श्री सुनील शिरवाडकर
☆ देवाचिये द्वारी… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆
अगदी लहानपणापासून कानावर पडत गेलाय हरीपाठ. आजी रोज रात्री झोपताना हरीपाठ म्हणायची. त्यामुळे ‘हरीमुखे म्हणा.. हरीमुखे म्हणा.. ‘हे शब्द ओळखीचे झाले होते.
काही वर्षांनी बाबामहाराज सातारकरांच्या कैसेटस् आल्या. हरीपाठाच्या. खुपच सुश्राव्य होत्या. टाळ, म्रुदुंगाच्या तालावर म्हटलेला हरीपाठ आता गुणगुणु लागलो.
काही काळाने अगदी अथपासून इतिपर्यंत हरीपाठ वाचायची सवय लागली आणि मग तो एक नित्यनेमच होऊन गेला.
तसं पाहिलं तर ज्ञानेश्वरकालीन मराठी म्हणजे प्राकृत मराठी. सगळीच आपल्याला समजते असं नाही. हरीपाठामधल्या सगळ्याच पदांचा अर्थ समजतो असं नाही. काहींचा आशय समजतो. त्यात मुख्यतः हरीनामाचा महिमा वर्णन केला आहे. हरीचे.. नारायणाचे.. म्हणजेच विष्णुचे नामस्मरण सतत करत रहा हेच हरीपाठात सांगितले आहे.
विष्णुविणे जप.. व्यर्थ त्याचे ज्ञान
रामकृष्णी मन नाही ज्याचे.
असं सांगुन माऊली म्हणतात..
हरी उच्चारणी अनंत पापराशी
जातील लयासी क्षणमात्रे
अशी खुप साधी सोपी पदे आहेत. समजायला सोपी.. हरीनामाचा महिमा सांगणारी..
एक तत्व नाम द्रुढ धरी मना
हरीसी करुणा येईल तुझी
ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद
वाचेसी सद्गद जपे आधी
यात ज्ञानेश्वर महाराज नामाचा महिमा सांगतान अजून एक मोलाचा संदेश देतात.
सर्व सुख गोडी साही शास्त्रे निवडी
रिकामा अर्धघडी राहु नको
हे खुप महत्वाचं आहे. ‘रिकामं बसु नको. सतत काहीतरी करत रहा.’
(whatsapp, facebook बघणं म्हणजे सुध्दा एका अर्थी रिकामं बसणंच ना!)
ज्ञानेश्वर महाराजांच्या हरीपाठात अवीट गोडवा आहेच. पण एकनाथ महाराज आपल्या हरीपाठात म्हणतात.. —
हरी बोला देता.. हरी बोला घेता
हसता खेळता हरी बोला
हरी बोला गाता हरी बोला खाता
सर्व कार्य करीता हरी बोला
हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देह त्यागा अंती हरी बोला
हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठतां बसतां हरी बोला
हरी बोला जनी हरी बोला विजनी
एका जनार्दनी हरी बोला
किती सुंदर संदेश दिला आहे. या संतांचे सांगणे एकच आहे.. देवाचा जप करा.. ध्यान करा.. हात जोडुन आग क्षणभर का होईना देवासमोर उभे रहा. ते रुप डोळ्यात साठवा. त्यातुन तुम्हाला खुप काही मिळेल.
देवासमोर.. देवाच्या दारी क्षणभर उभं रहाण्यावरुन आठवलं..
पुण्यात तुळशीबागेत रामाचे मंदिर आहे. खुप सुंदर मुर्ती आहे रामाची. गोड भाव आहेत चेहर्यावर. दर्शन घेऊन झाल्यावर प्रदक्षिणा घालत होतो. तर या प्रदक्षिणा मार्गावर अगदी अरुंद बोळात एक ओटा आहे. मंदिराचाच एक भाग असलेला. अगदी गुळगुळीत झालेला जेमतेम दोन तीन जण बसु शकतील एवढा. दर्शन झाल्यावर अगदी थोडावेळ का होईना.. देवाच्या दारी बसावं असं म्हणतात. आणि तसं बसण्यासाठी म्हणुन ही जागा. खास बनवलेली.
आणि मागील भिंतीवर लहानशी पाटी.. (पुणेरी पाटी?)
त्यावर लिहीलेलं..
“ देवाचिया द्वारी उभा क्षणभरी, ,..
क्षणभर बसण्याची जागा. ”
© श्री सुनील शिरवाडकर
मो.९४२३९६८३०८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈