प्रा. सुनंदा पाटील
मनमंजुषेतून
☆ पावसाळी अमावस्येचा थरार… ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆
जुलै /ऑगस्ट महिना आला की, आत्ताही अंगाचा थरकाप होतो. आठवते ती एक भयाण रात्र. ३८ वर्षांपूर्वीची ! त्यावेळी मी गडचिरोली येथे बँकेत नोकरी करीत होते. माहेरी खेड्यात राहणं होतं ! माझी नोकरी शाळेची नव्हती, की उन्हाळा, दिवाळी आणि सणावारी सुट्ट्या मिळायला. त्यात नशिबाने ऐन तारूण्यात एकल पालकत्व आलेलं. पण हरायचं नाही. एक आई असून – बापाचंही कर्तव्य पार पाडायचंच हे मनाशी कायम कोरलेलं होतं.
आषाढ आपल्या पूर्ण ताकदीनिशी कोसळत होता. त्याच्याच बरोबरीने विजा चमकत होत्या. बँक तशी सहालाच सुटली होती. तेव्हा पासून मी बसस्टॉपवर उभी होते. स्टँड नव्हे. एकेक बस येत होती. प्रवासी घेऊन पुढे जात होती. माझ्या बसचा मात्र पत्ताच नव्हता. त्यातच स्ट्रीट लाईटस गेले. काळोख दाटला होता. बाळ लहान होतं. त्यामुळे मला जरी भूक लागली होती, तरी बाळाची काळजी अधिक होती. ते भुकेजलं असेल. सकाळी आई त्याला खाऊ घालायची, किमान रात्री त्याला मी हवी असे. माझ्या स्पर्शासाठी बाळ कासाविस झालं असेल. या कल्पनेनंच सारखं रडू येत होतं. छत्रीचे केव्हाच बारा वाजले होते. ओली गच्च पर्स कवटाळून मी बसची वाट बघत होते. नाही म्हणायला दोन / तीन पुरुष आणि एक बाई स्टॉपवर सोबत होती. रात्री बंद झालेल्या किराणा दुकानाच्या वळचणीला आम्ही थांबलो होतो. तेवढ्यात माझ्या माहेरची बस आली एकदाची. त्या बसच्या हेड लाईटसने एक दिलासा दिला.
त्यावेळी खेड्यात विवाहीत, त्यातून विधवा स्त्रीने ड्रेस वगैरे घालणं म्हणजे महापाप होते. साडी परकर गच्च ओले असल्याने पायांना चिकटले होते. कशीबशी लालपरी बसमधे मी चढले. दोन वेळा घंटी वाजली आणि बस सुरू झाली.
बसमधे जास्त प्रवासी नव्हतेच. म्हणजे तेवढेच थांबे कमी. म्हणजे बस लवकर गावी पोचेल हा कयास होता. बस वेगात निघाली, म्हणजेच खेड्यातल्या रस्त्यांवरून ताशी २० किलोमिटरच्या स्पीडने ! तेव्हा रात्रीचे नऊ वाजले होते. अकरापर्यंत बस पोहचेल (अंतर ३४ किलोमीटर) हा कयास होता. कारण मोबाईल / फोन वगैरे काहीच प्रकरण त्यावेळी नसल्याने एकमेकांची काळजी करणे, एवढेच हातात होते. बसमधे जास्त लोक नव्हते, हे एकापरी बरंच होतं. कारण गच्च भिजलेली मी ! स्वतःला सांभाळणं मला कठीण झालं असतं.
गाडी सुरू झाली. तिच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त वेगाने मी मनाने घरी पोचले होते. बाळ कसं असेल हीच काळजी होती. तसं ते माझ्या आईपाशी सुरक्षित होतं. पण आई आणि आजीत एका अक्षराचा फरक होताच ना!
आम्ही शिवणीच्या नदीपाशी आलो. नदीचं पात्र भरू वाहत होतं. वेळ रात्री दहाची. पण किमान पूल दिसत होता आणि गाडी पैलतिराला पोचली एकदाची. पुढे रस्त्यावर पाणी साचलेलं / खड्डे यातून वाट काढत गोविंदपूरचा नाला, पोहर नदी पार केली.
रात्रीचे अकरा वाजले होते. बाहेरचा सूं सूं असा आवाज रात्रीच्या भयानकतेत अधिकच भर घालीत होता. त्यातून विजा कडाडत होत्या. तशातही
“सरोष घन वर्षती तरूलताशी वारा झुजे
विराम नच ठाऊका तडित नाचताना विजे “
या ओळी मला आठवत होत्या. कुरूळ गाव आलं. दोन माणसं उतरली. बसमधे ड्रायव्हर, कंडक्टर, एक शेतकरीवजा माणूस आणि मी एवढे चारच जण होतो. बसचा खडखड आवाज, टपावर पावसाच्या थेंबांचा आवाज भयानकतेत भर घालीत होता. कुरूळचा नाला दुथडी पुलावरून भरून वाहत होता. पण त्या पुलाचं अंतर जास्त नव्हतं. तशातच आमच्या बसच्याच समोर एक ट्रॅक्टर चालत होता. ड्रायव्हरने ट्रॅक्टर पुलावर घातला आणि पलिकडे गेला. तीच हिंमत धरून आमच्याही ड्रायव्हरने बस नाल्याच्या पलिकडे नेली. खूप हायसं वाटलं. आता मधे कुठलीच नदी / नाले नव्हते. कंडक्टर कडून माहिती कळली की एव्हाना रात्रीचे पावणेबारा झाले होते. अजून तीन किलोमिटर रस्ता बाकी होता.
कसाबसा सव्वा बारापर्यंत हा तीन किलोमीटर चा रस्ता आमच्या लालपरीने पार केला. एव्हाना मी खूप थकले होते. पहाटे पाचला उठून माझा डबा, घरच्या सर्वांच्या पोळ्या, भाजी करून ७ची बस घेऊन निघाले होते मी.. अर्थात ती बस पावणे आठला मला मिळाली आणि कसंबसं मस्टर गाठलं. जवळ जवळ १९ तास. मी केवळ काम करीत होते आणि उभी होते. गेले तीन तास बसचा खडखडाट अनुभवत होते हाडं खिळखिळी झाली होती. तशातच बस थांबली. म्हणजे माझं गाव आलं होतं. अमावास्येची काळी कुट्ट रात्र होती ती. पाऊस, विजेचं तांडवं, आभाळाची गर्जना यांच्यात जणु पैज लागली होती. तशाच पावसात भिजत मी खाली उतरले. माझा एकमेव सहप्रवासी माझ्या नेमक्या विरुद्ध दिशेने झपाझप पावलं टाकत निघून गेला होता. आजु बाजुला कुणी दिसतंय का याचा मी अंदाज घेतलला. पण रात्री साडे बाराला खेड्यात कोण असणार होतं ?
रस्ता नेहमीचा परिचयाचा होता. आठवडी बाजारातून जाणारा. पण आता त्याला तलावाचं रूप आलं होतं. आमच्या शाळेला वळसा घालून त्याच तलावातून मला रस्त्यावर यायचं होतं. तेवढयात वीज चमकली आणि त्या उजेडत मी कुठे आहे याचा मला अंदाज आला आता नाकासमोर चालत मला रस्ता गाठायचा होता अधेमधे दोन तीन वेळा वीज चमकली. आणि त्याच उजेडात मी चिखल पाणी तुडवत निघाले होते. पाच सात मिनिटात पायाला कडकपणा जाणवला. म्हणजे मी रस्त्याला लागले होते. होय सांगायचं विसरलेच. ओल्या गच्च चपलेने मधेच माझी साथ सोडली होती.
रस्त्यावरून माझी पावलं बऱ्यापैकी वेगात पडत होती. पाऊस सुरूच होता. मी सावकाराच्या घरापर्यंत पोचले न पोचले तोच अतिशय जोरात वीज कडाडली. कारण माझ्या नजरेसमोरची सर्व घरं मला दिसली होती. बहुतेक ती जवळपास पडली असावी. पण गंमत म्हणजे ज्या विजांची नेहमी भिती वाटावी त्याच विजा मला हव्याशा वाटत होत्या. कारण त्याच उजेडात मी चालत होते. मात्र आत्ताच्या विजेने मलाही धडकी भरली. मी एक टर्न घेतला. तिथे कोपऱ्यावर राममंदीर आहे. त्याच्याच जवळ एका घरी एक महिला काही दिवसांपूर्वी जळून वारली होती. खेडं म्हणजे भुताटकी वगैरे विषय आलेच. तिथेही ती बाई रात्रीबेरात्री, अवसे / पुनवेला दिसते हेही ऐकलं होतं. मी सगळं उडवून लावायची नेहमी. पण त्या रात्री तेवढा पॅच पार करताना मनातल्या मनात रामाचा धावा करीत होते. राममंदिर आलं हे मी जाणलं. कारण अंधारालाही उजेडाची एक किनार असते. पुढे आमच्या घराच्या फाटकाशी आले. आगळ काढून पुढे आले. पुन्हा आगळं लावली. जाळीच्या दरवाजातून कंदिलाचा उजेड दिसला आणि एक मानवी आकृती. म्हणजे माझे बाबा ! कारण आई बाळाला घेऊन झोपली असणार आणि धाकटा भाऊ सोळा सतराचा. तोही झोपला असणार !
अंधारामुळे बाबांना मी दिसले नाही.. पण दरवाजाशी आल्यावर मात्र त्यांनी दार उघडलं. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. दाराचा आवाज ऐकून आईही बाहेर आली. बाहेर म्हणजे पडवीत. मला सुखरूप बघून दोघांचाही जीव भांड्यात पडला. चौकाच्या घरात आतल्या चार ओसऱ्या. तिथे आमची झोपायची सोय होती. बाळ झोपलं होतं.
मी गच्च ओली होते. बाहेरच साडीचा पदर, काठ जरासे पिळले. आणि घर अधिक ओलं होऊ नये ही काळजी घेत आत आले. आधी हातपाय धुवून ओली साडी बदलली.. आजीलाच आई समजून तिच्याच कुशीत बाळ निजलं होतं. आता त्याला उशी लावून आई उठली होती. बाळाच्या जावळातून मी हात फिरवला. पापा घेण्याचं टाळलं. कारण तो झोपला होता. तोवर आईने माझं ताट वाढलं रात्री एक वाजता चार घास खाल्ले.
बाळाला कुशीत घेतलं. ते चिकटलंच मला. दिवसभरचा शीण कुठल्याकुठे पळाला.
इथे संपलं नाही.
सकाळ झाली. पाऊस जरासा ओसरला होता. बाबा सवयीने पहाटेच उठले होते. माझा ऑफिसला जाण्याचा प्रश्नच नव्हता. कारण रात्री ज्या खडतर मार्गावरून मी आले, ते सर्व नदीचे नाल्याचे पूल पुराच्या पाण्याखाली गेले होते.
आणि – – – काल रात्री जी जोरदार वीज चमकली, ती आमच्या शाळेवर पडली होती. त्यामुळे शाळेची एक भिंत खचली होती. गावातले अनेक टी. व्ही. उडाले होते. मी पायी चालत होते त्याच रस्त्यावर बाजूच्या घरी त्याच वेळे दरम्यान हृदय विकाराने एक आकस्मिक मृत्यू झाला होता.
बाबांनी हे मला सांगितलं आणि तेवढया थंडीतही मला दरदरून घाम फुटला. केवळ काही क्षणांपूर्वीच रात्री मी त्याच शाळेपाशी होते. थोडी आधी वीज पडली असती तर? कल्पनेतही भिती वाटली. आणि कालची अमावास्या होती.
आजही ही आठवण आली की, उरात धडकी भरते. शिवकालीन हिरकणी आणि आजची आई यात खरंच फारसा फरक नाही हे पुन्हा अधोरेखित होतं हेच खरं!!
© प्रा.सुनंदा पाटील
८४२२०८९६६६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈