श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

☆ शिखा ! 😅 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

“शिखा” ह्या शब्दाचा अर्थ साधारण माझ्या पिढीतील, सत्तरी क्रॉस केलेल्या लोकांना माहित असण्याचा संभव जास्त.  हल्लीच्या तरुण पिढीला “शिखा” ऐवजी “शाखा” हा शब्द जास्त जवळचा व कानावरून जात असलेला.  मग ती “शाखा” सकाळी, सकाळी एखाद्या मैदानात, शाळेच्या पटांगणात भरणारी असो, अथवा एखाद्या राजकीय पक्षाचे वेगवेगळ्या विभागातील ऑफिस. पण तेच जर का आपण “शिखा” ऐवजी “शेंडी” म्हटले, तर शंभरपैकी नव्याणव तरुण, तरुणींना ते लगेच कळेल आणि मग त्यांच्या तोंडातून आश्चर्याने “ओह आय सी, शिखा म्हणजे शेंडी काय!” असे शब्द बाहेर पडल्या शिवाय राहणार नाहीत ! 

आपल्या लहानपणी आपले आई बाबा, आजी-आजोबा आपण काही कारणाने जेवत नसलो तर, “माकडा माकडा हूप, तुझ्या शेंडीला (खरं तर शेपटीला) शेरभर तूप” असं काहीतरी बोलून आपल्याला भरवत असत.  तेंव्हा आपल्या बालबुद्धीला, माकडाला शेंडी कुठे असते, असं विचारणं कधी सुचलं नाही ! पण त्या ओळी गाऊन आपल्याला बळे बळे जेवायला लावणारे आपले आई – बाबा किंवा आजी-आजोबा यांनी आपल्याला तेंव्हा एक प्रकारे शेंडीच लावलेली असते, हे आपल्याला आपण मोठे झाल्यावरच कळते ! त्यामुळे मोठेपणी आपण सुद्धा दुसऱ्या कोणालातरी कधीतरी शेंडी लावण्याचे संस्कार आपल्याला त्यांच्याकडूनच मिळालेले असतात, असं जर मी या ठिकाणी म्हटलं तर, मी आपल्याला शेंडी लावतोय असं वाटण्याच काहीच कारण नाही ! असो !

आजही मुलाची मुंज करताना, साधारण एप्रिल-मे मधला मुहूर्त धरला जातो. कारण नंतर शाळेला सुट्टी असल्यामुळे त्या सुट्टीत बटूचे केस वाढून, त्याला शाळेत “ऑकवर्ड फिल” होऊ नये हा एक विचार त्याच्या मम्मी पप्पांच्या मनांत असतो.  शेंडी व्यतिरिक्त तिच्या भोवती थोडे बारीक केस ठेवण्याची पद्धत आहे, ज्याला घेरा असे म्हणतात.

शेंडी ठेवण्या मागे काही वैज्ञानिक कारणे पण आहेत, असं जर मी या ठिकाणी सांगितलं तर पुन्हा मी आपल्याला शेंडी लावतोय असं वाटण्याचा संभव आहे, पण आपण गुगल करून (ज्याला बहुतेक शेंडी असावी) मी जे आता सांगणार आहे त्याच्या सत्य असत्याचा नक्कीच शोध घेऊ शकता. तर डोक्यावर ज्या ठिकाणी शेंडी असते तिथेच सार्‍या शरीराच्या नाड्या एकत्रित होतात असं आधुनिक विज्ञान सांगत. इतकंच कशाला, या ठिकाणाहूनच मनुष्याची ज्ञानशक्ती निर्माण होते.  तसेच शेंडी सार्‍या इंद्रियांना स्वस्थ ठेवते व कोणाही व्यक्तीचं क्रोधावर नियंत्रण राहतं आणि विचार करण्याची त्याची क्षमतादेखील वाढते !

हिंदू धर्मात ऋषी मुनी डोक्यावर शेंडी ठेवायचे. गुरुगृही “अध्ययन” करतांना पूर्वी शिष्याच्या शेंडीला दोरी बांधून ती खुंटीला बांधत असत. जेणेकरून जर “अध्ययन” करतांना त्याला झोप लागली, तर शेंडीला हिसका बसून त्याला जाग यावी, हा हेतू ! याच अनुषंगाने इतिहासात होऊन गेलेले प्रकांड पंडित आर्य चाणक्य, यांच्या बुद्धिमत्तेचा आणि त्यांच्या डोक्यावर असलेल्या घेरा व शेंडीचा सुद्धा काही संबंध असू शकतो का, असं मग कधी कधी मला वाटायला लागत. 

आपण साऱ्यांनी विदेशी लोकांचे अंधानुकरण करून, आपल्या पूर्वापार चालत आलेल्या काही गोष्टींचा त्याग केला, त्यातली एक गोष्ट म्हणजे शेंडी ! पण आता त्याच विदेशी लोकांना शेंडीचे वैज्ञानिक महत्व कळल्यामुळे “हरेराम हरेकृष्ण” हा पंथ आचरणारे सारे पुरुष अनुयायी लांब लचक शेंडी बाळगून असल्याचे पहायला मिळत ! 

आपल्याकडे पौरोहित्य करणारे काही ब्राम्हण अजूनही  शेंडी बाळगून आहेत, आता त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी असावी इतकेच ! पण दाक्षिणात्य पुरोहित, जे माझ्या पाहण्यात आलेत, ते सगळे डोक्यास घेरा व त्या मधे शेंडी बाळगून असतातच असतात !

तसेच अजूनही पानपट्टीचा ठेला चालवणारे काही पुरभय्ये लांब लचक शेंडी बाळगून वर त्याला छोटी गाठ बांधून, कपाळी लाल, पिवळे गंध लावून आपल्या पानाच्या ठेल्यावर बसल्याचे दिसतात ! असे पानाचे ठेले आणि ते पुरभय्ये काळाच्या ओघात आता नष्ट झाले आहेत, हे आपण सुद्धा मान्य कराल.

फार पूर्वी एखाद्या राजाने शिक्षा म्हणून शेंडी कापण्याची आज्ञा दिल्याचे इतिहासात दाखले सापडतात. पण त्या काळी अशी शिक्षा, देह दंडाहून कठोर समजली जायची, असा तो काळ होता आणि तेवढंच आपापल्या शेंडीला लोक महत्व देत होते !

आपल्या मराठी भाषेत शेंडी शब्दाचा उपयोग अनेक म्हणी अथवा वाक्प्रचारात केलेला आढळतो. तुम्हांला कोणी फसवलं तर लगेच तुम्ही, “तो मला शेंडी लावून गेला” असं म्हणता ! एखादी गोष्ट आपण या पुढे कधीच करणार नाही, यासाठी आपण “आता शेंडीला गाठ” असं शेंडी नसली तरी,  बिनदिक्कत म्हणतोच ना ! तसंच वेळ पडल्यास आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल, तर “शेंडी तुटो अथवा पारंबी” या म्हणीचा वापर शेंडी नसली तरी करण्यास आपण मागे पुढे पहात नाही !

शेवटी, शेंडी ठेवावी का ठेवू नये हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण शेंडी कोणी कोणालाच लावू नये यावर सगळ्यांचे मतैक्य होण्यास शेंडी नसली तरी काहीच अडचण नसावी !

शुभं भवतु !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments