सुश्री शीला पतकी 

? मनमंजुषेतून ?

☆ “गळके पत्रे, साप, आणि बॅटरी” ☆ सुश्री शीला पतकी 

आज शिकवणीच्या मुली जरा कुडकुडतच आल्या. शाळेतून येताना पावसात भिजल्या होत्या. घरी आल्यानंतर मी त्यांना पुसायला टॉवेल दिला थोडासा आलं घालून चहाही दिला. कारण माझी आई आम्ही शाळेतनं भिजवून गेलो की डोकं पुसायची आणि आम्हाला चहा करून द्यायची, आलं घातलेला…. तिच्या आठवणीने त्यांनाही चहा दिला. त्यानंतर मी त्यांना म्हटलं आज शिकवणे नको आपण थोडीशी वेगळीच चर्चा करूया. मग काय मुलींना आनंदी आनंदच .. 

 मी म्हणाले मुलींनो तुमची काही स्वप्न असतील तुम्ही आमच्या या कॉलनीत येता इथे असलेले सगळी मोठी मोठी बंगले वजा घरं.. प्रत्येकाच्या घरासमोर दोन दोन तीन गाड्या.. समोर विस्तीर्ण पटांगण बाग हे सगळं पाहिल्यावर तुम्हाला वाटत असेल ना की अशी घर आपली असावीत किंवा तुमचं काय स्वप्न असेल ते ते सांगायचं प्रत्येकाने…..! 

खुशी पटकन उठून म्हणाली;” बाई मी सांगते” मी म्हणलं सांग, ती म्हणाली, “आम्हाला असली मोठी घर वगैरे काही नको फक्त आमच्या घरावर जे पत्रे आहेत ते गळके देऊ नको चांगले पत्रे दे देवा “.मला काही उलगडा झाला नाही .मी म्हणाले म्हणजे? त्या म्हणाल्या,” अहो बाई आमचं घर सर्व पत्र्यातच आहे मातीच जोत उचलून घेतलेल आहे आणि त्यावर सर्व बाजूंनी पत्रे ठोकलेले आहेत सगळं घरच पत्र्याचे” 

मग त्या सगळ्याच मुली एका मागून एक बोलत्या झाल्या. म्हणाल्या बाई आम्हाला ना थंडीच्या दिवसात वरचे बाजूचे सगळे पत्रे थंड पडतात खाली फरशीमुळे जमीन थंड होते चुकून एखादं भोक जर पत्र्याला पडलेल असेल तर त्यातून लई गार वारा येतो आणि इतकी थंडी वाजते झोपच येत नाही दुसरी म्हणाली उन्हाळ्यात ते सगळं तापतं मग आम्ही समोरच्या झाडाखाली बसतो अंकिता म्हणाली आणि पावसाळ्यात चांगल्या जागेवर म्हातारी माणसं कामाला जाणारी माणसं झोपतात उरलेल्या जागेत  रात्रभर आम्ही गळक्या पत्र्याखाली भांडे भरत बसतो रात्री काय झोप मिळत नाही लाईट गेली असली तर बघायलाच नको….. 

गुड्डी म्हणाली बाई परवा आमच्याकडे तर साप निघाला मोठा…. वडिलांच्या उशाखाली होता चार दिवस झोप आली नाही आम्हाला…. अंकिता म्हणाली बाई माझे नवे बूट बाहेर ठेवले होते तर कुत्र घेऊन गेला .त्यावर गुड्डी म्हणाली आणि माझ्या घरात ठेवले होते तर उंदराने कुरतडले .बाई ते बूट ना आम्ही दुकानात गेलो तेव्हा त्या माणसाने त्याची किंमत पाचशे रुपये सांगितली मग बाबा म्हणाले खूप महाग आहेत सध्या जुनेच घाल मग मी त्या दुकानदार काकांना म्हणाले ओ काका द्या ना तीनशे रुपयांमध्ये मला तुमची मुलगी समजून द्या ना आम्हाला परवडत नाही पाचशे रुपये  आणि मग एवढं म्हणल्यावर त्या काकांनी मला बूट दिले आणि ते उंदराने कुरतडले. गुड्डी अगदी उत्साहात येऊन पुढे सांगत होती ..

बाई रात्री तर आम्हाला लय भ्या वाटतं आमच्या घरात बाथरूम नाही सरकारी संडासमध्ये बाथरूमला जावं लागतं ते घरापासून लांब आहे आई-बाबा दमलेले असतात आईला उठवलं तर ती लवकर उठत नाही अन मला बाथरूमला दम धरवत नाही मग मी एकटी तशीच अंधारात जाते मग अंकिता म्हणाली काही वेळेला तर आम्ही एकमेकांना हाक मारून जातो कारण आमची घर अगदी लागून असतात ना …मग मी विचारलं,” मग आंघोळीचं काय करता?” तेव्हा त्यामध्ये तीने सांगितले तुटके पत्रे लावून थोडी भिंत केली आहे त्याला बाजूने तरट लावतो आणि त्याच्यात आंघोळ करतो ….

सगळ्या मुली जे सांगत होत्या ते कल्पनेच्या पलीकडचे होते मी ताबडतोब माळ्यावरची जादाची पांघरूणे आणि रग काढले सतरंज्या काढल्या आणि त्यांना त्या वाटून टाकल्या म्हणलं किमान खाली दोन एक सतरंज्या एकावर एक घालून जाड करून झोपा रग घ्या त्याशिवाय माझ्या मैत्रिणीने त्यांच्यासाठी दिलेल्या पैशातून मी त्या सगळ्यांना एक एक बॅटरी घेऊन दिली अंधारात जात जाऊ नका. सोबत घेतल्याशिवाय जाऊ नका आता तुम्ही मोठ्या व्हायला लागलेला आहात. आसपासचे लोक चांगले नसतात… खूप गोष्टी मी त्यांना समजावून सांगितल्या. 

….  पण ती रात्र माझी अस्वस्थपणात गेली माझ्या पक्क्या बांधलेल्या घरात उबदार पांघरुणात मला शांत झोप येत नव्हती केवढी ही विषमता आमच्या मुलांना आम्ही किती जपतो जाड जाड रग मऊ गाद्या पावसाळा म्हणून विक्स लावा पायमोजे घाला  मफलर  बांधा आणि इथं ही फुलं त्या चिखलातही फुलत होती त्यांना आज कुणीतरी सगळे ऐकून घेणारा भेटल होत त्या सगळ्या मुली चौफेर माझ्याशी भरभरून बोलत होत्या आणि मी त्या अनोळख्या जगाची ओळख करून घेत होते हे सगळं आपण पाहिलेलं असतं वाचलेलं असतं पण प्रत्यक्ष अनुभवणारी लहान लहान लेकरं हे जेव्हा सांगतात तेव्हा वाटतं देवा असं का रे?… हा न्याय आहे ..?ही सगळी मुलं तुझीच रुप आहेत ना मग त्यांना सगळ्यांना सारखाच न्याय देना…! बहुधा देवानं माझी प्रार्थना ऐकली असावी माझ्यासारख्या एका प्रामाणिक संवेदनाक्षम शिक्षकाचे त्याच्याशी कनेक्शन झाल असावा 

या वर्षाच्या सुरुवातीला मुली मला सांगत आल्या बाई बाई आमचं घर मंजूर झालं बाई आमचं घर मंजूर झालं मला काहीच कळलं नाही त्या म्हणाल्या ती सगळी झोपडपट्टी जी आहे तिथे पक्की घर बांधायची आहेत त्यासाठी आमचे कागदपत्र भरून नेले आणि आता आम्हाला अडीच लाख रुपये मंजूर झाले ..!रमाई आवास योजनेअंतर्गत त्यांना ती रक्कम मिळाली या चार-पाच महिन्यात त्यांची घर बांधून झाली  पुढच्या महिन्यात त्यांच्या घराच्या वास्तुशांतीच्या पूजा होतील आणि मुली पक्क्या घरामध्ये राहायला जातील. घर मंजूर झाले हे सांगताना त्यांचा आनंद एवढा होता की विचारू नका ..

मी देवाला प्रार्थना केली देवा किमान प्रत्येकाला एक घर अंगाला अंग झाकेल असं पूर्ण वस्त्र दोन वेळचे चांगले जेवण पोटभर मिळू दे इतकं तरी दे बाबा ! मोदींच्या रूपाने परमेश्वरच त्यांना या सुविधा देत आहे असे वाटते ते काही असो पण माझ्या मुलींचं गळके पत्रे ते पक्की घरे हा प्रवास रोमहर्षक होता कारण मला ते दुःख ठाऊक होते पाच रुपयाच्या दोन खोल्याच्या भाड्याच्या घरातून तीन खोल्यांच्या बंगल्यात येताना माझा जो कष्टमय  प्रवास झाला होता त्याची मला आठवण झाली मी परमेश्वराला म्हणून म्हटलं त्यांना छान घर दिलेस त्यांच्या घरात आनंदही नांदू दे नाहीतर बापाने दारू पिऊन धिंगाणा घालण्यासारखं घर देऊ  नकोस” घर असू दे घरासारखे नकोत नुसत्या भिंती…..

 ” परमेश्वरा तुझे अस्तित्व तेथे असू दे आणि सगळ्यांना चांगली बुद्धी दे..!!! “

© सुश्री शीला पतकी

माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर 

मो 8805850279

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments