डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ पूर्णविराम म्हणजे अंत कसा असेल ? – भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
6. डॉ मनीषा सोनवणे ही योगशिक्षक आहे. रस्त्यावर याचना करणाऱ्या लोकांच्या आयुष्यात सुद्धा एक छान पहाट यावी, आनंद लहरी तरंगाव्या यासाठी 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून रस्त्यावरील सर्व याचकांचा रस्त्यावरच योग अभ्यास घेतला.
हास्ययोगा घेऊन त्यांना थोडं हसवण्याचा प्रयत्न केला…!!!
रस्त्यावर चालणाऱ्या या योग अभ्यासामध्ये घराबाहेर काढलेल्या अनेक “आईंचा” समावेश होता.
मृत्यूचे अनेक पर्याय आहेत….
जन्म घ्यायचा तर आई शिवाय कोणताही पर्याय नाही… !
तुम्ही जगात कोणालाही भेटा…. आपल्याला नऊ महिने जास्त ओळखते, ती आपली आईच…!
या जगात सगळ्यात अडाणी कोण असतं तर ती आई… तिला हिशोब कळतच नाहीत..!
मुलांसाठी खाल्लेल्या खस्तांची नोंद ती कुठेही ठेवत नाही…
पण हि नोंद दिसते तिच्या रापलेल्या हातावर…! चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवर.. !!
आईला हिशोब कळतच नाहीत.. तरीही जगातली सर्वात मोठी गणितज्ञ तीच असते.
कायम पोरांच्या सुखाची बेरीज करत, पोरांच्या आनंदाचा गुणाकार करते. भेगा पडलेल्या टाचा घेऊन, पदरात कायम भागाकारच घेऊन फिरते. आयुष्याच्या एका टप्प्यावर तिला मुलांकडून वजा केलं जातं. या टप्प्यावर मग ती “शून्य” होऊन जाते.
संकटाच्या काळात मूल जेव्हा “एकक” म्हणून जगत असतं; त्यावेळी आधीची चुकलेली सर्व समीकरणे पुसून, ती त्या “एकक” मुलाच्या मागे उभी राहते आणि त्याला दशक बनवते… शतक बनवते…. सहस्त्र बनवते…!
आई, शेवटी स्वतः मात्र शून्यच राहते…!!!
रस्त्यात सापडलेली आई नावाची “शून्ये” आपण पदरात घेत आहोत…!!!
उकिरड्यावर पडलेली, हीच शून्ये गोळा करता करता…. मीच कधी श्रीमंत झालो… मलाच कळलं नाही…!
अन्नपूर्णा प्रकल्प
पूर्वी भीक मागणारी काही दांपत्य… यांच्याकडून आपण जेवण तयार करून घेत आहोत… (पोळी भाजी वरण भात)
या जेवणाचा एक डबा रु 50 प्रमाणे आपणच त्यांच्याकडून विकत घेत आहोत.
विविध हॉस्पिटलमध्ये अनेक गरीब लोक विविध योजनांखाली उपचार घेत आहेत परंतु त्यांना डबा आणून देणारे कोणीही नाही. अशा निराधार आणि निराश्रीत लोकांपर्यंत हे डबे आपण पोचवत आहोत.
(रस्त्यात दिसेल त्याला “दे जेवणाचा डबा” असं आम्ही करत नाही, यामुळे ज्याला गरज नाही त्याच्याही हातात अन्न जाते आणि तो नंतर हे नदीपात्रात फेकून देतो.. अन्नाची नासाडी होते)
जेवणासोबतच पाण्याची बाटली आणि विविध सणासुदीला लाडू, पेढे, शिरा किंवा इतर तत्सम गोड पदार्थ त्यांना देत आहोत.
खराटा पलटण
माझ्याकडे अशा अनेक महिला आहेत ज्यांना भिक मागायची नाही, काम करायचे आहे परंतु अंगात कोणतेही कौशल्य नाही.
मी आदरणीय संत श्री. गाडगे बाबांचा भक्त आहे. गाडगेबाबा पूर्वी हातात खराटा घेऊन गावेच्या गावे स्वतः स्वच्छ करून, इतरांनाही करायला लावत असत.
हिच कल्पना कपाळी लावून आपण “खराटा पलटण” या नावाने प्रकल्प सुरू केला आहे.
यात याचक महिलांना हाताशी धरून दिसेल तो सार्वजनिक अस्वच्छ भाग आम्ही सर्वजण मिळून स्वच्छ करत आहोत.
या बदल्यात त्यांना पगार किंवा पंधरा दिवस पुरेल इतका किराणा देत आहोत.
आमच्या सोबत काम करणाऱ्या या 100 महिलांना आपण युनिफॉर्म दिले आहेत.
आज आपले हे लोक काम करून सन्मानाने जगत आहेत.
आपण आंबा खातो पण त्याची कोय कधीही जपून ठेवत नाही…
काही लोकांचं आयुष्य सुद्धा तसंच असतं….
त्यांची मुलं बाळ सूना नातवंड त्यांचा गर काढून घेतात आणि आयुष्याच्या शेवटी कोय म्हणून फेकून उकिरड्यावर फेकून देतात…
लोकांनी फेकलेल्या अशा कोयी आपण उचलत आहोत आणि पुन्हा त्यांना जमिनीत रुजवण्याचा प्रयत्न करत आहोत…
त्यांना खत पाणी घालून तुम्ही हापूसचं आंब्याचं झाड आहात… याची जाणीव करून देत आहोत !
मनातलं काही …..
टळटळीत दुपारी, कडाक्याच्या उन्हात तहानेनं जीव व्याकुळ झाला; की आपण दुकानातून वीस रुपयाची पाण्याची बाटली घेऊन तोंडाला लावतो.
याच टळटळीत दुपारी आणि कडकडीत उन्हात तहानेनं जीव व्याकुळ झालेल्या रस्त्यावरील निराधार निराश्रित याचकांनी कुठे जायचं… ? पक्षी पाखरांनी कुठे जायचं…?
याचसाठी मार्च एप्रिल मे आणि मध्य जून पर्यंत आपण रस्त्यावर ठिकठिकाणी माठ भरून ठेवले होते.
पाणी भरण्याची जबाबदारी तिथल्याच एका याचकाला दिली होती.
पक्ष्यांसाठी नारळाच्या करवंट्यांमध्ये पाणी भरून ठेवलं होतं.
सुरुवातीला वाट्या घेऊन हे पाणी ठेवलं होतं… पण या वाट्या सुद्धा चोरीला गेल्या आणि नंतर माठही.
मला गंमत वाटते चोरांची… या बिचाऱ्यांना काय चोरावं तेच कळत नाही.
वाटी आणि माठ चोरून… ते विकून, किती पैसे मिळणार आहेत ? यातून किती आनंद मिळेल ??
चोरायचीच होती, तर एखाद्याची तहान चोरायची, एखाद्या तहानलेल्या मुखात पाणी घातलं असतं, तर त्यातून आयुष्यभर पुरेल इतकं समाधान मिळालं असतं.
स्वतःसाठी काही करून मिळवला जातो तो आनंद… परंतु दुसऱ्यासाठी काही करून मिळवलं जातात ते समाधान… !!!
आनंद थोडा वेळ टिकतो…. समाधान चिरकाल…!!!
माझ्या लेखांच्याही बाबतीत असंच होतं… माझ्या लेखांमध्ये काटछाट करून खाली स्वतःचे नाव टाकून अनेक लोक आपलाच लेख आहे, म्हणून बिनधास्त खपवतात, त्यावर नाटक काढतात, शॉर्ट फिल्म काढतात… त्यात माझ्या डोळ्यासमोर अनेकांना पुरस्कार मिळालेले मी स्वतः पाहिले आहेत, बातम्या वाचल्या आहेत.
असो; हा झाला त्यांचा तात्पुरता आनंद…!
पण माझे लेख चोरी करण्याऐवजी, माझं काम त्यांनी चोरी केलं असतं, एखाद्याची वेदना चोरी केली असती, तर मिळालं असतं ते आयुष्यभराचं समाधान… त्यांनाही आणि मलाही…!!! असो…,
मला अनेक वेळा विचारलं जातं, तुम्ही कोणत्या देवाची पूजा करता ? कोणत्या मंदिरात जाता ? की मशिदीत जाता ? की चर्चमध्ये जाऊन कॅण्डल लावता ??
मी या जगातला सगळ्यात भाग्यवान माणूस आहे…
माझ्या हाती स्टेथोस्कोप असतो, तीच माझी आरती… मी तोच ओवाळतो…!!!
दरिद्री नारायणाला, मी जी वैद्यकीय सेवा देतो तोच मी वाहिलेला नैवेद्य…
वेदनेनं तळमळणाऱ्या चेहऱ्यावर उमटलेलं हसू हाच मला मिळालेला प्रसाद…
रस्त्याकडेला, फुटपाथ वर गलिच्छ अवतारात पडून माझी परीक्षा घेणाऱ्या प्रभुजींना, मी रस्त्यातच अंघोळ घालतो, तोच मी केलेला अभिषेक… !
देवा, तुझ्यावर लाखो लिटर दुधाचा अभिषेक घालण्याची माझी पात्रता नाही, औकात नाही…
पण ओंजळीत बसेल इतकं दूध घेऊन मी तहानलेल्या बाळांच्या मुखात नक्की घालतो… या बाळांच्या बोबड्या बोलात मी इतका रमतो की मला मंदिरात यायची आठवणच राहत नाही…. मला माफ कर देवा…!!!
थंडीत कुडकुडणाऱ्या लहान पोरांच्या अंगावर आम्ही चादर चढवतो… आणि म्हणून या अल्लाह, मस्जिद मध्ये कधी यायला जमलंच नाही… मुझे माफ करिये…!!!
प्रभू येशू, चर्चमध्ये लावायची कॅन्डल, आम्ही कोणाच्यातरी मनात लावून आलो आहोत… Kindly forgive me… !!!
गुरुद्वारामध्ये मांडायचा लंगर आम्ही रस्त्यावरच मांडला आहे …. वाहे गुरुजी…. मैनु माफ कर दो…
आणि म्हणून मंदिर, मस्जिद, चर्च आणि गुरुद्वारा यापैकी कुठेही जायला मला जमतच नाही…!
ही जी पूजा मांडली आहे, या पूजेचा तुम्ही सर्वजण अविभाज्य घटक आहात आणि म्हणून हा लेखाजोखा आपणास सविनय सादर !
शेवटी एका सुप्रसिद्ध वचनाचा आधार घेऊन म्हणावेसे वाटते, “मी त्या “देवाची” पूजा करतो ज्याला लोक “माणूस” म्हणतात… !!!”
नतमस्तक मी आपणा सर्वांसमोर…!!!
प्रणाम !!!
— समाप्त—
© डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈