर्णयाला विचार करायला मलाच वेळ द्यायचा….. हिच गोष्ट माझ्यासाठी मोठी होती. बाकी सगळे निर्णय मला मान्य असायलाच पाहिजेत हे गृहीत धरून सांगितले जातात……
अर्धा तास…… अरे वेळ कुणाला आहे थांबायला….. तरी देखील मी विचार करतोय, असं भासावं म्हणून, कळवतो असं सांगितलं……..
आता डिलीट च्या लिस्ट मध्ये नांव. मी काय विचार करणार….. खरं मी विचार करण्यापेक्षा त्यांनी केलेल्या विचारावरच मला विचार करायची वेळ आली होती…..
आता काय?……. अर्ध्यातासाने ही बातमी सगळीकडे पसरणार…… कौस्तुभच्या नावापुढे डि.लिट……अर्थात पसरवणार मीच…….
मी त्यासाठी तयारी सुरू केली. कालच दाढी केली होती तरीही आज परत केली. एक चांगला फोटो असावा (मागीतला तर द्यायला. हल्ली मला फोटो कोणी मागत नाही, मागीतला तर जूना नाही का? असं विचारतात. वर तो जरा बरा असेल असं सांगतात. आजकाल फोटो काढायला सांगणारे डाॅक्टरच असतात. आणि ते चेहऱ्याचा काढायला सांगत नाहीत.) म्हणून झब्बा पायजमा घालून घरातच मोबाईल वर दोन चार चांगले फोटो काढायला म्हणून तयारी केली. बायकोला देखील तयार व्हायला सांगितलं.
फोन आल्यावर काय झालं आहे तिला कळेना….. माझी धावपळ पाहून तिचाच चेहरा फोटो काढण्यासारखा झाला होता. पण फोटो काढायला तयार हो म्हटल्यावर ती सुद्धा कारण न विचारता (नेहमीप्रमाणे मनापासून) तयार झाली. तेवढ्यात मिळेल त्या फुलांचा गजरा पण करून झाला.
इथे नको, तिथे, असं म्हणत घरातल्या सगळ्या भिंतीपुढे उभं राहून झालं. त्यातल्या त्यात बऱ्यापैकी रंग असणाऱ्या भिंतीपुढे, शेजारच्यांना हाताशी धरत फोटो काढले. आमचे फोटो काढायचे म्हणून त्यांना हाताशी धरलं…… नाहीतर……
त्यांनाही फोटो काढायची संधी मिळाल्याने मागे, पुढे, थोड जवळ, खांदा वर, नजर समोर, मान थोडी तिरपी अशा सुचना देत, सगळे दिवे लाऊन, मोबाईल एकदा आडवा, एकदा उभा धरून, एकदाचे वैयक्तिक आणि दोघांचे फोटो काढले. बघू बघू म्हणत आम्ही देखील ते दोन चार फोटो, पाच सहा वेळा पाहिले.
माझं नांव (कोणीतरी) डिलीट च्या लिस्ट मध्ये घेतलं आहे. असं मी बायकोला सांगता सांगता ते व्हाॅटस्ॲप वर पाठवलं सुध्दा…..
अय्या…… काय…… म्हणत ती जवळपास किंकाळलीच…… आता आम्हाला आमच्या अशा किंकाळीची सवय झाली आहे. प्रसंगानुसार आम्ही त्याचा अर्थ आमच्या सोयीने लाऊन घेतो.
आणि बातमी पसरली ….. मग काय?…. थोड्याच वेळात दोघांच्याही मोबाईलवर उजव्या, डाव्यांचे अंगठे, (हो दोघांचे उजव्या आणि डाव्या विचारवंतांचे) अभिनंदन संदेश, हसऱ्या चेहऱ्यापासून आश्चर्य वाटणाऱ्या चेहऱ्यांचे ईमोजी, अरे व्वा….. पासून कसं शक्य आहे?….. अशी वास्तववादी विचारणा, हे कधीच व्हायला पाहिजे होतं…… असा काहींचा दाखला…… असं सगळं व्हाॅटस्ॲप वर भराभर जमा झालं.
काही जणांनी मला फोन केले तर काही जणांना मी फोन केले…… मी काही करत नव्हतो तरी सुद्धा बायकोच्या फोनवरून मलाच फोन करून काही वेळ दोघांचा फोन व्यस्त ठेवला. तर मी कामात नसतांना सुध्दा कामात आहे असं भासवण्यासाठी बायकोला माझे आलेले फोन उचलायला सांगितलं. काहींना ते खरं वाटलं. तर मी कामात आहे असं बायकोने म्हटल्यावर कसं शक्य आहे?….. अशी शंका देखील काहींनी उघड उघड घेतली.
बरं पण असं मी काय मोठ्ठं काम केलं आहे की त्या कामाची दखल घेत माझ्या नावाचा डी.लिट साठी विचार केला. आणि असे कोण आहेत हे…..
कारण यांच्या यादीत राहू देत. पण गल्लीतल्या कार्यक्रमात सुध्दा माझं नांव कधीच आणि कोणत्याच यादीत नसतं. अगदी पत्रिकेतसुध्दा (प्रोटोकॉल) म्हणून काही ठिकाणी येतं……आणि यांनी अगदी डि.लिट साठी म्हणजे…….
शेवटी मी न राहवून त्या व्यक्तीला फोन करून विचारावं म्हणून फोन लावला……. ती व्यक्ती म्हणाली “वाचाल तर वाचाल” हे वाक्य ऐकून माहिती आहे. आणि त्यात खूप चांगला अर्थ आहे. पण तुम्ही लिहिलेलं का वाचावं हेच समजत नाही. उलट ज्यांनी वाचलं नाही ते एका मनस्तापातून वाचले आहेत.
त्यामुळे आमच्या गृपमधून तुम्हाला वगळण्यात का येऊ नये? या अर्थाने आम्ही तुमचं नांव डिलीट च्या लिस्ट मध्ये घेतलं आहे. यावर काही म्हणायचे आहे का यासाठी फोन केला होता……. बोला. काही सांगायचं आहे का तुम्हाला……
मी काय सांगणार……. मी पाठवलेले सगळे मेसेज आता मीच डिलीट करत बसलोय……..
आणि हो तो गृप पण मी डिलीट केला आहे……..
मीच मला विचारतोय…. हे कसं शक्य आहे…….. हे कधीच व्हायला हवं होतं…… डिलीट……..
© श्री कौस्तुभ परांजपे
मो 9579032601
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈