??

☆ “परफेक्शनिस्ट आई…” – भाग – २ – लेखक : श्री बिभास आमोणकर ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित ☆

सुमारे दहा वर्षं तिचा आवाजच गेला होता, तो तिच्या आयुष्यातील सर्वात भीषण, पण त्याचवेळेस तिला आणि आम्हा कुटुंबीयांनाही खूप काही शिकवून गेलेला असा काळ होता. त्यातून तावून सुलाखून बाहेर पडलेली आई वेगळीच होती. त्या दहा वर्षांच्या कालखंडात ती एकटीच होती. साथीला कुणीही नसायचं, ना कुणी शिष्य, ना इतर कुणी. त्या वेळेस तिचं अखंड चिंतन सुरू होतं. विभा पुरंदरे यांनी त्या कालखंडात आईला जी साथ दिली त्याला तोड नाही. त्या कॉलेज संपल्यानंतर यायच्या रोज. आई काय पुटपुटते आहे ते समजून तिच्याशी संवाद साधायच्या. त्यांचे ऋण आहेत आम्हा कुटुंबीयांवर. वैद्य सरदेशमुखांकडे तीन र्वष आईचे उपचार सुरू होते. दर शनिवारी आईसोबत पुण्याला औषधोपचारासाठी जायचो. तेव्हा जाताना ती आईच असायची अनेकदा. पण तिला बोलता यायचं नाही. उपचारादरम्यान, तिने जे सहन केलंय ते दररोज पाहत होतो. फार कळण्याचं वय नव्हतं, पण जे पाहिलं त्याचा अर्थ आणि मोल नंतर कळत गेलं. त्या वेळेस तिने भरपूर वाचन आणि चिंतन केलं. ‘स्वरार्थरमणी’ हे तिचं पुस्तक त्याच काळातील चिंतनाचं संचित होतं. एक मात्र होतं की, ती चिंतनात आहे किंवा दु:खात आहे म्हणून घरात संवादच झालेला नाही, असं कधीच झालं नाही. घरात ती छान स्वयंपाकही करायची. शेवयाची खीर मला आवडते म्हणून अनेकदा करायची. मला केव्हा ती खीर हवीहवीशी वाटायची हे तिला नेमकं कळायचं. स्वयंपाक मनापासून आवडायचा. माईपासूनच ते परफेक्शन तिच्याकडे आलेलं असावं. तिने चिरलेली भेंडी तुम्ही व्हर्निअर स्केल लावून तपासलीत तरी त्याच आकाराची असतील एवढं ते परफेक्शन होतं. वाटाणे सोलतानाही कधी सोललेले वाटाणे इकडे तिकडे पळताहेत असं झालेलं मी आजवर पाहिलेलं नाही. तिला चित्रकला, भरतकाम, वीणकाम सारं काही आवडायचं. तिचं वीणकामही पाहिलं आहे. त्यातदेखील एकही टाका तिरका जात नसे. गेलाच तर पूर्ण उसवून ती पुन्हा सारं नेमकं करायची. नातवांसाठी तिने स्वेटर्स वेळ काढून कधी विणली कळलंही नाही. साधं कामंही वेगळ्या पद्धतीनं करण्याची शक्ती तिच्यात होती. ईश्वरावर गाढ श्रद्धा होती. म्हणून जप किंवा पूजा करताना आम्ही तिला कधीच डिस्टर्ब होऊ दिलं नाही. ती खूप कौेटुंबिक होती. संगीतात जशी तिने कधी घराणी मानली नाहीत, तशीच तिने जातपातही नाही मानली. त्यामुळेच आमच्या घरात सर्व लग्नं आंतरजातीय झालेली दिसतील. माझं, भावाचं, आमच्या मुलांची. आमची लग्नं झाल्यावर आलेल्या सुना तिच्या मुली झाल्या होत्या आणि आम्ही जावयासारखे झालो होतो. सुनांवर तिने मुलांसारखंच प्रेम केलं. परफेक्शनच्या मागे एवढी असायची, की एकदा जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये कार्यक्रम तिच्या मनासारखा झाला नाही म्हणून परत एकदा जाऊन कार्यक्रम केला, त्याचे पैसे घेतले नाहीत.

वर्षांतून एकदा तिच्या वाढदिवशी मात्र आई वेगळी दिसायची. कारण एरवी तिचा थोडा धाक आम्हाला आणि शिष्यांनाही असायचा. मात्र आईच्या वाढदिवशी आम्ही सगळे एकत्र घरातच छोटा कार्यक्रम करायचो. त्यात नाच-गाणीही असायची. त्या दिवशी मात्र ती काहीच बोलायची नाही किंवा कदाचित आम्हीच तिला काही बोलू द्यायचो नाही. आई मुळात चांगली क्रीडापटूही होती, हे फार कमी जणांना माहीत आहे. ती उत्तम टेबलटेनिस खेळायची. ‘किस’ प्रकारात मोडणारी सव्‍‌र्हिस ती अप्रतिम करायची. चेंडूचा पहिला टप्पा आपल्या बाजूस टेबलाच्या कोपऱ्यावर आणि दुसरा टप्पा थेट प्रतिस्पध्र्याच्या भागात टेबलच्या कोपऱ्यावर! हा अप्रतिम प्रकार आम्ही अनेक वर्षांनंतर थेट ओरिसाला अनुभवला. मुरलीधर भंडारी ओरिसाचे राज्यपाल असताना ओरिसा येथील विद्यापीठाने आईला डी. लिट्. देऊन सन्मानित केलं, त्या वेळेस राजभवनावर टेबलटेनिसचं टेबल पाहून आईचे हात शिवशिवले आणि आम्ही पुन्हा एकदा ती सव्‍‌र्हिस अनुभवली.

एकदा आईची शिष्या नंदिनी बेडेकर बसली होती. भूप गात असताना तिने स्वरमंडल बाजूला सारलं आणि डोळ्यांतून अश्रूधारा सुरू झाल्या. ते आनंदाश्रू होते. ती म्हणाली, आज गायलेला भूप वेगळा होता, तो आजवर असा कधीच जाणवला नव्हता. आज वेगळा साक्षात्कार झाला. त्यानंतर अगदी अलीकडे तिला आनंदी पाहिलं ते नवी दिल्लीला झालेल्या तिच्या अखेरच्या मैफिलीनंतर. तिने त्या दिवशी स्वत:हून माझ्या पत्नीला, तिच्या सुनेला, भारतीला फोन केला आणि सांगितलं की, ‘‘आज मी खूश आहे, मी खूप छान गायले.’’ हा आमच्या सर्व कुटुंबीयांसाठी मोठाच धक्का होता. कारण ‘मी आज खूप छान गायले’ असे शब्द आईच्या तोंडून एवढय़ा वर्षांत कधीच ऐकल्याचं स्मरणात नव्हतं. ती मैफल, गाणं छान झालं तर मी तुला साडी देईन, असंही ती सुनेला आधी म्हणाली होती. तिचा फोन हा आनंदाचा धक्का होता.

याआधी तिला आनंद झाला होता तो माझी मुलगी तेजश्री हिने शास्त्रीय संगीताला वाहून घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा. तिने आमच्यापैकी कुणावरही या मार्गाने येण्यासाठी जोरजबरदस्ती केली नाही, ना कधी साधं बोलून दाखवलं. पण काहीही न करता तेजश्रीने घेतलेल्या निर्णयाचं तिला समाधान होतं. जे मला सांगायचं आहे व अपेक्षित आहे ते कळण्याची व समजून घेण्याची क्षमता तिच्याकडे आहे, असं मात्र ती सतत सांगायची. आता आजीच्या असामान्य कर्तृत्वासमोर उणे न पडण्याचं आव्हान तेजश्रीसमोर आहे. आई गेली त्या दिवशी ती पूजाघरात बसून होती. मी तिला सावरण्यासाठी गेलो तेव्हा ती इंग्रजीत म्हणाली, ‘आय डोन्ट वॉन्ट टू सी हर’ पण मी चुकून ‘सिंग’ एवढंच ऐकलं आणि हातपायच गळून गेले होते. म्हणून तिला पुन्हा विचारलं त्या वेळेस ती स्पष्ट म्हणाली की, त्या अवस्थेत तिला पाहावत नाही. तिच्या अंत्यसंस्कारासाठी निघालो तेव्हा तिने आईची मैफिलीची साडी व शाल कपाटातून काढली. ती म्हणाली, मैफिलीत जशी जायची त्याच वेशात तिला निरोप देऊ या. हा संपूर्ण कुटुंबासाठी अतिभावुक असा क्षण होता. अंत्यसंस्कारानंतर दुसऱ्या दिवशी दादरच्या चौपाटीवर तिच्या अस्थी विसर्जित केल्या, त्या वेळेस एरवी कचरा भरलेल्या त्या किनारपट्टीवर कचऱ्याचा मागमूसही नव्हता. भरती होती, लाटा वेगात येत होत्या. त्या वेळेस मी तेजश्रीला म्हटलं की, ‘‘गानसरस्वती’च्या स्वागतासाठी सारा आसमंत बघ कसा स्वच्छ झालाय. कारण तिला सारं स्वच्छ आणि नेटकं लागतं याची त्यालाच तर कल्पना असणार!’’ अस्थी हातात घेतलेल्या अवस्थेत माझा भाऊ निहार तिला म्हणाला, ‘‘हे सारं भौतिक आहे, नश्वर आहे. जे नश्वर नव्हतं ते ईश्वरी सूर तिने तुला दिले आहेत. ते तुझ्यात सामावलेयत ते आता आपल्यासोबत असतील!’’

आंबा म्हणजे आईचा जीव की प्राण. माईंचे यजमान भाटिया हयात असताना माईने खूप सुख अनुभवलं. नंतर परिस्थिती कठीण झाली. पण आईनेही ते सुख काही काळ अनुभवलं होतं. ती म्हणायची. आंबा म्हणजे ढीग पडलेला असायचा. आंबा म्हणजे तिच्यासाठी स्वर्गसुख असावे, असे अनेकदा जाणवायचे. मग आम्हीही मार्केटमध्ये पहिला आंबा आला की तिच्यासाठी घेऊन यायचो. आंबा खाताना ती जग विसरायची. फेर्नादिन आणि मानकुराद हे दोन गोव्यातील आंब्याचे प्रकार तिच्या भारी आवडीचे. हे अनेकदा पावसाळ्यात येतात. आंब्यासारखंच प्रेम तिने निसर्गावरही केलं. बकुळीची फुलं तिला प्रचंड आवडायची. माझं निसर्गप्रेम बहुधा तिच्या रक्तातूनच आलेलं असावं. निसर्गाबद्दल आईशी होणारा संवाद अनेकदा अमूर्त प्रकाराचा असायचा. ती फक्त व्यक्त व्हायची, मी समजून घ्यायचो. निहारकडे निसर्गाबद्दल फार कमी बोलणे व्हायचं. कलाकार असल्यामुळे माझ्याशी ते सूत जुळलं असावं. तिच्या गावचा किस्सा तिने एकदा सांगितला होता : कुर्डीला नदीकाठी घरं होतं. तिथे नदीकाठी वाढणारी बॅरींग्टोनिया रेसिमोसाची झाडं खूप होती. या झाडाला माळांसारखी फुलं येतात. काहीशी बारीक असलेल्या केसांसारखी दिसणारी. आई बसलेली असायची नदीकाठी आणि वारा आल्यावर ती फुलं खाली नदीच्या पाण्यात पडायची व वाहायची. आई म्हणाली होती, फुलांचं ते वाहणं पाहून आयुष्यात प्रथम ऱ्हिदम काय असतो ते कळला. निसर्गातही ती बहुधा संगीताचाच शोध घेत असायची!

– समाप्त –

लेखक : श्री बिभास आमोणकर 

प्रस्तुती : सौ. स्मिता पंडित

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments