सुश्री नीता कुलकर्णी
☆ “सोपं नाही हो हे…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यकारिणीचे आम्ही सर्वजण एका वृद्धाश्रमाला भेट द्यायला निघालो होतो. संचालकांनी “एकदा येऊन बघून जा” असे सांगितले होते . आमचे अध्यक्ष श्री जोशी यांची बायको आणि मी जाताना जवळ बसलो होतो. त्या जरा वेळाने मला म्हणाल्या ,
“अग माझी नणंद यांची सख्खी बहिण तेथे आहे. आज आठ महिन्यांनी आमची भेट होईल.”
” ती तिथे असते” ?
मला आश्चर्यच वाटले .
” हो..अग तिचा मुलगा अमेरिकेत.. तो एकुलता एक.. आईची इथं सोय करून गेला आहे. गेली आठ वर्ष ती तिथेच आहे. पहिल्यांदा आम्ही सारखे जात होतो तिला भेटायला. पण आता आमची आमची ही वयं झाली ….प्रेम आहे ग… पण ….”
यावर काय बोलणार? सत्यच होते ते…
“तुमच्या घरी त्या येत होत्या का?”
” त्या लोकांनी सांगितलं ..घरी जास्ती नेऊ नका .कारण नंतर मग त्यांना इथे करमत नाही. “
“त्यांना ईतरांच्या अनुभवाने ते जाणवले असणार…”
“हो ग… पहिले काही दिवस भाचे, पुतणे, नातेवाईक त्यांना भेटायला गेले. नंतर हळूहळू त्यांचेही जाणे कमी होत गेले …. हल्ली इतका वेळही नसतो ग कोणाला..”
हे सांगताना वहिनींचा गळा दाटून आला होता….
आम्ही तिथे पोहोचलो. गाडीतून उतरलो .एक नीटस, गोरीपान, वयस्कर अशी बाई धावतच आली…..
तिने जोशी वहिनींना मिठी मारली. शेजारी काका उभे होते. त्यांना वाकून नमस्कार केला .तिघांचे डोळे भरून आले होते .
मी ओळखले या नणंदबाई असणार… त्यांना झालेला आनंद आम्हालाही जाणवत होता. तिथे आम्ही चार तास होतो .तेव्हढा वेळ त्या दोघांच्या आसपासच होत्या .
सेक्रेटरींनी संस्थेची माहिती दिली. आणि संस्था बघा म्हणाले.सगळेजण गेले.
मी जोशी वहिनींबरोबर त्यांच्या नणंदेच्या रूममध्ये गेले .वहिनी दमल्या होत्या. नणंदेनी त्यांना कॉटवर झोपायला लावले. चादर घातली आणि पायाशी बसून राहिल्या.
विश्रांती घेऊन वहिनी उठल्यानंतर ते तिघ गप्पा मारत बसले. लहानपणीच्या ,आईच्या, नातेवाईकांच्या आठवणी काढत होते. हसणं पण चालू होतं.
इतक्यात “जेवण तयार आहे” असा निरोप आला.
जेवण वाढायला तिथे लोक होते. तरीसुद्धा नणंदबाई स्वतः दोघांना वाढत होत्या. काय हवं नको बघत विचारत होत्या .
त्यांचं जेवण संपत आल्यावर त्यांनी पटकन जेवून घेतलं.
थोड्यावेळाने आम्ही निघालो.
तेव्हा नणंदबाईंना रडू आवरेना… तिघही नि:शब्द रडत होते.. बोलण्यासारखं काय होतं?
सगळं समोर दिसतच होत….
सर्वात शेवटी दोघे गाडीत चढले.
बाहेर पदर डोळ्याशी लावून उभ्या असलेल्या नणंदबाई….
आम्हाला सर्वांनाच पोटात कालवत होत.
परत येताना वहिनी तर हुंदके देऊन रडत होत्या.
गप्प गप्प होत्या….
नंतर काही वेळानंतर म्हणाल्या
” वाईट वाटतं ग.. पण माझ्याकडे तरी कस आणणार? आमची एक मुलगी. आमचचं आजारपण करताना तिची किती तारांबळ होते …नणंदेची जबाबदारी तिच्यावर कशी टाकणार?तीलाही तिचा संसार नोकरी आहे. आणि हा एक दोन दिवसाचा प्रश्न नाही ग….पण नणंदेला एक सांगितलं आहे …आमच्या दोघांपैकी एक जण गेलं की मी किंवा हे तिकडेच राहायला येणार…”
हे ऐकल आणि माझेही डोळे भरून आले..
जे वास्तव आहे ते वहिनी सांगत होत्या तरीपण…….
वहिनी पुढे म्हणाल्या
” ती नेहमी म्हणते तुम्ही दोघ एकत्रच रहा…..तुम्हाला दोघांना उदंड आयुष्य देवो देवांनी… “
पण ते झालंच नाही…. जोशी काका गेले आणि पंधरा दिवसांनी वहिनी पण गेल्या……
अशाच कधीतरी मला नणंदबाई आठवतात …आणि डोळे भरून येतात….
तिथे राहणाऱ्या प्रत्येकाची एक वेगळी कथा आहे………
तुम्ही घरी तक्रार न करता सुखात आनंदात रहा…
कारण असं जाऊन राहणं सोप्पं नसतंच…..
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈