श्री मेघ:श्याम सोनावणे
मनमंजुषेतून
☆ जेथे कर माझे जुळती-… लेखक : श्री प्रवीण राणे ☆ प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे ☆
लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले होते. निवडणुका कोणतेही गालबोट न लागता शांततेत पार पाडावे याकरिता मा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांच्या कुशल व प्रभावी नेतृत्वाखाली संपूर्ण मुंबई पोलीस दलाने मरगळ झटकून कंबर कसली होती…
अभिलेखावरील उपद्रवी आरोपींवर प्रतिबंधक कारवाया करून त्यांचा बीमोड करणे, अवैध धंद्यांवर धडक कारवाया करून त्यांचे उच्चाटन करणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता गोपनीय माहिती मिळवून वेळीच प्रतिबंधक उपाय योजना करणे. अशा धडक कारवाया एकीकडे सुरू असताना दुसरीकडे निवडणुकीच्या बंदोबस्ता करीता आवश्यक असणाऱ्या मनुष्य बळाचे नियोजन, बंदोबस्ताची आखणी, इत्यादी करीता घेतल्या जाणाऱ्या बैठकांचा देखील धडाका सुरू होता…
मा. पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई यांनी या लोकसभा निवडणुका शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडण्याकरिता संपूर्ण मुंबई पोलीस दलास भावनिक आवाहन केल्याने, त्यामुळे प्रेरित होवून संपूर्ण मुंबई पोलीस दल युद्ध पातळीवर कामास जुंपले होते…
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ह्या नात्याने पोलीस ठाणे स्तरावर देखील आमची जोरदार तयारी सुरू होती. मनुष्यबळ उपलब्ध करण्याकरिता रजेवर असलेल्या, गैरहजर असलेले, कर्तव्य टाळून गैरहजर रहाण्यात आणि वारंवार खोट्या सबबी सांगून रुग्ण निवेदन करण्यात निर्ढावलेले पट्टीचे कामचुकार अधिकारी व अंमलदार, यांना आवाहन करून, प्रसंगी शिस्तीचा धाक दाखवून कर्तव्यावर हजर करून घेतले जात होते… निवडणुकीशी संबंधित कामाबरोबरच पोलीस ठाण्याशी निगडित इतर दैनंदिन कामे हाताळताना सर्वांचीच पुरती दमछाक होत होती…
दिनांक २०/०५/२०२४… लोकसभा निवडणुकीची तारीख जशी जशी जवळ येवू लागली तसा तसा बैठका, मॉक ड्रिल, प्रतिबंधक कारवाया, बंदोबस्ताची आखणी, इत्यादी कार्यांना वेग आला होता. क्षणाचीही उसंत मिळत नव्हती… रजा मिळणार नाहीत याबाबत निक्षून सांगण्यात आल्याने अधिकारी व अंमलदार रजेचे अर्ज पुढे करण्यास धजावत नव्हते…
अशा परिस्थितीत दिनांक १५/०५/२०२४ रोजी मी माझे दैनंदिन काम करण्यात गर्क असताना… सुमारे २०.३० वा. माझा सहायक पो. ह. फड माझ्या केबिनमध्ये आला आणि बोलू.. की …नको !, अशा संभ्रमावस्थेत चुळबुळ करीत माझे टेबल जवळ उभा असल्याची जाणीव झाल्याने माझ्या कामाची तंद्री भंगली…..
“काय रे !, …काय काम आहे ?” मी थोड्या त्रासिक मुद्रेनेच विचारले ….
“सर,… रागावणार नसलात तर सांगतो!….” फड चाचरत चाचरत म्हणाला.
एव्हाना मी थोडा नॉर्मल झालो होतो…. “सांग, एवढं काय अर्जंट काम आहे.” मी शांत स्वरात विचारले…..
“तसं काही विशेष नाही!… मला माहिती आहे की आपण जास्तीत जास्त मनुष्यबळ उपलब्ध ठेवण्याकरिता शर्थीचे प्रयत्न करीत आहात, अशा परिस्थितीत मी काही सांगणं योग्य होणार नाही ! …पण!…..” अगदी संथ लयीत परंतु परिस्थितीचा आणि माझ्या मुडचा अंदाज घेत सावधपणे फड उद्गारला ……
“नक्की काय झालंय ?…. तुझा काही प्रॉब्लेम आहे का ?” मी उत्कंठावर्धक स्वरात त्याला विचारले….. “अगदी बिनधास्त सांग ! …” मी त्यास पुन्हा आश्वस्त करीत म्हटलं.
“आपले एएसआय कदम आहेत ना !…. त्यांची आई सिरीअस आहे. ते तुम्हाला भेटण्याकरीता सकाळ पासून दोन – तीनदा येवून गेले परंतु तुम्ही सतत कामात होता म्हणून त्यांची तुम्हाला भेटण्याची हिम्मत झाली नाही. आताही ते केबिनच्या बाहेर उभे आहेत”. फड ने एवढा वेळ मनात साठवून ठेवलेलं सगळं एका दमात सांगून टाकलं.
“ठीक आहे !,आत पाठव त्यांना…” असे सांगताच फड ने एएसआय कदमनां आत बोलावलं… एक सॅल्युट. मारून एएसआय कदम चाचरत म्हणाले.. “सर, एक रिक्वेस्ट होती!…”
“कोणती?….”
“सर. गेल्या दिड दोन महिन्यांपासून गावी माझी आई अत्यंत आजारी आहे. गावाहून बरेचदा, येऊन जा म्हणून फोन येत आहेत, पण निवडणुकीचे कारण सांगून मी आता पर्यंत टाळत आलो. परंतु आता डॉक्टरांनी गॅरंटी नाही, हृदयाची झडप फक्त २० टक्के काम करीत आहे कधीही काहीही होवू शकते असे सांगितले….. सर, कसं आणि कोणत्या तोंडाने विचारू कळत नाही, पण मला दोन दिवस रजा मिळेल का ? … गावी जावून आईला भेटतो आणि लगेच परत येतो… इलेक्शन होईस्तोवर आई राहील की नाही याची शाश्वती नाही…..” घशाला कोरड पडलेल्या आवाजात एएसआय कदमांनी मला विनंती केली……
मलूल चेहऱ्यावरील चष्म्याचे आतील पाणावलेले डोळे एएसआय कदमांची अगतिकता स्पष्ट पणे अधोरेखित करीत होते….. एएसआय कदमांच्या विनंतीवर मेंदूने विचार करण्या अगोदरच हृदयाने जीभेचा ताबा घेतला… “कदम साहेब, आपण द्या आपला अर्ज आणि जावून या…” क्षणाचीही विलंब न लावता मी भावविवश होवून परवानगी देवून टाकली…
“धन्यवाद !” म्हणून पुन्हा एक सॅल्युट करून एएसआय कदम रवाना झाले…. आणि मी पुन्हा माझ्या कामात गर्क झालो….
जेम ते एक दिवस मध्ये गेला असेल…. प्रभारी हवालदार गायकवाड यांनी मला येवून सांगितले की, एएसआय कदमांची आई गेली …..
“अरेरे ! वाईट झाले… असो, पण एएसआय कदमांची नेमणूक निवडणूक क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत करण्यात आली आहे ना ?” …..मी प्रभारी हवालदारांना विचारले.
“होय साहेब!…. आता त्यांची निवडणूक बंदोबस्ताकरीता येण्याची शक्यता नाही. आपल्याला दुसरी अरेंजमेंट करावी लागेल!…” प्रभारी हवालदारांनी आपला अभिप्राय सांगितला….
“बरोबर आहे तुमचं !, अशा दुःखद प्रसंगी त्यांना कर्तव्यावर या म्हणून सांगणं संवेदनशून्य पणाचं ठरेल ! ते काही नाही, तूम्ही दुसरी रीप्लेसमेंट शोधा !…” मी प्रभारी हवालदारांना फर्मावले….
सायंकाळी सातच्या सुमारास एएसआय कदमांचा फोन आला….. मी काही बोलणार इतक्यात ते म्हणाले ! “साहेब तुमच्या मुळे आईला जिवंतपणी शेवटचं पाहू शकलो. सकाळीच अंत्यविधी उरकला… रात्रीच्या गाडीत बसतोय. उद्या सकाळी ड्युटी जॉईन करतोय.” असे सांगून एएसआय कदमांनी फोन ठेवला.
काय बोलावं तेच कळत नव्हतं. एकीकडे काहीतरी क्षुल्लक सबब सांगून कर्तव्य टाळणारे महाभाग कुठे ! …आणि स्वत:च्या जन्मदात्रीच्या निधनाचे दुःख बाजूला ठेवून कर्तव्यास प्राधान्य देणारे, प्रामाणिकपणाचा वसा जपणारे एएसआय कदम कुठे !….. माझ्यासाठी हा आश्चर्य आणि एएसआय कदमां प्रती आदर अशा संमिश्र भावनांचा उमाळा आणणारा अविस्मरणीय प्रसंग होता…..
शब्द दिल्याप्रमाणे एएसआय कदम दुसऱ्या दिवशी कर्तव्यावर रुजू झाले… आणि यथावकाश निवडणुकाही निर्विघ्नपणे आणि शांततेत पार पडल्या….
घोडखिंडीत अतुलनीय पराक्रम करून बाजीप्रभू जरी मराठ्यांच्या इतिहासात कायमचे अजरामर झाले तरी देखील त्यांचे सोबत सिद्धी जौहरच्या बलाढ्य फौजेशी लढून आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या कित्येक अनामिक बांदल वीरांचा पराक्रम देखील बाजी प्रभूंच्याच तोलामोलाचा होता हे विसरून चालणार नाही !….
त्याचप्रमाणे निवडणुका निर्विघ्नपणे पार पाडण्यात मोलाचं योगदान देणाऱ्या पोलीस बांधवांमध्ये एएसआय कदमांसारख्या कोणाच्याही खिजगणतीतही नसलेल्या प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलिसांचे योगदान हे निश्चितच कौतुकास्पद व गौरवास पात्र ठरणारे आहे….
यथावकाश एक दिड वर्षात एएसआय कदम सेवा निवृत्त होतील आणि काळाच्या ओघात लोकांच्या विस्मृतीत जातील… त्याअगोदर त्यांची कर्तव्यनिष्ठा इतरांसाठी निरंतर प्रेरणादायी ठरावी याकरीता हा लेखन प्रपंच…….
अत्यंत दुःखद प्रसंगीही भावनेपेक्षा कर्तव्यपूर्तीस अग्रक्रम देणाऱ्या ह्या पोलीस वीरास माझा मानाचा मुजरा….
लेखक : श्री प्रवीण राणे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक, समता नगर पोलीस ठाणे, मुंबई
प्रस्तुती – श्री मेघ:श्याम सोनावणे