श्री सुनील देशपांडे

? मनमंजुषेतून ?

☆ समजलंच नाही आपण कधी रक्तपिपासू बनलो ! —  लेखिका : सुश्री मुक्ता चैतन्य ☆ श्री सुनील देशपांडे

‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे..’

… शाळेत असताना दिवसाची सुरुवात राष्ट्रगीताबरोबर या प्रतिज्ञेने होत असे. कित्ती भारी वाटायचं. प्रतिज्ञा खणखणीत आवाजात म्हणायला मला खूप आवडायचं. एकही दिवस असा गेला नाही ज्या दिवशी शाळेत प्रतिज्ञा झाली नाही. हल्लीच्या शाळांमध्ये राष्ट्रगीत म्हटलं तरी पुष्कळ आहे अशी परिस्थिती आहे. ते असो… 

… प्रतिज्ञा म्हटल्यावर, म्हणताना आपण जे म्हणतोय तसं वागलं पाहिजे हे आपोआप मनात रुजत गेलंच. पण त्याच पुस्तकात हजारो वर्षांपूर्वी भारतातून सोन्याचा धूर निघत असे असं वाचलं की प्रश्न पडायचा, हजारो वर्षांपूर्वी निघणाऱ्या सोन्याच्या धुराचं कवतिक मला आज का सांगितलं जातंय? अर्थात हा प्रश्न मी कधी कुणाला विचारला नाही, कुणी त्याचं आपणहून उत्तर दिलं नाही. 

मी शहरात जन्माला आले, शहरात वाढले. आपला देश कृषिप्रधान आहे या वाक्याचा अर्थ समजायला पुढे बरीच वर्ष जावी लागली. शाळेच्या पुस्तकांनी मला काय दिलं माहित नाही पण शाळेने कळत नकळत माझ्यात ‘सेक्लुअर’ जगणं रुजवलं. त्यामुळे इतकी वर्ष मला माझा देश म्हणजे आजूबाजूचा समाज आवडायचा. त्यात त्रुटी होत्या, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्या दिसायच्या, त्यांच्याशी दोन हात करावे लागायचे, पण तरीही राग यायचा नाही. कारण कितीही बुरसटलेला, कर्मठ असला तरी तो रक्त पिपासूं नव्हता. दुसऱ्याचं उघड उघड वाईट चिंतणारा नव्हता. दुसऱ्याचं वाईट झालं तरच माझं भलं होणार आहे असं मानणारा नव्हता. दुसऱ्याचं वाईट चिंतण्यात गैर काहीच नाहीये, उलट ते मर्दुमकीचं लक्षण आहे असं म्हणणारा आणि मानणारा नव्हता. तो दंगेखोर असेलही, क्वचित प्रसंगी असहिष्णू होतही असेल पण त्वरेने सावरणारा आणि आपल्या चुकांचं उघड समर्थन करत त्या चुकांचा पायंडा पडावा यासाठी धडपडणारा नव्हता. तो सर्वसाधारणपणे चांगला होता. 

सातवी-आठवी पासून मी एकटीने प्रवास करते आहे. एकटीने प्रवास करताना ना मला तेव्हा भीती वाटली ना माझ्या पालकांना. शाळेत असल्यापासून कॉलनीतल्या मित्रांबरोबर भटकत होते, कधी कुणी मुलगी असून मुलांबरोबर खेळते म्हणून टोकलं असेल पण तितकंच..त्याचा न्यूसन्स कधी झाला नाही. की कुणी गॉसिप करण्याच्या भानगडीत पडलं नाही. 

आज हे सगळं आठवण्याचं आणि लिहिण्याचं कारण, गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या आजूबाजूचा समाज मला अवस्थ करतोय. त्याचं वेळोवेळी खालावत चाललेलं रूप मला आतून पिळवटून काढतंय. 

त्रास होतोय कारण तो रक्तपिपासू बनला आहे. सतत काहीतरी ओरबाडून घेण्याच्या वृत्तीचा बनला आहे. हपापेलेला वाटायला लागला आहे. सतत काहीतरी हवंय, अशी भूक जी कधीच शमणारी नाहीये.. माणसं शांत नाहीत, सुखी नाहीत, समाधानी नाहीत. साधं सिग्नलवर कुणी कुणाच्या पुढे गेलं तर माणसं एकमेकांकडे खाऊ की गिळू अशा नजरेने बघत असतात. रस्त्यावर माणसे कावलेली आहेत. त्यांना कायम कसला तरी राग आलेला असतो. आणि तो राग आजूबाजूच्या सगळ्या सहप्रवाशांवर सतत काढला जातो. माणसे कधी नाहीत इतकी जाती आणि धर्माच्या नावाने वेडीपिशी झाली आहेत. अचानक अस्मितांच्या भिंती उभ्या राहिल्या आहेत. 

असंख्य जाती आणि विविध धर्म-भाषा यांनी बनलेल्या आपल्या देशाची माती सहिष्णू बनली आहे कारण त्याशिवाय या मातीत गुण्या गोविंदाने कुणालाच जगता येऊ शकणार नाही. सतत माझी जाती-धर्म-भाषा श्रेष्ठ म्हणत दुसऱ्याच्या जीवावर उठायचं ठरवलं तर उद्या इथे रक्ताच्या पाटापलीकडे काहीही शिल्लक राहणार नाही. म्हणून पिढयानुपिढ्यांच्या मशागतीनंतर सहिष्णू जगणं तयार झालंय. जी आपली सगळ्यात मोठी ताकद आहे. आपण भिन्न असलो तरीही आनंदाने एकत्र राहू शकतो यात असणारी विलक्षण ताकद, सामर्थ विसरून माणसं कप्पाबंद आयुष्य जगू बघतायेत. माणसाला एखाद्या छोट्या चौकोनी खोलीत बंद करून टाकलं आणि तिथं ऊन, वारा, नवा चेहरा यातलं काहीही येणार नाही, दिसणार नाही याची काळजी घेतली, त्या खोलीत कोंडलेल्या माणसाला कुणाशीही बोलता येणार नाही याची काळजी घेतली तर त्या माणसाचं काय होईल, तसं काहीसं आता आपल्या समाजाचं झालं आहे असं अनेकदा वाटतं. सगळं कोंडलेलं. कोंदट. कुबट. 

मी शाळेत होते तेव्हा माझे मित्र मैत्रिणी कुठल्या जाती धर्माचे आहेत याकडे माझ्या पालकांचं लक्ष नसायचं. रादर कुणाच्याच पालकांचं नसायचं. तो महत्वाचा मुद्दा नव्हता. पण आज आजूबाजूला बघितलं तर आपल्या मुलांनी कुणाशी मैत्री करायची, याचे निर्णयही पालक घेऊ लागले आहेत. लहान मुलं सुरक्षित नाहीत. चाईल्ड पोर्नोग्राफीचा भारत मोठा ग्राहक आहे यातच आपली विकृत सामाजिक मनोवृत्ती दिसते. जातीबाहेर लग्न केलं म्हणून स्वतःच्या गर्भार मुलीला जाळणारे वडील हा आपल्या समाजाचा कर्तृत्ववान चेहरा आहे. आणि अशा बापाचं समर्थन करणारे हे समाजाचं भीषण वास्तव. माणासांना मारणे गैर आहे, चूक आहे ही  जाणीव नसलेला आणि आदीम भावनांना खतपाणी घालून त्याच कशा योग्य आहे हे ठसवायला निघालेला आपला समाज बनला आहे. 

हे अचानक बनलेलं नाही..हळूहळू रुजत आता प्रस्थापित होऊ बघतंय. 

रोजच्या जगण्याच्या धबडग्यात माणसांच्या मनातला कोलाहल आता उघड उघड अंगावर येतो आहे. शहरं बकाल झाली आहेत. माणसं नुसतीच धावत आहेत. गावांच्या समस्या आहेत तशा आहेत. शेतकरी अस्वस्थ आहेत. बेकारी वाढली आहे. कर्मठपणा वाढतो आहे. माणूस असुरक्षित झाला की तो त्याचं जगणं जाती-धर्मात शोधायला सुरुवात करतो. आपण असुरक्षित मनाच्या माणसांचा देश बनलोय का? अशा रक्तासाठी चटावलेल्या देशात आपण आपल्या पुढच्या पिढ्यांना वाढवणार का? त्यांना आपण कसा आणि कसला समाज देऊ करतोय याचा थोडा तरी विचार आपण करणार की नाही?

सरकारं येतात जातात. राजकारणाच्या गणितात आपण सामान्य माणसांनी, जो हे देश खऱ्या अर्थाने चालवतात त्यांनी किती वाहवत जायचं, किती अडकून पडायचं हे ठरवण्याची वेळ आली आहे. कुठलं सरकार येतं याहीपेक्षा आपल्या समाजाची रक्तपिपासू वृत्ती बदलणं जास्त गरजेचं आहे. सतत रक्ताची तहान लागल्यासारखा दिसतो आपला देश !

… खरंच इतकं रक्तपिपासू बनण्याची गरज आहे का आपल्याला?ज्या देशाने जगाला अहिंसा शिकवली त्या देशाला कधीही न शमणारी रक्ताची तहान लागावी? 

मातीतल्या सहिष्णुतेची बाधा सगळ्यांना पुन्हा एकदा होणं गरजेचं आहे. 

आपण एकमेकांच्या रक्ताला चटावलेला समाज नाहीयोत. हे पुन्हा पुन्हा एकमेकांना सांगण्याची गरज आहे. 

हा देश ग्रेट होता की नाही माहित नाही, पण तो ग्रेट व्हावा यासाठी जात-धर्म-पंथ-भाषा-लिंग भेदाच्या पलीकडे भारतीय म्हणून विचार करायला हवाय. नाहीतर पुढल्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. 

लेखिका : सुश्री मुक्ता चैतन्य

प्रस्तुती – श्री सुनील देशपांडे.

नाशिक मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments