सुश्री प्रभा हर्षे
☆ परफेक्ट — – लेखिका – अनामिका ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
सध्या ओ टी टी मुळे सगळं जग हातात आलं आहे. मला हव्या त्या देशातील हव्या त्या भाषेतील सिनेमे आणि सिरियल बघता येतात. आणि मला आवडतं निरनिराळ्या देशातले लोक, तिथल्या पद्धती, तिथला निसर्ग बघायला, त्यामुळे इंग्लिशमध्ये भाषांतर केलेल्या सिरीयल मी बघते.
अशीच एक सिरीयल बघत होते, त्यात आजकालच्या स्त्रियांना किती ताण असतो, घरचं सगळं करून नोकरी करून मुलं सांभाळून शिवाय पुन्हा स्वतःच्या आवडीचं काही करायला कसा वेळ मिळत नाहीये यावर त्यातली पात्रं चर्चा करत होती…
मला ही चर्चा पाहताना पटकन असं वाटलं की ही गोष्ट किती ग्लोबल आहे… हाच संवाद आत्ता मुंबईत एखाद्या लोकलच्या डब्यात पण चालू असेल, जपानच्या बुलेट ट्रेन मध्ये किंवा अमेरिकेत एखाद्या कॅफेत सुद्धा सुरू असेल…
तेवढ्यात त्या चर्चेत सहभागी नसलेली पण शेजारच्या खोलीतून सरबत घेऊन आलेली एक आज्जी असते, तिला त्या सगळ्या जणी विचारतात की, “ए तू कसं मॅनेज केलंस गं सगळं? तूही कॅफे चालवत होतीस, तूही घरी येऊन पुन्हा सगळं काम करत होतीस, मुलांची शाळा अभ्यास, मोठ्यांचे आजार सगळं छान मॅनेज करत होतीस… तुला आम्ही कधीही थकलेलं पाहिलं नाही…”
यावर ती आज्जीबाई छान गोड हसते आणि म्हणते, “मी थकत असे कधीकधी, पण मला ताण मात्र कधीही आला नाही… कारण मला पर्फेक्ट व्हायची भूक नव्हती… किंबहुना आमच्या काळी असं ‘पर्फेक्ट असं काही नसतं’ असं लोकांना मान्यच होतं…
आई म्हटल्यावर ती चुरगळलेल्या ड्रेसमध्ये केस विस्कटलेली असू शकते… मुलांनी भरलेलं घर हे पसारा युक्तच असणार… चाळीशी पार केलेला मुलांचा बाबा, टक्कल असणारच त्याला… पर्फेक्ट असं काही नव्हतं आणि ते असावं असा अट्टाहास सुद्धा नव्हता त्यामुळे सोप्पं गेलं जरा तुमच्यापेक्षा…” पुष्कळ आत्मपरीक्षण करायला लावणारा प्रसंग आहे हा.
का अट्टाहास करतोय आपण पर्फेक्ट असण्याचा आणि कुणासाठी?
जाहिरातीत दाखवतात तशी संध्याकाळी सुद्धा तरतरीत आणि केस सुद्धा वाकडा न झालेली आई प्रत्यक्षात नसते, कारण प्रत्यक्षातल्या आईला संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर गॅस जवळ उष्णतेची धग सोसत पुन्हा संध्याकाळचा स्वयंपाक करायचा असतो… सणाच्या दिवशी 12 माणसांचा स्वयंपाक आणि आदरातिथ्य करताना मेकअप आणि भरजरी साडी नाही सांभाळू शकत सगळ्या, त्या ऐवजी कुर्ता घातला असेल तर सरसर कामे करता येतात…
ऑफिसला प्रेझेंटेशन असेल त्यादिवशी घरी काम जरा बाजूला ठेवावेच लागणार आहे… मुलांच्या परीक्षा असतील तर आईनेच अभ्यास घ्यायचा असं कुठल्याही ग्रंथात सांगितलेले नाही… चित्रातल्या सारखं आवरलेलं घर हे फक्त चित्रात नाहीतर नाटक सिनेमातच असतं…
स्वतःहून अभ्यास करणारी आणि पहिले नंबर वगैरे आणणारी मुलं तर मला वाटतं बहुधा फक्त स्वप्नातच असतात… कुणाचा तरी पहिला नंबर येणार म्हणजे इतरांचा दुसरा तिसरा चवथा पाचवा येणारच… अभ्यास छान करून घ्या पण नंबर येऊ दे की पंचविसावा… नोकरी देताना शाळेतला चवथी ब मधला नंबर कोण विचारतो?…
तब्येत सांभाळावी हे ठीक पण पन्नाशीच्या बाईने पंचविशीतील दिसण्याचा अट्टाहास कशासाठी?… वजनाचा काटा आटोक्यात असावा जे ठीक पण ‘साइझ झिरो’ चा हट्ट कशाला? सगळ्यांना वन पीस चांगलाच दिसला पाहिजे हा हट्ट कशासाठी ? काहींची वळणे साडीमध्ये काय सुरेख दिसतात… टाचा मोडून पडतात की काय असं वाटेपर्यंत दुखावणार्या हाय हील कशासाठी टाच महत्वाची आहे की फोटो?…
मुळात या पर्फेक्शनच्या व्याख्या कोण ठरवते आहे?
ऑफिसला काय घालावे, घरी काय घालावे, कसे रहावे, कसे चालावे, कसे बोलावे, कसे दिसावे, कुठे फिरायला जावे, काय आणि कधी खावे, अगदी कुठल्या गादीवर आणि कसे झोपावे, सगळं काही ठरवण्याचे हक्क आपण मिडिया ला नेमके का आणि कधी दिले?
एक माणूस दुसर्या सारखं कधीही नसतं मग सगळ्यांना एकच व्याख्या कशी लागू होईल?
करा की मस्त भिंतीला तंगड्या लावून आराम… होऊ देत घराचं गोकुळ… अघळपघळ गप्पा मारा मुलांशी, नवर्याशी… मस्त मोठमोठ्याने गाणी म्हणत फिरा घरभर गबाळ्या अवतारात… आणि तेवढ्यात पाहुणा आलाच तर त्यालाही आग्रह करा गोष्ट सांगायचा… सध्या दुर्मिळ होत चाललेली कला आहे ती…
लेखिका- अनामिका
संग्राहिका आणि प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे
पुणे, भ्रमणध्वनी:- 9860006595
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈