सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “जिलेबी…” ☆ सुश्री शीला पतकी 

मी मुख्याध्यापक झाल्यानंतर माझे ऑफिस दहाला सुरू होत असे. मी क्लार्क आणि सेवक यांचे काम दहा पासून सुरू होत असल्यामुळे आमचं लंच टाईम दुपारी दोन वाजता असे,

ज्यामुळे मुलींच्या मधल्या सुट्टीत मला त्यांच्याकडे लक्ष देणे सोयीचे जाईल. कारण त्यांची सुट्टी तीन वाजता होत असे. साधारणपणे डबा खाणा-या सगळ्या गटांमध्ये फिरून मुली डबा काय आणतात याचे मी निरीक्षण करत असे. बिस्किट, वेफर्स, चुरमुरे असे देणाऱ्या पालकांना मी पत्र देत असे किंवा बोलावून घेत असे आणि विद्यार्थिनींना पोळी भाजीचा डबा द्या असे आवर्जून सांगत असे. त्यांचे वाढीचे वय आहे तेव्हा त्यांना भरपूर आहार मिळाला पाहिजे.

या पद्धतीने मी वेगवेगळ्या गटात हिंडत असताना मग मुली आमचा एक घास घ्या ना बाई, आमचा एक घास घ्या ना, असा आग्रह करीत. त्याप्रमाणे जिच्या डब्यात अगदी साधं काही असायचं तो घास मी घेत असे.

सोलापुरात विशेषतः तेल-चटणी पोळी देण्याची पद्धत आहे. गरीब माणसांचे ते जेवण आहे. त्यामुळे बहुदा बऱ्याच वेळा मी तेल – चटणी पोळीवाला घास घेत असे.

हॉलच्या समोर एक मोठा गट बसलेला होता. पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांनी होत्या. आणि मी एका मुलीचा एक घास घेतला. तेव्हा मुलीने ओळखले ‘बाई तुम्ही तिची चटणी पोळी आहे म्हणून घेतलं ना, पण तिच्याजवळ अजून एक डबा आहे त्यात जिलबी आहे तो मात्र ती काही काढत नाही.

मी म्हणाले ‘चल असं कुठे असता कां ?’ती म्हणाली ‘बाई तिला विचारा तिच्या मांडीखाली एक डबा आहे. आणि ती मुलगी रडायला लागली.

इतक्यात बेल झाली आणि ऑफिसमध्ये मला फोन आला म्हणून बोलावणे आले. मी ऑफिसात गेले एस.एस.सी. बोर्डाचा फोन होता त्यामुळे मी त्या कामात गर्क होते.

मधली सुट्टी झाल्यामुळे मुली वर्गात गेल्या. सगळीकडे शांतता पसरली आणि एक मुलगी माझ्या ऑफिस बाहेर हमसून हमसून रडताना मला तिचा आवाज ऐकू आला.

मी कामात बिझी होते. मी दरवाज्या वरील माझे सेवक शिवा यांना हाक दिली. म्हणाले ‘शिवा काय चाललंय, कोण रडतंय.’

तेव्हा ते म्हणाले. ‘बाई एक मुलगी तुम्हाला भेटायचं म्हणते आणि खूप रडत आहे.’

‘ठीक आहे पाठवा.’ मग तीच ती मुलगी आत आली आणि माझा हात हातात घेऊन म्हणाली ‘बाई नाही हो मी तुम्हाला मुद्दाम जिलेबी दिली नाही असं नाही.

मला खरंच वाटायला लागलं. मी म्हणलं ‘काही हरकत नाही. तुला ती जिलबी खायची होती कां ?’ मी अगदी सहज म्हणाले आणि ‘अगं जे असेल डब्यात ना ते सगळ्यांनी वाटून खावं बाळा.’

त्यावर तिने जे उत्तर दिलं ते असं होतं.

ती म्हणाली ‘बाई माझी आई एके ठिकाणी घर कामाला जाते. त्यांच्या घरी आज काही कार्य होते. त्यांनी माझ्या आईला वाढून दिलेले जे ताट होते ते आई घरी घेऊन आली आणि तो दुसरा डबा तिने मला दीड वाजता आणून दिला त्यामध्ये जिलबी होती. पण त्याला भात लागलेला होता. त्यामुळे ते खरकट्या सारखं वाटत होतं. मला वाटलं न जाणं कोणाच्या पानातील असेल तर म्हणून मी ती जिलबी कोणालाच दिली नाही.’

आणि ती माझ्या कमरेला मिठी मारून अजूनच रडायला लागली. हे ऐकून माझे डोळे भरून आले. इतकेच काय आमचे सेवक शिवाजी कांबळे सुद्धा रडायला लागले. त्यांनी पटकन दार बंद करून पडदा सारखा केला.

मी खुर्चीवरून उठले. त्या मुलीला जवळ घेतलं आणि म्हणाले ‘बाळा या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे शिक्षण होय. तू खूप शिक आणि तुझ्या आईला सुखी कर. तुला शिक्षणाला जी कुठली मदत लागेल ती सेवा सदन शाळा, व्यक्तिशः मी कधीही करायला तयार आहोत. पण मन लावून अभ्यास कर आणि काही तरी बनण्याची जिद्द ठेव.’

नंतर तिची समजत घालून मी तिला पाठवून दिले. मला जाणवले की तिला लक्षात येत होते .. कुणीतरी वाढून दिलेलं ताटातलं अन्न आपण खातो आहोत. एवढ्या कोवळ्या जीवाला हे कळणं फार वाईट होतं. पण परिस्थिती पुढे इलाज नव्हता.

ही गोष्ट माझ्या मनात कुठेतरी खोल रुतून  बसली. त्यानंतर सोलापूर आकाशवाणी वरती ‘गाणी मनातली’ या सदरामध्ये अनेक स्त्रियांच्या मुलाखती झाल्या. त्यामध्ये एखादं गाणं लावायचं आणि ते आपल्याला का आवडले त्याच्या मागची घटना, प्रसंग हे सांगणे… असा तो कार्यक्रम होता.

त्याचे प्रसारण रात्री दहा वाजता होत असे त्या कार्यक्रमां मध्ये पाच एक गाणी मी लावली आणि ती गाणी मला कां आवडली असे प्रसंग सांगितले. त्यामध्ये मी हा प्रसंग सांगितला आणि त्यानंतर ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरी  मुठ्ठी में क्या है…’ हे गाणं लावण्याची मी विनंती केली.

त्या घटनेचा प्रभाव लोकांवर एवढा पडला की रात्री साडे अकरापर्यंत मला लोकांचे फोन येत होते- ‘किती मनाची पकड घेणारा प्रसंग आहे, आम्ही रडलो…’ असं लोक सांगत होते.

कार्यक्रम खूपच छान झाला होता.

त्यामध्ये साहित्यिक संपादक मा अरविंद जोशी सरांचा फोन आला. ते मला म्हणाले ‘तुम्ही शिक्षक असल्याचा मला आज हेवा वाटला.’

आणि हे वाक्य माझ्यासाठी त्या कार्यक्रमाची पावती ठरलं. त्यानंतर या प्रसंगावरती एखादी शॉर्ट फिल्म करावी असे माझ्या डोक्यात होते. सुमारे चौदा-पंधरा वर्षानंतर मी माझ्या एका शिक्षक मित्राला ही गोष्ट ऐकवली. त्यांनी त्याची पटकथा लिहून आणली. शिक्षणाचे महत्व पटवून देणारा एक प्रसंग त्याला जोडला आणि ‘जिलबी’ नावाचा लघु चित्रपट तयार झाला. त्यामध्ये डॉक्टर माननीय निशिगंधा ताई वाड यांनी मुख्याध्यापकाची भूमिका केली. विद्यार्थिनींच्या भूमिका इतर काही मुलींनी केल्या होत्या.

निशिगंधाताईंनी जेव्हा या चित्रपटाची पटकथा ऐकली तेव्हा त्यांचे ही डोळे भरून आले आणि तात्काळ त्यांनी या लघुपटात काम करण्यासाठी संमती दिली होती. या लघुपटाचे काम पूर्ण झाले. त्यानंतर हा लघुपट अनेक फिल्म फेस्टिवल मध्ये दाखल झाला. त्यात त्याला सहभाग मिळाला आणि त्याला बरीच पारितोषिके मिळाली.

त्यातल्या कथेला पारितोषिक मिळालं.  मुख्याध्यापकाची भूमिका करण्याला निशिगंधाताईंना पारितोषिक मिळालं. विद्यार्थिनीची भूमिका करणाऱ्या मुलीला पारितोषिक मिळालं. दिग्दर्शकाला पारितोषिक मिळालं आणि फिल्मला पारितोषिक मिळालं. किमान पाच-सहा ठिकाणी या फिल्मला पारितोषिके प्राप्त झाली. याशिवाय बर्लिन येथील फिल्म फेस्टिवल मध्ये या लघुपटाची निवड झाली. मेलबर्न ला या फिल्मचे स्क्रीनिंग झाले. मुलांच्या भावविश्वातली वेगळी फिल्म म्हणून त्याला त्या ठिकाणी दाखवण्यात आले आणि सगळीकडेच या लघुपटला खूप गौरवण्यात आले. वृत्तपत्रांनी याच्यावरती भरभरून लिहिले.

अशा पद्धतीने एका छोट्या प्रसंगाचा हा एवढा मोठा चित्रपट उभा राहिला.

प्रसंग खूप घडत असतात. टिपणारा माणूस हवा. इतके खरे सेवा सदन शाळेच्या प्रांगणात घडणाऱ्या अशा अनेक घटनांनी वक्ता म्हणून माझी अनुभव समृद्धी वाढवली यात शंका नाही.

(माणसाने पूढील आयूष्यात कितीही श्रीमंती आली तरी आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून ठेवायचे असतात. परिस्थिती बदलते पण लहानपण सदैव आठवत रहातं.. अगदी जीवनाच्या अंतापर्यंत..) 

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments