? मनमंजुषेतून ?

☆ “मॅडम, मी मंगळागौर नाही पूजणार”… – लेखिका : सुश्री दीपा देशपांडे कस्तुरे ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

“मॅडम, मी मंगळागौर नाही पूजणार.” एक 27-28 वर्षाची नवविवाहित तरुणी मला स्पष्टपणे म्हणाली. तशी ती कूल होती, नम्रही होती पण ठाम होती.

मी म्हंटल, “नको करू.तुझी इच्छा.पण सगळे हौशीने करायला तयार आहेत, तर तुला का नाही करायची मंगळागौर??”

त्यावर ती उस्फुर्तपणे म्हणाली, “मला ना हे सगळं Illogical आणि Wastage of time वाटतं.”

“तू करूच नको मंगळागौर.पण मंगळागौर म्हणजे नक्की काय, त्यात काय-काय करतात, माहिती आहे का तुला ?” मी तिला विचारलं.

“नाही हो.मंगळागौर म्हणजे दिवसभर पुजा करतात एवढंच माहीत आहे.”

“अगं, दिवसभर कसं कोणी ‘फक्त पुजा’ करेल? ” मी तिला हसतहसत विचारलं.

ऐक, मी सांगते तुला,

“मंगळागौर म्हणजे देवी पार्वतीची पुजा.नवीन लग्न झालेल्या मुली, श्रावणतल्या मंगळवारी ही पुजा करतात.तसा हा सोहळा संपूर्ण दिवसभर असतो. पण पुजा फक्त एकदीड तास.फार फार तर दोन तास.

पुढे दिवसभर गप्पा-गोष्टी, खाणेपिणे, नाचगाणे आणि खेळही असतात.मंगळागौरीसाठी माहेरची माणसं येतात, तसेच तुझ्या सासरचे नातेवाईक पण येतात .सगळे दिवसभर एकत्र राहिले की आपोआप नवीन ओळखी होतात, सुख-दुःखाची देवाणघेवाण होते. आणि नकळत आपल्यातलं बॉण्डिंग वाढत.

तुझ्यासोबत पुजा करायला आणखीन 5 मुली येतात. त्यांचं लग्न सुद्धा अलीकडेच झालेलं असतं. त्या निमित्याने तुझ्याच वयाचं एक friend circle आपसूकच तुला मिळतं . सगळ्यांचे वय सारखे म्हणजे तुमचे बोलायचे विषय सारखे आणि प्रश्नही सारखेच. तेव्हा मैत्री व्हायलाही सोप्प जातं आणि Wave length पण पटकन जुळते.नाही का?

नवी नवरी दुसऱ्या गावावरून आलेली असते, तिला तिच्या वयाच्या मैत्रिणी मिळाव्यात, सुख दुःखाच्या चार गोष्टी बोलायला कोणी असावं, ह्यासाठीच तर ह्या मुली बोलावतात..

संध्याकाळी हळदीकुंकू करतात , त्यात शेजारीपाजारी, इतर ओळखीचे लोक आपण बोलावतो. आपले स्नेही,शेजारी ह्या सगळ्यांची तुला माहिती व्हावी. ह्यासाठी हा सगळा खटाटोप…

थोडक्यात सांगू का, मंगळागौर म्हणजे नव्या नवरीसाठी एक Induction Program च असतो बघ.. 

आणखीन एक गम्मत आहे.मंगळगौरीच्या जेवणाच्या मेनूची.सकाळी पुरणपोळी, कटाची आमटी,चटणी, कोशिंबीर. Full protein rich आणि फायबरयुक्त जेवण.

रात्रीच जेवण तर आणखीन भारी..

भाजणीचे वडे.जे बाजरीचे आणि ज्वारीचे असतात.अगं, Gluten free.ते सगळं भाजलेले असतं म्हणजे पून्हा पंचायला हलकं. सोबत मटकीची उसळ.ऊसळी, कडधान्य म्हणजे प्रोटीन आलंच की.

आणखीन जेवणात असतं ते टोमॅटो सार. श्रावण महिना म्हणजे पावसाळाच.त्या थंड वातावरणात गरमागरम,आंबटगोड टोमॅटो सॉस.. 

आणखीन एक शेवटचं, पण महत्वाचं.. कोणीतरी खूपच Health Conscious, Calorie मोजून जेवणारे किंवा daily gym hit करणारे असतील तर त्यांना सुद्धा Workout आहे..संध्याकाळी जे मंगळागौर खेळ असतात ना ते मस्त Physical Exercise आहेत. सोबत मजबूत Calories burn करणारे आहेत.”

“उत्तम आरोग्य हाच खरा दागिना.” असं म्हणणाऱ्या आपल्या जुन्या लोकांना, “मनातल्या भावनांचा निचरा होण्यासाठी आपलं हक्काचं माणूस लागतं ” हेही चांगलं माहिती होतं.

केवळ Mental piece, stress buster, healthy lifestyle अशा चकचकित टर्म त्यांनी वापरल्या नाहीत म्हणून ते direct Illogical होतात का ?”

सगळं ऐकून झाल्यावर तिला मंगळागौर चांगलीच समजली होती,उमजली पण होती..

तिने मंगळागौर बुक केली.

जाता जाता मला म्हणाली, ” तुम्ही management चा अभ्यास केला का हो? “

छानसं हसून मी तिला उत्तर दिलं,”मी आपल्या पारंपरिक सणांचा अभ्यास केला.. “

लेखिका : सुश्री  दीपा देशपांडे कस्तुरे

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
4 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments