सौ राधिका भांडारकर
☆ खजिना… ☆ सौ राधिका भांडारकर ☆
मी स्वतःला नेहमीच भाग्यवान समजते. त्याला तशी अनेक कारणे आहेत पण त्यातलं मुख्य कारण म्हणजे मला खूप मित्र आणि मैत्रिणी आजही आहेत. मी जिथे जाते तिथे माझी कोणाशी ना कोणाशी मैत्री होतेच आणि ती सहजपणे घट्ट होत जाते.
आयुष्याच्या टप्प्याटप्प्यावर माणसं भेटतात. काही कालपरत्वे स्मृतीआड होतात तर काही मात्र आपल्याबरोबर आयुष्यभर सोबत राहतात. घट्ट मैत्रीच्या रूपात. अगदी जीवाला जीव देणारे वाटावेत इतके जवळचे असतात ते!
मैत्रीचा पहिला टप्पा असतो तो बालपणीचा, शालेय जीवनातला.
अशी एक सर्वसाधारण भावना,समजूत आहे की बालपणी जी मैत्री होते तशी आयुष्याच्या पुढील जाणत्या टप्प्यात ती कुणाशीही होऊ शकत नाही. खोटं नसेल, खरंही असेल पण माझा मात्र अनुभव असा नाही. सत्तरीनंतर माझी अनेक परिवाराशी अॉनलाईन मैत्री झाली आणि काय सांगू? किती नावं घेऊ? प्रत्येक जण माझ्यासाठी जिवलग आहे. माझ्या हाकेला ‘ओ’ देणारी अनमोल रत्ना सारखी माणसं मला इथे भेटली आणि याची जाणीवच मला खूप सुखद वाटते.
पण तरीही भूतकाळात रमताना अनेक चेहरे माझ्यावर आजही माया पाखडताना मला जाणवतात. पुरुषांच्या बाबतीत ‘लंगोटीयार’ असा घट्ट मैत्रीच्या बाबतीत वापरला जाणारा शब्द आहे. स्त्रियांच्या बाबतीत मी मैत्रीविषयी माझा स्वतःचाच शब्द योजिते. ‘चिंचाबोरांची मैत्री.’ या रिंगणातल्या माझ्या सख्यांनी तर माझा बालपणीचा काळ अधिक रम्य केला आहे.
कुठलीही समस्या त्यावेळी गंभीरच असते ना? त्यावेळी गृहपाठ केला नाही म्हणून बाई रागावल्या, शाळेच्या पटांगणात खेळताना दाणकन् पडून जखमी झाले, कधी कुठल्यातरी कार्यक्रमातून डावललं गेलं, एखादं खूप कठीण गणित सुटलं नाही, परीक्षेच्या वेळी आजारी पडले, शालेय सहलीला जाण्यासाठी घरून परवानगी मिळाली नाही, स्पर्धेत नंबर आला नाही अशा आणि अशा तऱ्हेच्या अनेक भावनिक प्रसंगी माझ्या जिवलग सख्या माझ्यासोबत सदैव राहिल्या आहेत. खरं म्हणजे आता भेटीगाठी होत नाहीत. आयुष्याच्या वाटेवर मैत्रिणींची खूप पांगापांग झाली पण मनात जपून ठेवलेली मैत्री मात्र तशीच उरली. आता या वयात कधीतरी कुणाकडून तरी,
“ती गेली” अशा बातम्या कानावर येतात पुन्हा ती चिंचाबोरं, त्या लंगड्या, फुगड्या, कट्टी—बट्टी आठवते. आयुष्यात सगळं काही धरून ठेवता का येत नाही याची खंत वाटते.
त्यादिवशी वेस्टएन्ड मॉलमध्ये मी फिरत होते आणि दुरून एक हाक आली. “बिंबाsss”
या नावाने इथे मला हाक मारणारं कोण असेल? मी मागे वळून पाहिले आणि मीही तितक्याच आनंदाने चक्क आरोळी ठोकली.
“भारतीsss”
दुसऱ्या क्षणाला आम्ही एकमेकींच्या गळ्यात. हातातल्या पिशव्या, भोवतालची माणसं, आवाज, गोंगट कशाचेही भान आम्हाला राहिले नाही. वयाचेही नाही.
“किती वर्षांनी भेटतोय गं आपण आणि तुझ्यात काहीही बदल नाही..!”
यालाच म्हणतात का जीवाभावाची मैत्री? मग पुढचे काही तास त्या रम्य भूतकाळात विहरत राहिले.
मी बँकेत नोकरी करत असताना माझा एक दोस्त होता. त्याला मी ‘मिस्टर दोस्त’ म्हणत असे. संसार सांभाळून नोकरी करणं हे कधीच सोप्पं नव्हतं. कालही नव्हतं आणि आजही नाही पण या माझ्या दोस्ताने मला त्या काळात, प्रत्येक आघाडीवर जी मदत केली ती मी कधीही विसरू शकणार नाही. एकदा तर मी कंटाळून माझा राजीनामाही तयार केला होता. त्या दिवशी याच माझ्या दोस्ताने मला जो मानसिक आधार दिला त्यामुळेच माझी नोकरी टिकून राहिली असे मी नक्कीच म्हणेन. कुठल्याही समस्येच्या वेळी त्याच्या नजरेत हेच निर्मळ भाव असायचे,
“मै हूँ ना!”
माझ्या या मित्र परिवाराच्या यादीत डॉक्टर सतीशचे नाव खूप ठळक आहे. दैनंदिन जीवनात येणाऱ्या अनेक मानसिक, शारीरिक, आर्थिक, कौटुंबिक समस्येत तो माझ्याबरोबर असायचाच पण एका प्रसंगामुळे ‘मला सतीश सारखा मित्र मिळाला’ याचे खूप समाधान वाटले होते.
कठीण समय येता कोण कामास येतो? अथवा फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इंडीड किंवा अमित्रस्य कुत: सुखम् यासारख्या उक्त्या आपण वाचतच असतो पण प्रत्यक्षात जेव्हा जीवनात त्याचा अनुभव येतो, तो क्षण असतो खरा भाग्याचा! अमेरिकेहून भारतात परत येण्याच्या काही दिवस अगोदरच मला किडनी स्टोनचा भयंकर मोठा अॅटॅक आला होता. सतीशला, माझ्या मिस्टरांनी कळवले. ते कळताक्षणी त्याने सांगितले, “तुम्ही ताबडतोब भारतात या. आपण इथेच ट्रीटमेंट घेऊ, सर्जरी करू. मी सगळी व्यवस्था करतो. काही काळजी करू नकोस.”
जळगाव स्टेशनवर पहाटे तीन वाजता माझा मित्र आम्हाला घ्यायला आला होता. वास्तविक तो गाडी आणि ड्रायव्हर पाठवू शकत होता पण तो स्वतः आला. जळगाव शहरातला अत्यंत व्यस्त आणि नामांकित सर्जन अशी ख्याती असलेला हा माझा मित्र स्वतःच्या प्रतिमेचा विचार न करता केवळ मनातल्या तळमळीने,काळजीने, मैत्रीसाठी आम्हाला स्टेशनवर घ्यायला आला होता. तेही अशा अडनेड्या वेळी. गाडीतून उतरताच त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि त्या प्रेमळ स्पर्शाने माझा आजारी चेहरा क्षणात खुलला.”आता मी बरी होईन” असा दिलासा मला मिळाला.
जीवाभावाचे मित्र मैत्रिणी यांचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा आणि माझ्या आयुष्यात पुन्हा एकदा डोकावून बघताना जाणवते की बाल्याचा उंबरठा ओलांडतानाच आई ही कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही आणि वडील तर फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड होतेच. हे सारे संस्कार मित्र! यांचे आयुष्यातले स्थान ते नसतानाही आबाधित आहे आणि खरं सांगू का? बाहेरच्या जगात तर खूप मोठा मित्रपरिवार होताच पण घरात आमचा पाच बहिणींचा समूह होता. आजही आम्ही तितक्याच घट्ट मैत्रिणी आहोत. बहिणींपेक्षा जास्त मैत्रिणी. जीवाला जीव देणाऱ्या. कुणाच्या आयुष्यात थोडं जरी खुट्टं झालं की आमचा मजबूत वेढा असतो एकमेकींसाठी.
माझ्या घरात बारा वर्षे काम करणारी माझी बाई माझ्यासाठी कधी मैत्रीण झाली ते कळलंच नाही. तिला मी मैत्रीण का म्हणू नये? कामाव्यतिरिक्त आम्ही दोघी एकमेकींच्या जीवन कहाण्या एकमेकींना कित्येकदा सांगत असू. आमच्यामध्ये एक निराळाच बंध विणला गेला होता. तो स्त्रीत्वाचा होता. मी तर तिला माझी कामवाली म्हणण्यापेक्षा मैत्रीणच म्हणेन.
तशी तोंडावर गोड बोलणारी,’ओठात एक पोटात एक’ असणारी अनेक माणसं भेटली. ज्यांच्याशी मैत्री होऊ शकली नाही त्यांना मित्र/मैत्रीण तरी का म्हणायचे? ते मात्र फक्त संबधित होते.
माझ्यासाठी जीवाभावाच्या मैत्रीची आणखी एक व्याख्या आहे, नेहमीच काही संकटात मैत्रीची परीक्षा होत नाही. खरी मैत्री जी असते, ज्या व्यक्तीबरोबर आपण कम्फर्टेबल असतो, ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला न्यूनगंड जाणवत नाही, सगळी बाह्य, ऐहिक अंतरे सहज पार होतात, जिला आपण अगदी मनाच्या तळातलं विश्वासाने सांगू शकतो आणि जिला आपलं ऐकून घ्यायचं असतं. भले तिच्याकडे आपल्या प्रश्नांची उत्तरे नसतील पण तिच्या खांद्यावर आपण डोकं टेकवू शकतो.
मी भाग्यवान आहे. मला असे मित्र-मैत्रिणी आजही आहेत आणि तोच माझा खजिना आहे, आनंदाचा ठेवा आहे.
हा विषय इतका व्यापक आहे की माझाच कागद अपुरा आहे.
© सौ. राधिका भांडारकर
पुणे
मो.९४२१५२३६६९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈