सौ अंजली दिलीप गोखले

? मनमंजुषेतून ?

☆ भेट वाढदिवसाची –  लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले ☆ प्रस्तुती – सौ अंजली दिलीप गोखले ☆

चाळीस-पन्नास  वर्षांपूर्वीचा काळ….. शाळकरी  वय…

वाढदिवसाचं  एवढं स्तोम वाढलेलं नव्हतं  तेंव्हा…पण वाढदिवसाची वाट मात्रं पाहिली जायची..

एकाच कारणासाठी… भेटवस्तुंसाठी…

 

शाळेत  एखादी मुलगी गणवेश न घालता  रंगीत कपडे ( तो नवीनच असेल असे नाही ) घालून आली की तिचा वाढदिवस आहे, हे कळायचं..शाळेत स्टेजवरून तिचं नाव पुकारलं जायचं.तिला शुभेच्छा दिल्या जायच्या नि आम्ही  पोरी ” एक दोन तीन…एक दोन तीन..एक — दोन — तीन  ”  अशा  शिस्तबद्ध टाळ्या वाजवायचो…

” आपणही  टाळ्या  वाजवाव्यात की तसच उभं रहावं ”  या संभ्रमात ती वाढदिवसाळु  उत्सवमूर्ती  तोंडावर कसनुसे भाव घेऊन  कानकोंड्या अवस्थेत उभी राहिलेली  असायची!!

घरची जरा बरी  परिस्थिती असली तर शाळेत लिमलेटच्या गोळ्या नाहीतर रावळगाव चॉकलेट  वाटलंं  जाई…. अन् त्यादिवशी  “ती वाटणारी मुलगी” राणीच्या थाटात वावरत असे आणि  तिला मदत करणारी तिची मैत्रीण तिच्या दासीच्या..कारण तिला एक गोळी जास्तीची मिळायची!!

 

ती गोळी किंवा चॉकलेट खिशातून जपून घरी नेलं जाई  नि आम्ही  तीन भावंडे  त्याचे चिमणीच्या दाताने तुकडे करून  पुढचा तासभर ते चघळून चघळून खात असू..

आयुष्यातील आनंद नि त्याचा कालावधी वाढवण्याची सोपी युक्ती आम्हाला त्या गोळीनं 

आम्हाला शिकवली..!!

 

एके दिवशी  एका मैत्रिणीने  साधारण बटाटेवड्याच्या आकाराचा  बसाप्पाचा शिक्का असलेला  पेढा  वर्गातल्या प्रत्येकाला वाढदिवसानिमित्त दिला…आम्हाला  आश्चर्याने चक्कर यायचीच राहिली होती..!!

जेमतेम एखादी गोळी वाटणं सुद्धा परवडणं -नं-  परवडण्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या आम्हा पोरींना  प्रत्येकी एक एवढा मोठा  पेढा हा फार मोठा सांस्कृतिक धक्काच होता..

 

” तिचे वडील मोठे डॉक्टर आहेत..तिला न परवडायला काय झालं ?”  या घरातल्या शेरेबाजीनं…

” आपण एकतर डॉक्टर व्हायचं आणि अगदीच नाही जमलं तर किमानपक्षी डॉक्टरशी लग्न तरी करायचं ..आणि होणा-या  पोरांच्या  वाढदिवसाला  शाळेत पेढे वाटायचे ”  हा निश्चय मात्रं त्या नकळत्या वयात मनानं  केला!

 

वाढदिवस जवळ आला की दोन विषय मनात पिंगा घालू लागायचे….. नवीन कपडा मिळणं  नि मैत्रिणींना वाढदिवसासाठी  घरी बोलावणं…

 

तीन  मुलांची जबाबदारी असलेल्या  आमच्या माऊलीनं  घरखर्चातून  थोडे थोडे पैसे बाजूला काढून ठेवलेले असायचे..त्यातून  पुढची किमान तीन वर्षे अंगाला येईल एवढा घळघळीत कपडा शिवला जायचा..नि वर्षभरातील सा-या सणवारांना, लग्नकार्यांना तो  पुरवून पुरवून वापरला जायचा..!!

 

एखादे वर्षी  घरात कुणाचं तरी आजारपण निघायचं नि साठवलेले  सारे पैसे घरच्या डब्यातून डॉक्टरच्या गल्ल्यात जमा व्हायचे… त्यावर्षी  आईची  त्यातल्या त्यात नवी साडी  फ्रॉक नाहीतर  मॅक्सीचं रूप घेऊन वाढदिवसाला  आम्हाला सजवायची…!!

 

” आई, वाढदिवसाला मैत्रिणींना बोलवूया नं गं ”  ही  आईच्या मागची भुणभुण  काही मैत्रिणींच्या प्रेमापोटी नसायची..  तर असायची मैत्रिणींकडून  भेटवस्तू  मिळाव्यात म्हणून…!!

 

बरं त्यावेळच्या भेटवस्तू  तरी काय असायच्या..

एखादी  एक  रुपयाची  वही, पंचवीस पैशाची पेन्सिल, दहा पैशाचं खोडरबर, पंचवीस पैशाचं  ” सोनेरी केसांची राजकन्या ”  वगैरे  पातळ  कागदाचं गोष्टीचं पुस्तक, पन्नास पैशांचं  कानातलं..देणा-याची आर्थिक परिस्थिती  बरी  असेल तर  दीड-दोन रुपयांचं फाऊंटन पेन…

यातल्या ब-याच वस्तू  स्वस्त पडतात म्हणून  वर्षाच्या सुरुवातीलाच  घाऊक आणून ठेवलेल्या..

कानातलं  असंच कुणीतरी  दिलेलं पण न आवडलेलं…

गोष्टीचं पुस्तक घरातल्या सगळ्या मुलांनी  वाचलेलं…त्याचा आता नाहीतरी काय उपयोग म्हणून  त्याचं रुपांतर  भेटवस्तुत झालेलं…

 

बरं ..या वस्तू  देताना  त्याला  गिफ्ट पॅकिंग  वगैरे प्रकार  नाही… त्यांच्या  नैसर्गिक स्वरुपातच अवतरलेल्या… पण तरीही  त्यांचं खूप आकर्षण असायचं… तेवढंही  न मिळण्याचा  तो काळ होता…

म्हणून तर  पावडरचा डबा, टी-कोस्टर्स, कंपासपेटी  असल्या  महागड्या गिफ्ट्स देणाऱ्या  एका मैत्रिणीला  वर्गातल्या  प्रत्येकाच्या  वाढदिवसाला  बोलावलं जायचं…!!

 

भडंग, पातळ पोह्याचा चिवडा, कांदेपोहे , उप्पीट, एखादा लाडू  नाहीतर  डालड्यातला  शिरा…यातल्या दोन पदार्थांवर  वाढदिवस साजरा व्हायचा..!

 

मैत्रिणींकडून  मिळालेली वह्या, पुस्तकं, पेन्सिली, कानातली  वगैरे  अख्ख्या दुनियेतल्या खजिन्याचा आनंद देऊन जायची…. हा खजिना कुशीत घेऊन  निद्रादेवीच्या  सोबत घडणारी   स्वप्नांची  सैर  अद्भुत  आनंद  बहाल  करायची…!!

…. ते  दिवस  कसे भुर्रकन्  उडून  गेले  ते कळलच  नाही…फुलपाखरीच  होते ते..!!

 

आई -वडिलांचेही  दिवस पालटले  होते..केल्या कष्टांचं चीज झालं होतं..चार पैसे गाठीशी  जमले होते..

भाऊ , बहीण  मोठे  झाले..कमावते  झाले..

 

” तुला वाढदिवसाला  फक्त काय पाहिजे ते सांग…”  

जे  पाहिजे  ते  मिळू  लागलं  होतं…पैसा  आड  येतच  नव्हता…

 

पण  लहानपणाची  भेटवस्तूंची  ओढ  मात्र  कुठेतरी  आटली  होती…. वाढदिवसाचं  महत्त्व, लहानपणी  वाटणारं कौतुक  तारुण्याच्या  रेट्यात कुठंतरी  हरवून गेलं होतं..

 

लग्न  झालं  नि  चित्रपटातल्या  नायक-नायिकांच्या  वाढदिवसाच्या  भुताने  झपाटलं..

 वाढदिवसाला ” अलगदपणे  गळ्यात हि-याचा नाजुकसा नेकलेस घालणारा ”  किंवा  ” वाढदिवसाला  अचानक  विमानात बसवून  स्वित्झर्लंडला  नेणारा ”  किंवा  ” शे-दोनशे  लोकांना  भव्य घराच्या  भव्य हॉलमधे  बोलावून  पत्नीच्या वाढदिवसाची  सरप्राईज  पार्टी  करणारा ”  नायक  आणि  त्याने  पत्नीला  दिलेल्या  भेटवस्तू   प्रमाण  होऊ  लागल्या…

…… नि  ”  अगं  हे  सगळं  तुझच  आहे..तुला  पाहिजे  ते  घेऊन  ये  ”  असं  म्हणून  कर्तव्याला  प्राधान्य  देत  कामाला  निघून जाणारा   नवरा …त्या  नायकापुढे  अगदीच फिका  पडू  लागला..

प्रत्यक्षातलं  आयुष्य हे  चित्रपटापेक्षा फार वेगळं असल्याचा  धडा  या वाढदिवसाच्या भेटवस्तुंनी  शिकवला …नि  स्वत:च्या  वाढदिवसाची  खरेदी  स्वत:च  करायची  सवय  लागली…

 

लेकीच्या बालपणाबरोबर  मात्र  बालपणाने  पुन्हा आयुष्यात प्रवेश केला…

तिचा  थाटाने  साजरा केलेला पहिला वाढदिवस…

ती  छान दिसावी  म्हणून  तिला टोचत असतानाही   तिला  घातलेले  महागडे  ड्रेस,

स्वत:च्या  लेकरांच्या  वाढदिवसांना  फारशी हौस न पुरवू  शकलेल्या  आजी-आजोबांनी  दिलेल्या  सोन्या-चांदीच्या  भेटवस्तू , काका, मामा, मावशी, आत्यांनी  दिलेल्या गिफ्ट्स, निमंत्रितांकडून  आलेले  आहेराचे  ढीग….

” सगळं तुझं तर आहे, तुला हवं ते तू जाऊन आण ” असं म्हणणा-या  नव-याने  स्वत: जाऊन  लेकीसाठी  आणलेल्या  भेटवस्तू….. या  सा-यांनी  आयुष्यातल्या  रिकाम्या  जागा  भरून  काढल्या…

 

तिच्या  वाढदिवसाला  शाळेत  वाटलेल्या  भेटवस्तू, अगदी  पेढेसुद्धा…

तिला  पाहिजे तसे घेतलेले कपडे, दागिने, वस्तू..

तिच्या  मित्र-मैत्रिणींना बोलावून  साजरे  केलेले  वाढदिवस…

आणि  दोस्त कंपनीकडून  मिळालेल्या  गिफ्ट्सनी  सुखावलेली  नि  त्यांना  कुशीत घेऊन  स्वप्नांच्या  राज्यात  माझ्यासारखीच सैर  करणारी  माझी  छकुली…!!

 

शिंप्याकडच्या  कपड्यांची जागा  ब्रॅंडेड वस्तुंनी  घेतली…  चिवडा-लाडुच्या जागी इडली, पावभाजी, पिझ्झा-बर्गर  आला.

वही, पेन्सिल, पेनाऐवजी  चकचकीत  कागदात  गुंडाळलेल्या  महागड्या  भेटवस्तू  आल्या…

…. पण  वाढदिवस  नि  भेटवस्तुंच्या  बाबतीतल्या  भावना  मात्रं  तिच्या  नि  माझ्या  अगदी  तशाच  होत्या…तरल..हळव्या..!!

 

दरम्यानच्या  काळात  आई-वडील, सासुसासरे यांचे  साठावे, पंच्याहत्तरावे वाढदिवस  साजरे करून  त्यांच्या  अख्ख्या आयुष्यात  कधीही  साज-या  न केलेल्या  वाढदिवसांचं उट्टं काढण्याचा  नि  त्यांना  मोठाल्या  भेटवस्तू  देऊन  त्यांच्या  ऋणातून मुक्त  होण्याचा  केविलवाणा  प्रयत्न  केला…

पण  त्यांनी  दिलेल्या  “रिटर्न गिफ्टने ”  अक्षरश:  चपराक मिळाली  नि  आमच्याऐवजी त्यांनीच  आमच्या  सा-या वाढदिवसांचं  उट्टं  भरून काढलं!!

 

काळ  फार  वेगाने  सरला..

वाढदिवसाला  भरभरून  आशीर्वाद  देणारे  अनेक  हात  काळाचं बोट  पकडून  दूरवर  निघून  गेले…

” हॅं…वाढदिवस   घरी  कसला  साजरा  करायचा  !! ”   या  वयाला  लेक  पोचलीय…

आता  बहीण -भाऊ, दीर -नणंद  यांच्या  मुलांच्या  मुलांचे म्हणजे नातवंडांचे   वाढदिवस  साजरे होतायत..

मी  आजी  म्हणून  त्यांना  उदंड  आशीर्वाद  देतेय…

 

” थीम  पार्टीज,  डेकोरेशन, चकाकणारे  भव्य हॉल,  “खाता किती खाशील  एका तोंडाने  ”  अशी  अवस्था  करून टाकणारी  विविध  क्युझिन्स… 

मुलांचा आनंद नव्हे तर  स्वत:ची प्रतिष्ठा  दाखवण्यासाठी  दिलेल्या  नि  घेतलेल्या  भेटवस्तू…. 

मुलाचे नि आईचे  वाढदिवसासाठी  घेतलेले  हजारोंच्या किंमतीतील ब्रॅंडेड  कपडे..

 

या  झगमगाटात  मला  मात्रं  दिसते  ती  माझी  माऊली..वर्षभर पैसे साठवून  लेकरांचा वाढदिवस  साजरा  करणारी….. रात्रभर  जागून  मुलांच्या वाढदिवसासाठी  बेसन भाजणारी…

नि  आपल्या  लेकराच्या  आनंदासाठी  भेटवस्तू  म्हणून  स्वत:कडच्या  चारच साड्यातील  एक  साडी  फाडून  कपडे  शिवणारी.. त्यागाची  मूर्ती…!!

 

आता  माझीही  पन्नाशी  सरलीय…

वाढदिवस  येतात  नि  जातात..

भेटवस्तुंचं  आकर्षण  कधीचच  विरलय … आहेत त्याच  वस्तू  अंगावर  येतात..

पण  तरीही   वाढदिवसाची  ओढ  मात्रं  आजही  वाटते…

…. कारण  त्यानिमित्तांने  कितीतरी  जीवलगांचे , सुहृदांचे  फोन  येतात.. शुभेच्छा  मिळतात..

आणि  आपण  आयुष्यात   केवढी माणसं   कमावली  याची  सुखद  जाणीव  होते…!!

 आपण  अंबांनींपेक्षाही  श्रीमंत  असल्याची  भावना  मनाला  शेवरीपेक्षा  तरल  करून  टाकते…

 

दिवसाच्या  शेवटाला  या  शुभेच्छारूपी  भेटवस्तुंना  कुशीत  घेऊन  मी  समाधानाने  पुढच्या  वाढदिवसाची  वाट पहात  झोपी  जाते…!!

 

लेखिका : सुश्री नीला महाबळ गोडबोले    

सोलापूर

प्रस्तुती : अंजली दिलीप गोखले 

मोबाईल नंबर 8482939011

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments