सुश्री नीता कुलकर्णी
☆ “धावा…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
जनार्दन महाराजांच्या दिंडी बरोबर बहिणीने आणि मी आळंदी ते पुणे पायी वारी करायची ठरवली. त्या दिंडीचे नियोजन शैलाताई करत होत्या.त्यांनी सांगितले,
” पहाटे पवणेपाच वाजता सारसबागेच्या दारात या”..
अदल्या दिवशीच मी बहिणीकडे रहायला गेले.
बहिणीचा मुलगा डॉक्टर श्रीपाद पुजारी रात्री दोन वाजता दीनानाथ मधून घरी आला होता. म्हणून तिची सुन डॉक्टर दीप्ती पुजारी पहाटे साडेचार वाजता आम्हाला गाडीने सोडायला निघाली. रस्त्यावर निरव शांतता होती. अगदी कोणी सुद्धा नव्हतं .
परत जाताना ती एकटी कशी जाईल याची मला चिंता वाटली. पण बहीण अत्यंत विश्वासाने म्हणाली,
“अगं पंढरीराया नेईल तिला सुखरूप घरी .काळजी नको करू.”
अरे खरचं की…त्याच्यावर सोपवलं की मग सोपच होतं…
तिथे गेलो तर ट्रक ऊभा होता.स्टुल ठेवले होते. त्यावरून ट्रकमध्ये चढलो. पहिल्यांदाच ट्रक मध्ये बसलो होतो .त्याची पण गंमत वाटत होती.
ट्रक निघाला..शैलाताईंनी
“पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची सोडुनीया गाठ..”
म्हणायला सुरुवात केली..आम्ही पण त्यात सुर मिसळला..आनंदाची वारी सुरू झाली..
ट्रकने आळंदीच्या अलीकडे सहा सात किलोमीटर ला सोडले. तिथून वाहनांना बंदी होती. अनेक जण पायी चालत होते .आम्ही पण चालायला लागलो .
पुढे जाता जाता एकदम ज्ञानेश्वरांच्या पादुकांचा सजवलेला रथ लांबूनच दिसला. अलोट गर्दी होती .जागेवर ऊभ राहुनच दर्शन घेतलं. शैलाताई म्हणाल्या
“गर्दी कमी झाली की आपल्याला दर्शन मिळेल तेव्हा आपण घेऊ.”
नंतर आमचे शांतपणे छान दर्शन झाले. आमची दिंडी वारीत सामील झाली.
अभंग ,ओव्या ,आरत्या म्हणत, टाळ वाजवत अत्यंत आनंदात मार्गक्रमण सुरू होते.
कधी पाऊस, वारा, ऊन चालूच होते. पण मजा येत होती . मध्येच रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसुन नाश्ता झाला.
नंतर मात्र भराभर चालायला सुरुवात झाली . दीड वाजता जेवणासाठी थोडा वेळ थांबलो .थोडसंच खाऊन घेतलं आणि पुढे निघालो.
आम्ही सगळे पासष्ठच्या पुढच्या वयाचे होतो. पहाटेच उठलो होतो. तीन वाजल्यानंतर चालण्याचा वेग थोडा मंदावला.प्रथमच ईतकं पायी चालत होतो. काही वेळानी पुढच्या आणि आमच्या दिंडीत अंतर पडले.आम्हाला ते समजत होते.पण पाय आता जरा दमले होते.
शैलाताई समोर येऊन म्हणाल्या..
” आता आपल्याला धावा करायचा आहे”
धावा ?…
आम्हाला काहीच कळेना.
मग त्यांनी नीट समजावून सांगितले. दिंडीचे दोन भाग केले .मध्ये जागा थोडी मोकळी ठेवली .चालत चालत एका गटाने म्हणायचे..
“आमचा विठोबा “दुसऱ्या गटानी म्हणायचे “आमची रुखमाई”
मग काय झाली की धमाल सुरू…
आधी खालच्या आवाजात म्हणत होतो .नंतर आवाज चढवत चढवत वर नेला .अचानक एका क्षणी शैलाताई म्हणाल्या
“धावा “…..
शैलाताईंनी पळायला सुरूवात केली.त्यांच्यामागे आम्ही सर्वजण असलेल्या सर्व शक्तीनिशी पळायला लागलो.
त्या आवाजाचा,जल्लोषाचा, वातावरणाचा, भक्तीचा ,असा काही परिणाम झाला होता की कित्येक वर्षात न पळालेलो आम्ही धावत सुटलो…..
पुढची दिंडी गाठली आणि उंच आवाजात..
” पुंडलिक वरदा हारी विठ्ठल
पंढरीनाथ महाराज की जय
ज्ञानदेव महाराज की जय”
असा जयजयकार करीत वारीत सामील झालो. अपार आनंद झाला. थकलेल्या दमलेल्या मनाला उभारी आली.
परमेश्वराची मनापासून आळवणी केली आणि त्याचा धावा केला की तो जवळ येतोच….याची प्रचिती आली.
विठोबा ही आमचाच आणि रखुमाई पण आमचीच…..
आज हे सगळे आठवले …
मग लक्षात आले की..
प्रत्यक्ष जीवनातही कधीतरी हे घडते.
आपण रेंगाळतो, थोडे बेसावध होतो, थकतो आणि मग मागे पडतो… जीवनाला संथपणा कंटाळवाणेपणा येतो .
आपल्या अंगात शक्ती असते पण काय आणि कसं करायचं हे सुचत नसते.
” आमचा विठोबा आणि आमची रुखुमाई ” हे साधे शब्द नव्हते ते म्हणताना ताईंनी आधी आमच्या मनातले चैतन्य जागवले होते. चेतवले होते हे आत्ता लक्षात येते.
प्रेरणा देणारं असं कोणीतरी समोर येतं …आपल्याला शिकवतं, सांगतं, शहाणं करतं…
कधीतरी ते आपलं अंतर्मन सुद्धा असतं .मात्र प्रयत्न आपल्याला कसून सर्व शक्ती पणाला लाऊन स्वतःलाच करावे लागतात. मग ती गोष्ट साध्य होते.
आतून आपल्याला तिथपर्यंत पोहोचायची आस मनापासून हवी.
मानस श्रेयस असावे ..
त्यात पाऊले पांडुरंगाच्या वाटेने चालत असतील तर मार्गक्रमण अजून सोपे होते .
वारीत आपल्या आसपास असलेल्या लोकांना नुसतं बघायचं वृद्ध लोक, म्हाताऱ्या बायका आनंदाने हसत खेळत चाललेल्या असतात . डोक्यावर तुळशी वृंदावन,गाठोडं ,नाहीतर पिशवी काखेत कळशी , खांद्याला शबनम याचे त्यांना भान नसते…
अधीरपणे ते पुढे पुढे जात असतात त्यांच्या पांडुरंगाला भेटायला..
अर्थात आपला पांडुरंग कोणता… हे ज्याने त्याने मनाशी ठरवायचे …
आणि वारकऱ्यांसारखे त्या मार्गाने निघायचे….
मग तो भेटतोच…
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈