सौ. अंजोर चाफेकर
☆ “उद्धरेत आत्मना आत्मानम्।” ☆ सौ. अंजोर चाफेकर ☆
राजस्थान रॉयल्सचा कप्तान संजू सॅमसन याची परवा इन्स्टाग्रामवर पोस्ट बघितली.
त्याचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो, दूर लांबवर नजर आणि डोळ्यात आशेची चमक.
त्याने खाली लिहिले होते,” वियप्पु थुनियित्ता कुप्पयम. “… म्हणजे माझा शर्ट माझ्या घामाने विणला आहे.
त्याला म्हणायचे होते, ‘ मी जो इथवर पल्ला गाठलाय तो केवळ कष्टाने, घामाने.आणि अजून खूप पुढे जायचे आहे.’
आयुष्यात पुढे यायचे असेल तर कष्ट आलेच. गीतेत कृष्णही हेच सांगतो,
“उद्धरेत आत्मना आत्मानम् ।”….. स्वतःच स्वतःचा विकास करत रहा.
विकासाचा रस्ता कायम अंडर कंस्ट्रक्शन असतो. अडचणींचे दगड, धोंडे ओलांडावे लागणार
… रफाल नडाल, २२ वेळा ग्रॅन्ड स्लाम जिंकला. उत्तम टेनिसपटू. तरीही अपूर्णतेची हुरहुर.
मनात जिद्द…. दोन,तीन महिन्यापूर्वी बेडरिडन होता. त्याची हिप सर्जरी झाली होती. त्याला स्वतःला तो टेनिस खेळू शकेल की नाही याची खात्री नव्हती. पण मनात दुर्दम्य इच्छा.मे महिन्यात पॅरीसमधे फ्रेन्च ओपन खेळण्याची. आणि तो इच्छाशक्तीच्या जोरावर पॅरीसमधे खेळला.
कृष्ण गीतेत सांगतो …..
आत्मनः म्हणजे मन बलवान करा.
मन याचा अर्थ अंतर्मन…. सबकाॅन्शस माईंड.
या मनात चांगले विचार, सकारात्मक विचार पेरत रहा.
या अंतर्मनाची शक्ती इतकी अफाट आहे की ते विचार सत्यात उतरतील.Thoughts will turn into things.
जाॅर्ज वाॅशिंग्टन गरीब होता. एका शाळेत शिपायाची नोकरी करीत होता.शाळा सुटायच्या वेळी घंटा वाजविण्याचे काम त्याचे होते. घंटा वाजवताना तो मस्करीत म्हणायचा,
“टण,टण,अमेरिकेचा प्रेसिडेंट वाॅशिंग्टन. ” .. हे रोज म्हणता म्हणता तो विचार त्याच्या अंतर्मनात
आपोआप झिरपत गेला.तो झपाटून गेला. त्याच्या कामाची व्याप्ती वाढली व तो खरोखर अमेरिकेचा अध्यक्ष झाला.
जसा समुद्रावरचा वारा जहाजाला कुठल्याही दिशेने भरकटवू शकतो तसेच मनही भरकटते.
पण जहाजाचे शीड जहाजाची दिशा ठरवते तसेच उत्तम विचार हे मनाच्या तारूची दिशा ठरवतात.
कृष्ण नंतर हे ही सांगतो, “ न आत्मानम्अवसादयेत् l “
… स्वतःची अधोगती करू नका…… स्वतःला कमी लेखू नका….. न्यूनतेची भावना नको.
… आपल्यातल्या उणिवा ओळखून त्या दुरुस्त करा.
थोडक्यात उन्नती साधायची असेल तर स्वतःचा कम्फर्ट झोन सोडावा लागतो. थोडी रिस्क घ्यावी लागते.
परवा आय.पी.एल. मॅचमधे विराट कोहली इतका तगडा बॅट्समन असूनही त्याला जाणवलं की स्पिनर्स- -समोर त्याचा स्ट्राईक रेट कमी होतो आहे. ही त्याची उणीव भरून काढण्यासाठी त्याने पंजाबसमोर खेळताना रिस्क घेतली. त्याने स्लाॅग स्वीपचा सरावही केला नव्हता. तरीही त्याने तो शाॅट मनात इमॅजिन करून मारला व सिक्सर्स घेतल्या.
थोडक्यात परिस्थितीप्रमाणे स्वतःला ढाच्यात बसवता आले पाहिजे.
स्वतःच्या उन्नतीचा मार्ग आपणच शोधला पाहिजे…….
© सौ.अंजोर चाफेकर
मुंबई
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈