सुश्री नीता कुलकर्णी
☆ “मनाची शक्ती…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
आज तुम्हाला एक सत्य कथा सांगणार आहे ऐका….
ती सोसायटीत नवीनच राहायला आली होती .येता जाता बोलून सगळ्यांशी तीची मैत्री झाली. काही दिवसातच कळलं की ती तथाकथीत सुधारणावादी मताची आहे. अध्यात्म, पूजा मंत्र, स्तोत्र काही न.. करणारी …सडेतोड बोलणारी आहे.
तिच्याशी गप्पा तशाच व्हायच्या. हळदी कुंकवाला बोलावलं तर साडी नेसून येऊन जायची पण नंतर तिच्या कॉमेंट्स सुरूच असायच्या…. “तुम्हाला कंटाळा कसा येत नाही हे सगळं करत बसायला? तासंतास कस ग बसता त्या पोथ्या परत परत वाचायला? तीच तीच स्तोत्र म्हणून काय मिळतं तुम्हाला ?…नवीन काहीतरी जरा वाचा….”
आईने दिलेला बाळकृष्ण आणि अन्नपूर्णा तिने डब्यात ठेवून दिली होती. हे तिनेच आम्हाला सांगितले.
पहिले काही दिवस यावरून गरमागरम चर्चा व्हायची. ती त्याला ठामपणे उत्तर द्यायची. काही दिवसांनी लक्षात आलं त्यातून काहीच निष्पन्न होत नाहीये …मग मात्र आम्ही ठरवलं आता यावर बोलायचं नाही. मैत्रीण म्हणून ती छान आहे ना मग झालं …..
असू दे …आणि प्रत्येकाला स्वतःचं मत असतं त्याप्रमाणे तो वागत असतो.अस सुरू होत.. बरीच वर्षे झाल्यानंतर सगळ्यांना तिची सवय पण झाली..
नंतर एके दिवशी तिच्यावर एक वेगळाच प्रसंग ओढवला..
ती सकाळी उठली तर तिला बोलताना जीभ जड झाली आहे हे जाणवले. बोलणं अस्पष्ट यायला लागलं .नवऱ्याने प्रकरण गंभीर आहे हे ओळखलं .ताबडतोब तिला हॉस्पिटलमध्ये हलवलं. मेंदूत रक्तस्त्राव झाला होता .अगदी माइल्ड होता.. आणि लगेचच ऍडमिट केल्याने फार फायदा झाला.
हळूहळू सुधारणा होईल डॉक्टरांनी सांगितले .तरी बरेच दिवस ती दवाखान्यात होती .
नंतर बरी झाली पण उच्चार इतके स्पष्ट येत नव्हते.
तिला डिस्चार्ज मिळणार होता त्या दिवशी डॉक्टरांनी औषधं कशी घ्यायची खबरदारी काय घ्यायची हे नीट समजावले .आणि सहज म्हणाले..
“अजून एक तुम्हाला सांगू का ?घरी गेल्यानंतर तुम्ही मध्यम आवाजात रामरक्षा म्हणा. त्यात र शब्द अनेक वेळा आहे त्याचा परिणाम होतो .
प्रत्येक शब्द म्हणताना तोंड जमेल तेवढं उघडा.. जबड्याची हालचाल जास्तीत जास्त झाली पाहिजे. विष्णू सहस्त्रनाम म्हणालात तर अजूनच उत्तम…”
डॉक्टरांचे ते बोलणं ऐकून ती थक्क होऊन त्यांच्याकडे पाहतच राहिली. डॉक्टर असं काही सांगतील असे तिला वाटलेच नव्हते.
“हो हो” असं त्यांना म्हणाली .
घरी आल्यानंतर चार दिवसांनी तिच्या मनात काय आले कोण जाणे? डॉक्टरांनी स्वतः सांगितले आहे तर हा उपाय पण करावा असे तिला वाटले. फोन करून तिने मला हे सांगितले.
“तुला हे कसं सांगू असं मला वाटत होतं…”
तिला म्हटलं “अग तुला बरं व्हायचं आहे. आता बाकी काही बोलु नकोस. माझ्याकडे सज्जनगडावर रामदासीबुवांनी म्हटलेली रामरक्षा ऑडिओ स्वरूपात आहे. ती तुला पाठवते. ती तू ऐक .कुठल्याही दुकानात तुला रामरक्षेचे पुस्तक अगदी पाच दहा रुपयात मिळेल. ते आणून घे आणि बघून म्हण….”
तिचा गळा दाटून आला होता…. “नीता”.. एवढेच ती म्हणाली
” राहू दे उगीच अपराधी भाव मनात ठेवू नकोस.मात्र शांतपणे ,श्रद्धेने, मनोभावे म्हणत रहा. तुझा विश्वास नाही हे माहित आहे. तरी बरं होण्यासाठी तरी कर.. हा फिजीओथेरपीचा एक प्रकार आहे असं समज … थोडे दिवस करून तर बघ मग आपण निवांत बोलू “तिला म्हणाले.
काही दिवसांनी तिने मला भेटायला बोलावले .
“हे बघ” ती म्हणाली
बघितले तर चक्क… छोट्याशा देवघरात बाळकृष्ण अन्नपूर्णा ठेवले होते. शेजारी समई मंद तेवत होती .समोर दोन निरांजन तबकात होती. उदबत्तीचा मंद सुगंध येत होता. फुलं वाहिली होती. शेजारीच रामाचा फोटो होता .त्याला मोगऱ्याचा गजरा घातला होता. मी बघतच राहिले.
ती म्हणाली
“काय झालं माहित नाही… पण ऑनलाइन हे सगळं मागवलं अंतरंगातूनच काहीतरी वाटलं असं करावं ..खरंच ग… खूप शांत समाधानी वाटतं आहे .तुम्ही हे का करत होता हे आजारी पडल्यानंतर मला कळलं. इथे समोर बसून रामरक्षा म्हणताना काही तरी भारल्यासारखं वेगळच वाटत होतं .मला ते तुला शब्दात सांगता येणार नाही.”
” राहू दे गं …तु ते अनुभवलसं बरी झालीस हे महत्त्वाचं. आता तू पण हा आनंद घे.”
तिला पसायदान ,मनाचे श्लोक आणि हरीपाठ अशी पुस्तकं दिली .
तिचे डोळे भरून वाहयलाच लागले होते ……असु दे होत कधी असंही…
ती पूर्ण बरी झाली याच श्रेय डॉक्टरांनाच आहे. मात्र त्या अवघड वेळी तिला रामरायाने मानसिक आधार दिला …पूजा ,जप ,स्तोत्र पठण यासाठी तर करायचे असतात. प्रयत्न, कष्ट आपण करायचे असतात .पण त्याचा हात हातात असू द्यायचा. तो सांभाळतो.. कोणीतरी एका अदृश्य शक्ती आहे तिच्यावर विश्वास ठेवायचा .
जमेल तशी साधना करायची . श्रद्धेने भक्ती करायची.त्याने मन खंबीर बनतं.दोघांचा मेळ जमला की मग शरीरही बरं होण्यासाठी साथ देतं .
डॉक्टर तर तिला म्हणाले होते .. “काहीही येत नसेल तर नुसती बाराखडी तरी म्हणा.”
नाहीतरी श्रीकृष्णांनी तेच तर सांगितले आहे .
अगा बावन्न वर्णा परता
कोण मंत्रु आहे पांडूसुता
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈