सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
☆ स्मरणांजली… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
कै. सुहास विनायक सहस्त्रबुद्धे, माझे पती, एक डॉक्टर म्हणून सेवाव्रती, अतिशय मृदू स्वभावाचे, 11 एप्रिल 2024 रोजी त्यांचे निधन झाले आणि माझ्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली!
लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात आणि पृथ्वीवर ती जोडी अवतरते, तसे आम्ही दोघे संसारात बांधले गेलो. आमची दोन्ही घरे मध्यम परिस्थितीतील, शिक्षणाला महत्त्व देणारी, त्यामुळे माझ्या एम्.ए.पर्यतच्या शिक्षणानंतर स्वाभाविकच लग्नाचा विषय निघाला आणि डॉक्टर सुहास सहस्त्रबुद्धे ( एम बी बी एस्) हे स्थळ आल्यानंतर लवकरच आमचे लग्न झाले!
ह्यांच्याविषयी सांगायचे तर त्यांना मेडिकलला जाण्याची प्रथमपासूनच इच्छा होती. त्यामुळे चिकाटीने अभ्यास करून त्यांनी मिरज मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळवली. त्याचवेळी त्यांची इतर भावंडेही इंजीनियरिंगला, कॉमर्सला, अशी शिकत होती. माझ्या सासऱ्यांची सरकारी नोकरी होती. एकट्याच्या उत्पन्नात एवढ्या मुलांची शिक्षणे करणे खरोखरच अवघड होते. तरीही कै. मामा आणि कै.आई यांनी मुलांसाठी खूप कष्ट घेऊन शिक्षण पूर्ण केली..
M.B.B.S. झाल्यानंतर पुढे शिकण्याची इच्छा असूनही घरच्या परिस्थितीचा विचार करता यांनी सर्व्हिस करायचे ठरवले आणि मेडिकल ऑफिसर म्हणून पाटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर ते रुजू झाले. तो काळ आणीबाणीचा होता. त्यामुळे सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करताना खूपच त्रास सहन करावा लागत होता. नवीन नोकरी असल्यामुळे रजा, सुट्टी मिळत नसे, पण चिकाटीने ह्यांचे काम चालू होते. आणीबाणीतील आठ दिवसांच्या रजेत 20 फेब्रुवारी 1976 रोजी आमचे लग्न पार पडले!
पुढे तीन महिन्यानंतर म्हणजे मे महिन्यात आमचे पाटण येथे बिऱ्हाड झाले. संसाराची खरी सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने ह्यांची ओळख झाली.
ते नेहमी दवाखान्यात व्यस्त असत..तरी त्यातूनही सब सेंटर असलेल्या चाफळ, कोयना नगर या ठिकाणी दवाखान्याची व्हिजिट असली किंवा सातारला महिन्याची मीटिंग असली की जीपने आम्ही जात असू आणि तेवढीच ट्रीप करून येत असू. यथावकाश या संसारात मी ही रमले!
19 ऑक्टोबर 1977 रोजी केदारचा जन्म झाला. आम्ही दोघेही त्याच्या बाललीलात रमून गेलो. ह्यांना लहान मुलांची खूप आवड, त्यामुळे केदार खूप लाडका !
पुढे शिरपूरला बदली झाली.नोव्हेंबर 1979 च्या दरम्यान कन्या- प्राचीचा जन्म झाला आणि आमच्या चौकोनाचे चारी कोन पूर्ण झाले!
1981 मध्ये सांगली सिव्हिल हॉस्पिटलला ह्यांची मेडिकल ऑफिसर म्हणून बदली झाली. तेथे गव्हर्नमेंट कॉलनीत असलेल्या प्लॉटवर आम्ही घर बांधले व दवाखानाही सुरू केला. त्याच प्लॉटवर माझे धाकटे दीर – प्रकाश सहस्रबुद्धे यांचेही घर, दुकान होते. दोन्ही घरातील संबंध खूप छान होते. आता आमची दोन मुले, दिरांच्या दोन मुली, सासुबाई आणि आम्ही चौघे असे गोकुळासारखे नांदते घर झाले!
सिव्हिल हॉस्पिटल ला मेडिकल ऑफिसर म्हणून यांनी रक्तपेढीमध्ये असताना खूप काम केले. रक्तदान शिबिरे आयोजित करणे, नियमितपणे कॅंप घेऊन रक्त गोळा करणे , चाकोरी बाहेर जाऊन ही काही रुग्णोपयोगी कामे करणे हे चालू असे. सिव्हिल हॉस्पिटल मध्येच ब्लड बँकेवर मेडिकल ऑफिसर, CMO, RMO अशा वेगवेगळ्या पोस्टवर काम केले.हे काम करत असताना योग्य वेळी योग्य ते निर्णय घेणे त्यांना जमत असे.सर्वांशी मिळून मिसळून तसेच आपल्या पदाचा मान राखून ते काम करत असत.शांत स्वभावामुळे लोकांना त्यांचा आधार वाटत असे.याच काळात ओगलेवाडी, कवठेमहांकाळ,नांद्रे याठिकाणी मेडिकल ऑफिसर म्हणून त्यांनी चांगले काम केले.
सतत तीन वर्षे त्यांना शासनाचा उत्कृष्ट सेवेबद्दल पुरस्कार मिळाला. हे सर्व करत असतानाच त्यांचे सोशल वर्क ही चालू होते. एड्स जागृतीच्या काळात अनेक संस्थांमध्ये व्याख्याने, शिबिरे वारंवार घेत असतच. कन्या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींसाठी तेथे काम करत असलेल्या श्री. अडसूळ सर यांच्याबरोबर एक प्रोजेक्ट केला. शंभर मुलींची निवड करून त्यांना वर्षभर योग्य आहार, टॉनिकच्या गोळ्या तसेच दर महिन्याला वैद्यकीय तपासणी अशा तऱ्हेने मदत करून त्यांच्या हिमोग्लोबिन मध्ये वाढ करता येते हे या प्रकल्पाने दाखवून दिले. तसेच एकल पालक असलेल्या, लांबून येणाऱ्या मुली निवडून त्यांना येणारा बसखर्च देणे व कॉलेजमध्ये येण्याविषयी प्रवृत्त करणे यासाठी दहा मुलींवर दरमहा लागणारा खर्च स्वतः करून साधारणपणे पाच हजार रुपयांची मदत त्याकाळी त्यांनी केली.
नोकरीची बत्तीस वर्षे पूर्ण झाल्यानंतर नातवंडांसाठी पुणे आणि दुबई असे वास्तव्य केले. लहान मुलांची आवड त्यामुळे त्यांनी अत्यन्त आनंदाने जमेल तेवढी मुलांना मदत केली. आमचे स्नेही, बापट सर तर त्यांना कौतुकाने “बालमित्र” म्हणत!कोणत्याही लहान मुलाला रमवण्याची कला त्यांना अवगत होती.. “आता उरलो उपकारापुरता” म्हणत म्हणत 2015 पासून ह्यांनी ” स्वामी समर्थ डायग्नोस्टिक सेंटर” ला अगदी कमी मानधन घेऊन रोज तीन चार तास काम सुरू ठेवले होते.
कोरोनाच्या काळात तेथील काम बंद झाले होते. तसेच नकळत ह्यांना वयाची चाहूल जाणवू लागली होती..
गेल्या एक-दीड वर्षात घरातील काही दुःखद घटनांमुळे त्यांचे मन अधिकच हळवे झाले होते. त्या गोष्टीचा ह्यांच्या मनावर नकळत खोल आघात झाला..
तब्येत थोडीशी खालावली. तरीही ते आपला आहार, व्यायाम याबाबत खूप जागरूक होते.स्वत: मितभाषी होते पण सहवासात गप्पिष्ट माणसे लागत.त्यांना नातेवाईक आणि मित्रमंडळी त गप्पा ऐकायला आवडत असे.आणि एखादंच मार्मिक वाक्य बोलून ते वातावरण हलके फुलके ठेवत.
माझ्या साठी त्यांनी दोन महत्त्वाच्या गोष्टी केल्या.. एक म्हणजे मला प्रवासाची आवड म्हणून यूरोप ट्रीप ला पाठवले! दुसरं त्याहून महत्त्वाचे म्हणजे माझ्या लेखनाला प्रोत्साहन देऊन माझी दोन पुस्तके प्रकाशित केली! दुसऱ्या साठी करणे हा त्यांच्या मनाचा केवढा मोठेपणा होता.
प्रथमपासूनच त्यांच्या खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी अतिशय साध्या होत्या. शिळी भाकरी, दाण्याची चटणी आणि साईचं दही हा आवडता नाश्ता होता. जेवणामध्ये आमटीचे प्रेम फार होते. गोड पदार्थ जवळपास सगळेच आवडत असत पण “शिरा” हा त्यात अत्यंत आवडीचा! देवाची पूजा करणे हे आवडीचे काम होते. मन लावून देवपूजा करत असत, म्हणूनच की काय परमेश्वराने त्यांना जास्त त्रास होऊ न देता आपल्याकडे नेले. आमच्या घरात गोंदवलेकर महाराजांची भक्ती, सेवा केली जात असे. “श्रीराम” हा तारक मंत्र नेहमीच जपला जाई.
माझ्या संसारातील प्रत्येक आठवणीचा क्षण हा त्यांच्याशी गुंफलेला होता. आता क्षणोक्षणी ही आठवणींची माला माझ्या डोळ्यासमोर उभी राहते आणि जन्मोजन्मी आमची साथ अशीच राहू दे, ही परमेश्वर चरणी प्रार्थना करते !
© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे
पुणे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈