सुश्री शिल्पा मैंदर्गी

☆ मनमंजुषेतून ☆ माझी वाटचाल…. मी अजून लढते आहे – 15 ☆ सुश्री शिल्पा मैंदर्गी ☆

सौ.अंजली गोखले 

(पूर्ण अंध असूनही अतिशय उत्साही. साहित्य लेखन तिच्या सांगण्यावरून लिखीत स्वरूपात सौ.अंजली गोखले यांनी ई-अभिव्यक्ती साठी सादर केले आहे.)

हा माझा नृत्याचा प्रवास सुरू असताना आणि अडचणी मला अजगरा सारख्या तोंड पसरून गिळंकृत करायला बघत असताना माझ्या बाबतीत काही चांगल्या घटनाही घडत होत्या. त्या गोड आणि रमणीय आठवणी मध्ये मला आपल्या वाचकांनाही सहभागी करून घ्यायचे आहे. त्या माझ्या आठवणींचे बंध जुळले आहे ते त्या माझ्या ताई,गोखले काकू,श्रद्धा, आई बाबा, टि म वीअनघा जोशी, माझे भाऊ बहिणी, इतर कामात मदत करणाऱ्या माझ्या मैत्रिणी, रिक्षावाले काका आणि प्रेक्षक सुद्धा.

ताईंच्या विषयीचे खास गोड आठवण मला इथे नमूद करावीशी वाटते. मी नृत्याच्या अगदी सुरुवातीच्या काळात शिकत असताना, बऱ्याच वर्षांनी काय चित्र दिसणार हे मला माहीतही नव्हते. समाजा ची प्रतीक्रीया काय असेल हेसुद्धा माहिती नव्हते. नृत्य सुरू राहील की नाही, आपल्याला जमेल की नाही अशा साशंक मनस्थितीत असताना त्यांनी मला अचानक सांगितले की दिवाळीनंतर असणाऱ्या सुचिता चाफेकर निर्मित कला वर्धिनी तर्फे होणाऱ्या”

नृत्यांकूर “कार्यक्रमात तुला तिश्र अलारपू म्हणजे नृत्यातला पहिला धडा सादर करायचा आहे. पुण्यामध्ये मुक्तांगण या हॉलमध्ये. हे ऐकून मी कावरीबावरी अन गोंधळून गेले. कारण स्वतः ताईंनी माझी पुण्यातल्या कार्यक्रमासाठी निवड केली होती. तिथे माझे कोणी नातेवाईक नसल्याने ताई मला त्यांच्या माहेरी घेऊन गेल्या. तिथे विश्रांती जेवण करून आम्ही लगेच हॉलवर गेलो. मी नटून-थटून मेकअप रूममध्ये तयार होऊन बसले होते आणि  बाहेरच्या गर्दीतून ताई आल्या. त्यांनी मला टेबल वर बसवलं आणि स्वतः खाली जमिनीवर बसून माझ्या पायांना आणि हातांना सुद्धा अलता लावला आणि तो माझ्या आयुष्यासाठी मोठा सन्मानच होता.

माझा नृत्याचा कार्यक्रम खूप रंगला आणि स्वतः सुचेता चाफेकर आणि सर्व पुणेकरांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. तो दिवस माझ्यासाठी संस्मरणीय ठरला.

त्याच बरोबर भर दुपारी आपले सगळे व्याप बाजूला ठेवून,संसारातील कामे बाजूला ठेवून तीनच्या उन्हामध्ये माझ्या एम ए चा अभ्यास वाचून दाखवणाऱ्या गोखले काकूंना मी कधीच विसरू शकत नाही.

तिच्या कॉलेजचा अभ्यास करता करता माझ्यासाठी एम. ए. च्या लेखनिकाचं काम मनापासून करणारी, मला हसत खेळत साथ देणारी, मला हसवत ठेवणारी, इतर कार्यक्रमांनाही मेकप साठी मदत करणा री श्रद्धा म्हस्कर माझ्यासाठी अपूर्वाई ची मैत्रीण बनली.

टि म वी. मधल्या अनघा जोशी मॅडम त्यांनी मला लागेल ती मदत केली. त्याच बरोबर माझी दुसरी मैत्रीण सविता शिंदे माझी जीवाभावाची मैत्रीण जी मला  फिरायला फिरताना गप्पा मारायला अशी उपयोगी पडली. घरी सुद्धा आम्ही तासनतास गप्पा मारत असू. त्यातून एकमेकींच्या अडचणी समजून आम्ही एकमेकींना मदत ही करत असू.

ज्यावेळी मला घरातून क्लासमध्ये सोडायला कोणी नसेल त्यावेळी आमच्या चौकात ले रिक्षावाले काका बाबांना सांगत असतकी आम्ही शिल्पाला क्लास मध्ये सोडून आणि परत आणून सोडू. बाबा माणसांची पारख करून मला त्यांच्याबरोबर जाऊदेत.

म्हणून माझ्या मनात येतं की माझे खरे दोन डोळे नसले तरी अशा कितीतरी डोळ्यांनी मला मदत केली आहे आणि अशा असंख्य डोळ्यांनी मी जग पाहते आहे.

…. क्रमशः

© सुश्री शिल्पा मैंदर्गी

दूरभाष ०२३३ २२२५२७५

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments