सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ “ऋतू बाभुळतांना…” ☆ सुश्री शीला पतकी ☆
ऋतू गाभूळताना ही माझ्या एका मैत्रिणीची सुंदर कल्पना आणि त्या कल्पनेचा विलास खूपच छान तिच्या निरीक्षणाला किती दाद द्यावी तेवढी कमी. मुख्य म्हणजे “गाभूळताना” हा शब्द तिने वापरला आहे तोच किती सुंदर आणि समर्पक आहे … आणि सहज माझ्या लक्षात आलं माझ्याच पेशातला ऋतू गाभूळत नाही तो बाभूळतो!… मंडळी आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बाभूळतो हा शब्द कुठे मराठीत?… अगदी बरोबर आहे तो आस्मादिकांचा शोध आहे.. म्हणजे गाभूळतो म्हणजे काय तर आंबट असलेली चिंच तिला एका विशिष्ट कालावधीत एक गोड स्वाद यायला लागतो आणि ती जी तिची अवस्था आहे त्याला आपण गाभूळणे असे म्हणतो!.. अगदी तसेच बाभूळणे या शब्दाचा अर्थ आहे. म्हणजे पहा शाळा सुरू होण्याचा कालावधी हा तसा गोड आहे आणि काटेरी सुद्धा आहे..
पालकांना वाटतं पोर शाळेत जाते चार पाच तास निवांत… पण त्याला साधारणपणे दीड महिना रिझवताना पालक मेटाकुटीला आलेले त्यामुळे मुलगा एक वर्ष पुढच्या इयत्तेत जातोय हा आनंद चार पाच तास घरात शांतता हे सुख पण त्याबरोबर शाळेची भरावी लागणारी भरमसाठ पी पुस्तक वह्या गणवेश ट्युशन कोचिंग क्लासेस सगळ्या चिंता सुरू होतात म्हणजे एकूण काटेरी काळ सुरु होतो त्या पोराचं करून घ्यायचा अभ्यास त्याला बसला वेळेवर सोडणे हे सगळं धावपळीचं काम सुरू होत मग ते सगळं काटेरीच नाही का? मग गोड आणि काटेरी याच मिश्रण करून मी शब्द तयार केला बाभूळणं! आता वळूयात आपल्याला लेखाकडे
ऋतू बाभूळताना…….!
सकाळी सकाळी वर्तमानपत्र घराच्या दारात येऊन पडतं मोठी हेडलाईन असते सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून दहा लाख पुस्तकांचे वितरण झाले. बचत गटाला बारा लाख गणवेशाची तयारी करण्याचे दिलेले काम वेळेत पूर्ण झाले… वृत्तपत्रात व टि व्ही वर अशा बातम्या सुरू झाल्या, शाळेच्या स्वच्छतेच्या छायाचित्रांचे नमुने यायला लागले ,शाळेत कसे स्वागत करावे याबद्दलच्या विविध कल्पना, विविध शाळेच्या माध्यमातून वृत्तपत्रात छापून यायला लागल्या की खुशाल समजावे ऋतू बाभूळतोय!
एप्रिल महिन्याच्या पाच सात तारखेला परीक्षा संपून पालक आणि विद्यार्थी हुश्श झाले. त्यानंतर शाळा संपल्या आणि घरामध्ये पोरांचा धुडगूस सुरू झाला!.. कॅरम बोर्ड बाहेर निघाले सोंगट्या आल्या पावडरी आणल्या गेल्या.. वाचण्यासाठी मुद्दाम आजोबांनी छोटी छोटी पुस्तक आणून ठेवली.. क्रिकेटच्या स्टम्स बॅट बॉल यांची नव्याने खरेदी झाली. विज्ञान उपकरणाचे किट्स यांचे नवीन बॉक्सेस घरी आले व्हिडिओ गेम फार खेळायचे नाहीत या अटीवर या सगळ्या गोष्टी दिल्या गेल्या घरातल्याच एका खोलीत ड्रॉइंग चे पेपर खडू कागद हे सगळं सामान इतस्ततः विखुरलेलं …फ्लॅटमध्ये अनेक छोट्या मुलींच्या भातुकलीचे घरकुल…. या सगळ्या विखुरलेल्या सामानाची आवरावर सुरू झाली की खुशाल समजावं ऋतू बाभूळतोय…!
मोबाईलच्या व्हाट्सअप ग्रुप वर शाळेचा मेसेज येतो … पेरेंट्स आर रिक्वेस्टेड टू अटेंड द मीटिंग विच विल बी हेल्ड ऑन धिस अंड दिस…. मग शाळापूर्वतयारीची सूचना देण्यासाठी पालकांच्या सभेची गडबड चालू होते. शाळा युनिफॉर्म चे दुकान सांगते वह्या घेण्याचे दुकान सांगते पुस्तके घेण्याचे दुकान सांगते सगळी दुकान वेगवेगळी… मग लगबग सुरू होते आणि गर्दीत जाऊन वह्या पुस्तके गणवेश.. पिटीचा गणवेश विविध रंगाचे दोन गणवेश.. ते कोणत्या वारी घालायचे ते दुकानदारच आम्हाला सांगतो. रस्त्यावर मग छत्री रेनकोट स्कूल बॅग्स डबे पाण्याच्या बॉटल्स यांची प्रदर्शना मांडली जातात आणि खरेदीची झुंबड उडते मग बूट मोजे पुस्तक वह्या यांचे कव्हर्स ही सगळी खरेदी सुरू झाली की समजावं ऋतू बाभूळतोय. .!
घरामध्ये आजोबांची सर्व वह्यांना कव्हर घालून देण्याची गडबड सुरू होते मग कात्री डिंक यांची शोधाशोध त्याबरोबर आम्ही आमच्या वेळेला कसे कव्हर घालत होतो.. जुन्या रद्दीच्या पानांची वही कशी शिवत होतो या कथाही ऐकायला मिळत अशा कथांची पुनरावृत्ती सुरू झाली की समजावं ऋतू बाभुळतोय…
किचन मधल्या खोलीत आई आणि आजी यांची आठ दिवस मुलांना डब्यात काय काय द्यायचं याची कच्ची तयारी सुरू झाली की समजावं ऋतू बाभळतोय…! मुलाचे कोणते विषय कच्चे आहेत याचा पुन्हा एकदा अभ्यास करून कोणाकडे त्याच्या खास ट्युशन लावाव्यात याची पालक मैत्रिणींशी तासंतास फोनवर गप्पा आणि चर्चा सुरू होते आणि एक गठ्ठा निर्णय घेऊन त्या सगळ्या पालकिणी त्या शिक्षकांना भेटायला जातात…. तेव्हा खुशाल समजाव की ऋतू बाभुळतोय !
कॉलनीच्या मधल्या मैदानातलं पोरांचं गोकुळ नाहीस होऊन ती शाळेत जाणारी पोरं गंभीर चेहऱ्याने घरात एकत्र आली आणि त्यांच्या चर्चा सुरू होतात…. आता सुरू झाला बाबा ते होमवर्क पूर्ण करा त्या क्लासेस ना जा शिवाय मम्मीचा अट्टाहास ..एखादी कला पाहिजे म्हणून त्या तबल्याच्या क्लासला जा..! एक म्हणतो मी तर रोज देवाला प्रार्थना करतो ती खडूस टीचर आम्हाला येऊ नये काय होणार कुणास ठाऊक?… दुसरा म्हणतो ती टेमीना मॅडम आम्हाला आली तर फार छान रे.. ती शिकवते पण छान आणि पनिश पण फार करत नाही…. स्कूलबस चे अंकल तेच असावेत बाबा जे गेल्या वर्षी होते ते खूप मज्जा करतात…. अशा चर्चा सुरू झाल्या की खुशाल समजावं ऋतू बाभूळतोय!
कॉलनीतल्या सगळ्या मुलांनी आणि पालकांनी मिळून केलेली सहल कॉलनीच्याच प्रांगणात केलेले एक दिवसीय शिबिर भेळ ..आईस्क्रीम सहभोजन ..वॉटर पार्क.. हॉटेलिंग सगळं संपून गुमान घड्याळाच्या काट्याला बांधून चालायचे दिवस आले की खुशाssल समजावं ऋतू बाभूळतोय….!
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈