☆ “परफेक्शनिस्ट आई…” – भाग – १ – लेखक : श्री बिभास आमोणकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆
आईसाठी गाणं हेच सर्वस्व होतं. तिने अनेक प्रकारचे त्याग त्या संगीताच्या, अमृताच्या पूजेसाठी केले. ते आम्ही सारं पाहत होतो. कुणाला असंही वाटेल की, तिच्या त्या अमृतपूजेमुळे आम्हाला आमची आई कमी मिळाली. पण तिने केलेल्या अनेक गोष्टींच्या त्यागापुढे आमचा त्याग काहीच नव्हता.
आपली आई ही इतरांसारखी हाडामांसाची आई असली तरी ती इतर आईंपेक्षा खूप वेगळी आहे, याची जाणीव आम्हा दोन्ही भावांना अगदी लहानपणापासून न कळत्या वयातही होतीच. सामान्यपणे आई शाळेत सोडायला वगैरे येते तसं आमच्याबाबतीत कधी घडलं नाही. ठरावीक पातळीपर्यंत ती आमची आई असायची आणि नंतर ती इतरांसाठी बरंच काही असायची. लहानपणी आयुष्यात प्रथमच चित्रकलेसाठी बक्षीस मिळालं तेव्हा ते नेऊन आईला दाखवावं अशी खूप इच्छा होती, धावत घरी गेलोदेखील, पण नंतर लक्षात आलं आई कानपूरला गेलीय मैफिलीसाठी, ती नाहीये घरात, मग मावशीला दाखवलं. अनेकदा मावशी आणि माई म्हणजेच आजी मोगुबाई कुर्डिकर याच आमची आई झाल्या होत्या. त्यांनी आमची जबाबदारी घेतली होती. आईसाठी गाणं हेच सर्वस्व होतं. तिने अनेक प्रकारचे त्याग त्या संगीताच्या, अमृताच्या पूजेसाठी केले. ते आम्ही सारं पाहत होतो. कुणाला असंही वाटेल की, तिच्या त्या अमृतपूजेमुळे आम्हाला आमची आई कमी मिळाली, पण तिने केलेल्या अनेक गोष्टींच्या त्यागापुढे आमचा त्याग काहीच नव्हता. शिवाय कळायला लागल्यापासून ती जे काही करते आहे ते एकाच वेळेस अद्भुत आणि दुसरीकडे रसिकांना परब्रह्माची अनुभूती देणारं आहे, याचीही प्रचीती आम्हाला येतच होती. त्यामुळे ती आम्हाला इतर आईंसारखी फार वेळ नाही देऊ शकली याचं आम्हा दोघाही भावांना कधीच वैषम्य नाही वाटलं. उलट आपणही तिच्या या साधनेच्या कुठे तरी कामी यायला हवं, तिच्या त्या अमृताच्या पूजेत आमचाही खारीचा का असेना पण वाटा असावा, असं सारखं वाटायचं. ती जे काही करते आहे त्याला तोड नाही, याची कल्पना होती. समजू उमजू लागल्यापासून तर तिच्या त्या कर्तृत्त्वाचा अभिमान वाटायचा. अर्थात, तिच्या त्या अमृताच्या पूजेत आम्ही करण्यासारखं काहीच नव्हतं; तिला त्रास होणार नाही किंवा तिच्या रियाझामध्ये खंड पडणार नाही अशा प्रकारे घरातला वावर असावा, हेच आमच्या हाती होतं. ते आम्ही परोपरीने राखण्याचा प्रयत्न केला इतकंच!
आई मैफिलीच्या दौऱ्यावरून परत येण्याच्या दिवशी आम्हीही इतर मुलांप्रमाणे तिची वाट पाहत बसायचो. त्या वेळेस मुंबईत फार कमी टॅक्सीज होत्या. आमच्या घराच्या दिशेने टॅक्सी येताना दिसली, की कोण आनंद व्हायचा. मग आमच्याकडचा रामा बॅगा घ्यायला खाली उतरायचा आणि आम्ही मात्र बॅगा काढून झाल्या, की त्याच टॅक्सीत बसून केम्प्स कॉर्नरच्या त्या खेळण्यांच्या दुकानात तिला घेऊन जायचो. ती दौऱ्यावरून थकून भागून आलेली असेल, दौऱ्याचे काय कष्ट असतात ते समजण्याचं ते वयच नव्हतं. आम्ही तिच्याकडून मग खूप लाड करून घ्यायचो. केम्प्स कॉर्नरचे दुकान असल्याने खेळणी महाग असत. पण बहुधा आम्ही काही गोष्टींना मुकलोय याची जाणीव तिलाही असायची आणि मग सारं काही विसरून तीही आमच्यात मूल होऊन रमायची त्या दिवशी. मग दुसऱ्या दिवसापासून आई परत वेगळी असायची. नंतर मोठे झाल्यानंतर आम्हाला आईच्या दिवसाचं मोल अधिक कळलं होतं!
बाबांच्याच शाळेत म्हणजे गिरगावात राममोहनमध्ये असलो तरी अनेकदा राहायला माईकडे (मोगुबाई) गोवालिया टँकला आणि कधी वरळीला मावशीकडे असायचो. सुट्टीच्या दिवशी आईला भेटायचो. मे महिन्यात अनेकदा मावशीकडेच असायचो. इतर घरांमध्ये अनेकदा आई मुलांना घेऊन शिकवायला बसते. तसं आमच्याकडे कधीच झालं नाही. आई शिकवायला बसली असती तर थेट संगीतकारच झालो असतो. पण आईच्या वागण्याबोलण्यातून नकळत झालेल्या संस्कारांमुळे खूप काही शिकलो. भाऊ निहार तबला शिकला, पण मी काही संगीताकडे वळळो नाही. नाही म्हणायला टाइमपास म्हणून तबल्यावर बसायचो. दोनच ताल जमायचे- सवारी आणि योगताल! पंधरा आणि साडेपंधरा मात्रांचे हे ताल फार कमी वाजवणारे आहेत. ते बहुधा आईच्या पोटातूनच आलेल्या अभिजात संगीताच्या संस्कारामुळे साध्य झालं असावं. माई तेव्हा आईला म्हणाली होती, बिभासची लय हलत नाही. ती बहुधा आईचीच देण होती. संगीताचं शिक्षण नसल्यानं सूर नाही ओळखता येत, पण त्याचा रंग सांगता येतो. सुरांच्या रंगांचं एक पॅरामीटर असतं. ते कळतं. ते युनिव्हर्सल स्केल आहे. त्यासाठी जो कान असावा लागतो, तो आईमुळे जन्मापासूनच तयार झाला असावा.
आईच्या प्रत्येक कृतीत परफेक्शन असायचं. काम करत असतानाही तिच्या मनात बहुधा ते संगीतच रुंजी घालत असावं. बॅक ऑप द माइंड तेच सुरू असायचं हे जाणवायचंही. जेव्हापासून, म्हणजे जन्मापासून ऐकू येतंय तेव्हापासून सतत आयुष्यात परफेक्ट सूरच ऐकत आलोय. मग ते आजीचे म्हणजेच माईचे सूर असतील नाही तर आईचे. त्यामुळे संगीताचं व्याकरण सांगता आलं नाही तरी चुकलेलं कळतं आणि कुठे चुकलंय तेही नेमकं कळतं. तिने केलेली प्रत्येक गोष्ट नेमकी व परफेक्टच असायची. मग ती तिने काढलेली रांगोळी का असेना. आईला रांगोळी प्रचंड आवडायची. ती सुंदर रांगोळी काढायची, तीदेखील चार फूट बाय चार फूट अशी मोठय़ा आकारात. दीनानाथ दलालांची चित्रं आईने रांगोळीत साकारलेली आम्ही अनेकदा पाहिली आहेत. तिने काढलेली रांगोळीची रेषाही रेखीव असायची. तिच्यासारखी रेखीव रांगोळी नाही जमली काढायला कलावंत असूनही. आधी कार्डबोर्डवर चित्र चितारायची आणि मग रांगोळीत. कदाचित कार्डबोर्डवरचा तो तिचा रियाझ असावा चित्रकलेचा. आई कविताही छान करायची. त्या कवितेतील शब्दही तेवढेच जपून वापरलेले आणि नेमके असायचे. त्या शब्दांमध्ये खोलीही आहे. पण या कविता आम्हा केवळ घरच्यांनाच माहीत आहेत. बाहेर कुणाला याची गंधवार्ताही नाही.
घरात असताना आई नेहमी तिच्याच जगात असायची. रात्री अनेकदा उशिरा झोप, सकाळी साधारण चार-पाच तासांचा रियाझ. अगदी शेवटच्या दिवसापर्यंतही हे चुकले नाही. अलीकडे तर लोक विचारायचे, ‘आता या वयात कशाला रियाझ?’ त्यावर ती म्हणायची, ‘हा माझा श्वास आहे. ज्या दिवशी गाणार नाही त्या दिवशी या जगात नसेन!’ रात्री उशिरा झोपायची. अनेकदा दीड- दोन वाजायचे. त्यामुळे दुपारची झोप तिच्यासाठी महत्त्वाची असायची. कधी फार भेट झाली नाही तर खोलीत फक्त डोकावायचं. गानसमाधी लागलेली असताना तिला काहीच कळायचं नाही. पण कुणाला शिकवत असेल तर तिला लक्षात यायचं, मग बाहेर येऊन आवर्जून विचारपूस करायची. ती काही मिनिटांची तिची भेटही आमच्यासाठी खूप काही असायची.
आम्ही आईसाठी काय त्याग केला याहीपेक्षा आईने संगीतासाठी किती त्याग केला ते अधिक महत्त्वाचं आहे. आम्ही ते सारं जवळून पाहिलंय. अप्पा जळगावकर आईच्या मैफिलीच्या वेळेस साथ करायचे. त्या काळी अनेकदा त्यांनी तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून रेल्वेप्रवास केलेला असायचा. कार्यक्रमही अनेकदा मोफतच केलेला असायचा, एखाद्या संस्थेसाठी धर्मादाय म्हणून. हे असं तिने अनेकदा धर्मादाय कार्यक्रम करणं आवडायचं नाही. तिला आम्ही नाराजीही अनेकदा सांगायचो, पण तरीही ती ते करायची. अनेकदा ती रागीट वाटायची किंवा मानी. पण विमानतळावर विमानाला उशीर झाल्यानंतरही व्हीआयपी लाऊंजमध्ये प्रवेश नाकारल्यानंतर तिने कधी तमाशा नव्हता केला. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण तिने कधी मिरवले नाहीत. तिच्यासाठी ‘गानसरस्वती’ हाच सर्वात मोठा बहुमान होता. कधी तिने स्वत: तापाने फणफणत असताना कार्यक्रम केले आहेत, तर कधी आम्ही तापाने फणफणत असतानाही जाऊन कार्यक्रम केले. हे कार्यक्रम मिरवण्यासाठी नव्हते तर ती तिच्यासाठी अमृताची पूजा असायची, याची आम्हालाही कल्पना होती. पण याची कल्पना नसलेले रसिक मग ताई साडेनऊ वाजले तरी स्टेजवर नाही म्हणून कागाळी करायचे. कधी तिला मनासारखी वाद्यं लागलेली नसायची, तर कधी इतर काही कारण असायचं. ती परफेक्शनिस्ट होती. त्यामुळे कधी वेळ व्हायचा. हे सारं मी जवळून पाहिलं आहे.
– क्रमशः भाग पहिला
लेखक : श्री बिभास आमोणकर
प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈