पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

? मनमंजुषेतून ?

☆ ‘‘विठ्ठल ‘पांडुरंगमय’ झाला…’’ ☆ पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

ज्यांचे जीवनच सारे..‘गमप’मय झाले होते, त्या आदरणीय लोकशाहीर  विठ्ठल उमपांचा आज जन्मदिन. त्यानिमित्त त्यांच्या बरोबरच्या काही सुंदर आठवणी भराभरा जाग्या झाल्या, त्या तुमच्याबरोबर शेअर करत आहे. 

काही वर्षांपूर्वी एका टीव्ही चॅनलसाठी उमपांचं आणि माझं गाण्याचं शूटिंग होतं. माझं गाणं झाल्यावर मी उमपांना ऐकण्यासाठी थांबले आणि इतका ‘पांडुरंगमय झालेला विठ्ठल’ मी प्रथमच पहिला! परमेश्वराला अत्यानंदानं आळवीत, ते ‘स्वरचित’ काव्य गात होते… 

गोरोबाच्या हाती, मातीचा चिखल

बोलतो विठ्ठल पांडुरंग… ||१||

*

सावतामाळी तो मळ्यात राबता

मळा होई बोलता, पांडुरंग… ||२||

*

नामदेव शिंपी शिवताना कपडे,

शिलाई ओरडे पांडुरंग… ||३||

*

विठ्ठल अभंग – गातो रे विठ्ठल

ऐकतो विठ्ठल – पांडुरंग… ||४||

एखादा चित्रपट पहावा, त्याप्रमाणे त्यांच्या ओठून शब्द सहजपणे ‘जिवंत’ होऊन येत होते. स्टुडिओची ‘पंढरी’ झाली होती! साक्षात् विठ्ठलाचं दर्शन त्यांनी आम्हाला घडवलं.  परमेश्वराशी तद्रुप होणं म्हणजे काय, याचा सुंदर आविष्कार होता तो! प्रत्येक अंतऱ्यागणिक डोळ्यांत पाणी आणि अंगावर काटा येत होता! 

त्यानंतर एकदा उमपांनी मला ‘जांभूळ आख्यान’चं निमंत्रण दिलं. मुलाच्या परीक्षेमुळे लवकर परतायचं ठरवूनही, संपूर्ण आख्यान पाहूनच घरी आले. खुर्चीला खिळवणारं हे संगीत आणि नृत्यही भारावून टाकणारं होतं. परमेश्वरानं दिलेल्या पुरुषी रूपातही ७८ वर्षांच्या (त्यावेळी) उमपांनी साक्षात् सुंदर कोवळी द्रौपदी ‘जिवंत’ उभी केली. पांडवांच्या अनुपस्थितीत कर्ण आल्यावेळी, तिचं कर्णाला पाहून लाजणं, मिलनोत्सुक होणं, अधीर होणं आणि पांडवांसमोर, कृष्णाने सत्य उघड केल्यावर बिथरणं, सारं इतकं थरारक, की प्रत्येक श्रोता ‘स्वतःतच’ द्रौपदीला अनुभवत असावा! या वयात त्यांचा स्टेजवरील वावर, खड्या आवाजातील भावस्पर्शी गाणं, अभिनयाच्या बादशहालाही लाजवेल असा अलौकिक आविष्कार पाहून वाटलं, देहभान विसरून कलेचा ‘परमोच्च आनंद’ घेणं म्हणजेच  ‘अध्यात्म’!

मी महाराष्ट्र टाइम्समध्ये ‘माझं अध्यात्म’ या सदरात त्यांच्या ‘जांभूळ आख्यान’ मधील मला अत्यंत अध्यात्माविषयी लिहिलेलं वाचून उमपांचा मला फोन आला. ते म्हणाल, “पद्मजा ताई, तुम्हाला संतांचं संचित मिळालं आहे. एखाद्या पोक्त माणसानं इतरांबद्दल मनमोकळेपणे, मुक्तपणे लिहावं, तसं स्वानुभवाचं गांठोडं तुमच्या आत्म्याच्या कप्प्यातून आलंय. ती दृष्टी तुम्हाला इतक्या लहान वयात मिळाली आहे, ही परमेश्वरी कृपाच!” असं सांगून त्यांनी भरभरून आशीर्वाद दिले. 

आजही जांभूळ आख्यानातील ‘अन् कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं…’

या ओळी कानी घुमू लागल्या, तरी उमपांचा चतुरस्र अभिनय डोळ्यांसमोरून हलत नाही!

याच आदरणीय शाहीर विठ्ठल उमपांच्या नावे मला २४ नोव्हेंबर २०१३ रोजी ‘वत्सला प्रतिष्ठान’ तर्फे ‘मृद्गंध’ हा मानाचा पुरस्कार दिला गेला. तो स्वीकारताना विठ्ठल उमपांच्या ‘आठवणींचा गंध’ मला पहिल्या पावसानंतरच्या मृद्गंधासारखाच उत्साहित करून गेला! काव्य, गायन, वादन, लेखन, नृत्य, सर्वच क्षेत्रांत अशी ‘अलौकिक’ मुशाफिरी करणारा असा कलावंत, पुन्हा होणे नाही!

©  पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments