डॉ.सोनिया कस्तुरे
☆ पंढरीची वारी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆
पंढरीच्या वारीला सातशे / आठशे वर्षांपासूनचा इतिहास आहे. कोरोनाचा काळ सोडला तर यात खंड पडलेला आपल्याला दिसत नाही. काय असेल पांडुरंगाकडे? का जातात इतकी लाखो माणसं पंढरीच्या वारीला? इतकी धाव, इतकी ओढ का दिसते माऊलीच्या भेटीसाठी? पंढरीचा पाडुरंग भेटल्यावर खरंच समाधानी होतात का हे भक्त? ही भक्ती खरंच, खरी असते का?
वाळवंटी गाऊ आम्ही वाळवंटी नाचू,
चंद्रभागेच्या पाण्याने अंग अंग न्हावू ||
विठ्ठलाचे नाव घेवू होऊनि निसं:ग
नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग ||
इतकं निस्संग, निर्मळ, स्वतःला हरवून विठ्ठलात लीन होऊन जगता येते? बुद्धाच्या मते जीवन हे दुःखमय आहे. न शमणारी तृष्णा हे दु:खाचे मूळ कारण आहे. दुःख निवारणासाठी त्यांनी अष्टांग मार्ग आणि पंचशील सांगितले. दुःख आणि वेदनेचा प्रत्यय आपल्याला क्षणोक्षणी येत असतोच. सामान्य माणसाने वारी हे दु:ख निवारणार्थ साधलेला एक मार्ग तर नसेल..! वारीला जाता न येणाऱ्यांना खूप खंत वाटते का? असे अनेक प्रश्न मला विद्यार्थी जीवनात पडायचे..
आई म्हणायची,
सखू निघाली पंढरपूरा
येशी पासूनी आली घरा !
घरदार सोडून, अनंत व्याप सोडून लोक वारीला चालत जातात. सर्व सुखंदुःखं बाजूला सारुन एकमेकांना “माऊली” म्हणत, एकमेकांना नमस्कार करत अनेक स्त्री-पुरुष भक्तीमय वातावरणात विलिन होतात. तन-मन-भान विसरुन पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन होतात. देहभान विसरुन मनाच्या आनंदाचा वारकऱ्यांनी साधलेला हा परमोच्च क्षण असावा.
“पुंडलिक वर दे हरी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ महाराज की जय !”
असा जयघोष अखंड चालू असतो. पण या जयघोषात रुक्मीणी, जनाबाई, सोयराबाई, कुठेच नाहीत याची खंत मात्र माझ्या सारख्यांना वाटल्याशिवाय अजिबात राहत नाही. हा समतेचा भाग वेगळा असला तरी विचार करायला लावणारा आहे हे मात्र नक्की.
माझे आई वडील दोघेही विठोबाचे निस्सिम भक्त होते. आई दूसरा कोणताच देव मानत नव्हती. सर्व देवांचा देव म्हणजे विठोबा अशी तिची धारणा होती. वडीलांना संकष्टी सुद्धा करु द्यायची नाही. फक्त एकादशी करायची असा तिचा आग्रह. घरातले सगळेच एकादशी करायचे. आम्हा लहानांना ते ऐच्छिक होते. पण आम्ही वेगवेगळ्या पदार्थाच्या आशेने एकादशी करायचो. आठवड्यातून दोन वेळा भजनी मंडळासोबत घरी भजन असायचे.. एकनाथ षष्ठी, रामनवमी, गोकूळ अष्टमी, हनुमान जयंती, तुकाराम बीज हे सगळे दिवस अहोरात्र चोवीस तास भजन करुन साजरा केले जायचे. माझ्या आईने स्वाक्षरी करण्यापुरतीच अक्षरे गिरवलेली होती. ती कधी शाळेत गेली नव्हती. पण माझी आई म्हणजे लहानपणीची शाळा आणि मोठेपणीचे जीवन विद्यापीठ होते. सगळे अभंग तिला तोंडपाठ असायचे. तीचे बालपण कर्नाटकातले. वयाच्या अकरा-बाराव्या वर्षी लग्न होऊन महाराष्ट्रात जत येथे आली. केवळ कन्नड बोलता येणारी आई आमच्या मराठी शाळेतील शिक्षणामुळे आमच्याशी हळू हळू मराठी बोलायला शिकली. रेडीओवर लागणारे अभंग लक्षात ठेवून, आठवून, आठवून अभंग म्हणू लागली. भजनी मंडळात बऱ्याच वेळा ही एकटीच बाईमाणूस असायची. माझा विठोबा सगळं व्यवस्थीत करेल. हा तिचा विश्वास होता. वडील तलाठी नंतर सर्कल म्हणून प्रमोशन मिळाल्यावर नोकरी निमित्त बाहेर गावी असायचे आणि आई अभंगात रमून जायची. संतांचे अभंग हाच तिच्या ज्ञानाचा झरा होता. ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा यांचे त्यावेळी मंदिरात आणि घरी वाचन व्हायचे, ते ऐकायला ती जात असे. वडीलही तिच्या सोबत भजनात रमून जायचे. त्याच्या जगण्या वागण्यात बोलण्यात भक्तीचा सुगंध दरवळत राही. भजनी मंडळात अनेक जाती धर्माचे लोक होते. ते खऱ्या अर्थाने माणूस म्हणून जगत होते. पांडुरंगाच्या भक्तीने सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणले होते एका पातळीवर आणले होते. हा खूप मोठा आनंदाचा भाग होता. वारीने सर्व जातीतील स्त्री-पुरुषांना सामावून घेतले आहे. त्यामुळे आमच्या लहानपणी आम्हाला मानवता हा एकच धर्म माहीत होता.
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म । भेदाभेदभ्रम अमंगळ
तुका म्हणे एका देहाचे अवयव । सुख दुःख जीव भोग पावे
अशाच भावनेची कालची वारी होती. आजचीही वारी भक्ती या एकच भावनेने एकत्र चालते असे माझे मत आहे. अशा भक्तिमय वातावरणातले माझे बालपण.
आईचे सगळे लक्ष अभंगाकडेच असायचे. ती बऱ्याचदा मला विणा घेऊन भजनाला बसवायची.
तुकोबा म्हणतात तसे
“आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे”
अगदी अशीच होऊन जगायची माझी आई…
तुकोबांच्या अभंगानी तिला नवे विचार मिळाले. तीने कधी वड पुजलेला अथवा कधी कर्मकांड केलेले आम्हाला आठवत नाही. एवढेच काय ती चालत वारीला कधीच गेली नाही. मुलाबाळांना मागे ठेवून जाणे तिला मान्य नव्हते. मुलाबाळांना गर्दीत घेऊन जायला नको म्हणून आम्हाला लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत पंढरपूरला घेऊन जायची. वडील सोबत असायचे. आम्ही दोन दिवस तिथे मुक्काम करुन मनसोक्त दर्शन घेऊन परतायचो.
जनाबाईला दळण दळायला विठोबाने मदत केली. तशी आपली दुःखं कमी करायला आणि ती सहन करायला पांडुरंग आपल्याला बळ देईल किंबहुना तोच संकटाना सामोरे जाण्याचं बळ देतो असे तिला वाटायचे.
सेवाधर्मी पुण्य आहे सांगे सखा श्रीहरी
देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी
हे तीचं आवडतं गाणं. मी अभ्यासात रमायचे ती अभंगात रमायची. विपश्यना, विज्ञान, मानसशास्त्र यापैकी काहीच तिला माहित नव्हते. पण तिला जगणं, माणसांना समजून घेणं, आणि मनाचा समतोल साधणं माहित होते. म्हणूनच विवेकाच्या पातळीवर जाऊन अयोग्य वागणाऱ्या स्वतःच्या पोटच्या मुलाला घरातून बेदखल करणं तिला शक्य झाले असेल. सगळी सुखंदुःखं तुळसीच्या हाराच्या रुपाने पांडूरंगाच्या गळ्यात घालून ती किती सहज जगत होती..! हे मी पाहिले आहे. आज तीच्या या श्रद्धारुपी निष्ठेचे मला राहून राहून आश्चर्य आणि कौतुक वाटते. स्वतःच्या कर्तव्यात तिने कधी कसूर केली नाही. पहिला संसाराची वारी मग विठोबाची वारी. गरजेनुसार शेतातली काम सुद्धा ती न डगमगता, न कंटाळता आनंदाने करायची. तीच्या तोंडी सतत अभंग. ती काम करत अभंग गुणगुणायची.
“कांदा, मुळा,भाजी अवघे विठाई माझी.”
असे म्हणत तिची कामं चालू असायची. मला आठवतंय जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जायची तेव्हा एक गाणं ती नेहमी म्हणायची…
कर्तव्याला मुकता माणूस, माणूस ना उरतो
हलाहला ते प्राशून शंकर देवेश्वर ठरतो.
बहिणाबाईची कविता तिला माहित होती.
अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आईला कविता पाठ होती. रेडीओवर ऐकलेलं सगळं तिच्या लक्षात असायचं. माझ्यावर आध्यात्मिक संस्कार तिच्यामुळेच झाले.. तिच्या विठोबावरील भक्तीतला भाव आज मला कळतो. सगळं विठोबावर सोपवून ती किती आनंदी असायची ! आणि मी रोज नवे प्रश्न निर्माण करुन उत्तर शोधत राहते. विठोबा किंवा पांडुरंग म्हणजे आपण आपल्या जगण्या वागण्यात मनाशी केलेला एक उत्तम, निस्पृह, निर्मळ, विवेकी संवाद व निश्चय आहे. असे मला माझ्या आईच्या भक्तीतून जाणवले.
विज्ञानाने शरीरा बरोबर मनाच्या अगणित प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आणि योग्य उपचार पद्धती विकसित करण्यात यश मिळविले आहे. विज्ञानाकडून उत्तर मिळाले असले तरी विज्ञान आणि अध्यात्म हे एकमेकांना पूरक आहेत. येथे कर्मकांडाला अजिबात थारा नाही. हे आवर्जून ध्यानात घ्यायला हवे. विज्ञान आणि आध्यात्म यांची सांगड घातली तर आपल्याही मदतीला विठोबा/ पांडुरंग नक्की येईल. म्हणूनच
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण
एकवीसावे शतक हे मानसिक आजाराचे असेल असे काही तज्ञ लोक म्हणायचे. मला तेव्हा खरे वाटत नव्हते. असे होणे शक्य नाही असे मला वाटायचे. पण हे सत्य आहे. प्रत्येक चार माणसामागे एका माणसाला मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. यात स्त्रीयांची संख्या अधिक आहे. मी refer करत असलेल्या psychiatrist ची ओपीडी , hospitals तुडूंब भरलेली दिसतात. आपल्याकडे मानसरोगतज्ञ/ मानसविकार तज्ञ संख्येने तसे खूपच कमी आहेत.
माणसात देव अनुभवणारी, समुपदेशन आणि रुग्णसेवेत रमणारी, समतेचा आग्रह धरणारी मी. तुम्हा सर्वांना माऊलीच्या रुपात पाहते. माणसाच्या चांगुलपणावर माझा विश्वास आहे. आज माणसांचे जगणे सुसह्य करण्यासाठी त्यांच्या अडचणी समजून घेणे गरजेचे आहे. माणसाना बोलत करणं, प्रसंगी त्यांचा आवाज होणं, त्यांना व्यक्त होऊ देणं, त्यांच्या मनातील भाव-भावना केवळ शांतपणे ऐकून घेणं. त्यांच्या मनातील वादळांना वाट करून देण्याची नितांत गरज आहे. ज्याची त्याची लढाई, जो तो लढतोच असतो. केवळ आपण सोबत आहोत, सगळं व्यवस्थीत होईल, एवढंच सांगण्याची गरज आहे. महत्त्वाचे म्हणजे एखाद्याने मन मोकळं करण्यासाठी, मन हलकं करण्यासाठी आपल्यावर विश्वास ठेवून सांगितलेली गोष्ट त्यांच्या माघारी दूसऱ्या कुणाला सांगू नये. एवढे मोठे मन प्रत्येकाकडे असायला हवे. मनोविकारांना मात्र औषधोपचारीची गरज असते. हे विसरून चालणार नाही. शेवटी माणूसच माणसाच्या मदतीला येणार आहे. माणसा माणसातील प्रेमभाव मैत्र भाव टिकून राहणे त्यांचे संवर्धन होणे महत्त्वाचे.
माणसांच्या मनात भक्तीचा मळा फुलावा. जो जे वांच्छील तो ते लाभूदे ! आणि मानवी जगणे सुखाचे होऊदे. हीच मागणी माणसातल्या पांडुरंगाकडे.
माणूस जेव्हा एक पायरी वर चढतो तेव्हा तो देव होतो. माणूस जेव्हा एक पायरी खाली उतरतो तेव्हा तो राक्षस होतो.
आई , तू नाहीस हे माहित आहे तरीही..
।। भेटी लागी जीवा। लागली से आस ।।
© डॉ.सोनिया कस्तुरे
विश्रामबाग, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 9326818354
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈