सुश्री नीता कुलकर्णी

??

☆ “वळवाचा पाऊस असाही…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

एप्रिल महिन्यातलं कडक ऊन.. पारा चढलेला ..अंगाची लाहीलाही..जोरात  फॅन सुरू केला तरी उकडतच होत.

काही वेळानंतर थोडं थोडं वातावरण बदलायला लागलं. हळूहळू वारा वहायला लागला. अचानकच काळे ढग दिसायला लागले. अंधारून आल्यासारखं झालं .आता तर वाऱ्याचा जोर फारच वाढला. झाडांच्या फांद्या हलायला लागल्या.  धप्प धप्प आवाज करत दोन नारळ पडले. एक झावळी पण सुसू आवाज करत पडली..

फांद्या पुढे पुढे येत होत्या ..

त्या पावसाला आनंदानी हसत हसत  ” ये ये “म्हणत आहेत असंच मला वाटायला लागलं …

वातावरण बदलूनच गेलं …

आलाच पाऊस वळवाचा… कोसळायलाच लागला ..बराच वेळ  धो धो पाऊस बरसला .

काही वेळातच आला तसा  निघूनही गेला…….

वातावरण शांत झाले .पाणी रस्त्यावरून वहात होते .खिडकीतून मी बघत होते .

बाहेर पडायचा  मोह झालाच ..गेले..  मुलं जमली होती .शेजारच्या बिल्डींग मधल्या आंब्याच्या झाडाच्या खाली खूप साऱ्या कैऱ्या पडल्या होत्या .पोरांना भलतीच  मज्जा वाटत होती .मुलं कैऱ्या गोळा करायला लागली. 

काही कैऱ्या फुटल्या होत्या, काही पाण्यात चिखलात पडल्या होत्या ,रस्त्यावर सोसायटीच्या झाडांमध्ये पडल्या होत्या.

 मुलांना फार गंमत वाटत होती.

” मला मिळाली ” “मला पण सापडली”

” अरे ही एक बघ केवढी मोठी आहे “

पोरं ओरडतच होती. एकाने चार कैऱ्या मला दिल्या .आजूबाजूचे लोकही जमा झाले होते .त्यांनाही त्या मुलांनी कैऱ्या दिल्या .खूप धमाल चालली होती .गार हवा आता फार सुखकारक वाटत होती.

इतक्यात माझं लक्ष तिच्याकडे गेलं. शेजारच्या बिल्डिंगमध्ये नुकतेच ते लोक  राहायला आले होते .

पोरांनी दिलेल्या कैऱ्या तिच्या हातात होत्या. त्यांच्याकडे बघत ती उभी होती .डोळे भरून वाहत होते. जवळ जाऊन  विचारलं ..

“काय झालं  ग?”

तिचा चेहरा रडवेला झाला होता. ती म्हणाली …

“सासऱ्यांचा सकाळीच फोन आला होता .असाच पाऊस काल आमच्या शेतातही पडला  म्हणे.आंब्याचं खूप नुकसान झालं आहे .पीकं तर पार आडवी झाली आहेत.”

आता तर तिचा बांधच फुटला .ती फारच जोरात रडायला लागली ….

मी नि:शब्द झाले ..काय बोलायचं याच्यावर ? सांत्वन तरी कसं करायचं? मला काही समजेना..

ती पुढे म्हणाली

” नको तेव्हा हा वळीव येतो आणि काही तासातच  हाता तोंडाशी आलेला घास घेऊन जातो”

मी नुसती उभीच..

” नको मला या कैऱ्या “

असं म्हणून तिने त्या कैऱ्या माझ्या हातात दिल्या .आणि शेजारच्या जीन्यानी वर निघून गेली.

इतका वेळ मी वरवर झाडाकडे पाहत होते …

आता खाली बघितलं मगाशी ती पुढे येणारी फांदी कदाचीत पावसाला

” थांब थांब ” म्हणत असावी का?…

अस आता मला वाटायला लागलं…

प्राप्त परिस्थितीचा आम्हाला हवा तो अर्थ आम्ही काढतो. वास्तव  वेगळं असतं  का?

अर्धा किलो कैरी मंडईतून आणणारे आम्ही … तेवढाच आमचा संबंध..त्याच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांचे दुःख आमच्यापर्यंत पोहोचतच नाही … हे आज स्पष्टपणे कळलं..

मोठ्या ब्रॅण्डेड दुकानात वस्तूची जी किंमत असेल ती आम्ही देतो. आणि भाजी घेताना मात्र दहा वीस  रुपयांसाठी घासावीस करतो.

आज तिच्यामुळे थोडी तरी भावना मनात जागी झाली .

असाही एक वळवाचा पाऊस विचार करायला लावणारा..

खरं सांगू तेव्हापासून पूर्वी इतका वळीव आता आनंदाचा राहिलेला नाही .

असा पाऊस आला की आता आठवतो तो  कष्ट  करणारा शेतकरी  

त्याच शेत ….

तिचा रडवेला चेहरा..

आणि खूप काही….

कधी आम्ही शहाणे होणार कोण जाणे… पण निश्चित विचार करूया आणि थोडं बदलूया…

© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी

मो 9763631255

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments