श्री संदीप रामचंद्र सुंकले
☆ जोडपी / जोड्या ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ☆
“ ए सोनू, तुमची जोडी अगदी स्वर्गातबनल्या सारखी आहे. अगदी इंग्रजी मध्ये म्हणतात त्याप्रमाणे “Made for each other ” … मिनू सोनूला सांगत होती…..
सोनू तिला म्हणाली की “ अग असे काही नसते…. जोड्या स्वर्गात जुळवल्या जातात आणि पृथ्वीवर त्या प्रत्यक्षात दिसतात असे म्हणतात ते खरे आहे… “
या दोघींचा संवाद ऐकून मी विचारमग्न झालो….
आजपर्यंतच्या आयुष्यात अनेक जोड्या पाहिल्या,
काही जवळून तर काही दुरून….
काही चित्रपटात तर काही प्रत्यक्षात..
काही नात्यातील तर काही परक्या….
… स्वतःची जोडी ही अशीच एका सावध/बेसावध क्षणी जुळली गेली….
आयुष्याच्या मध्यान्ह होताना असे लक्षात आले की जोड्या स्वर्गात जुळतात हे कदाचित खरे असेल, पण त्या या पृथ्वीवर जुळण्यासाठी, नव्हे जुळवून घेण्यासाठी मात्र काहीतरी वेगळे कौशल्य जोडीतील दोघांकडे लागते.
महान लेखक व. पू. काळे एका ठिकाणी लिहितात,
लग्न पत्रिकेवर गणपतीचे चित्र छापून आणि लक्ष्मी प्रसन्न असे लिहून संसार घरी लक्ष्मी रूपाने येणारी गृहलक्ष्मी होऊ शकत नाही. तर तिच्यातील लक्ष्मीची जागृती करण्याचे काम ज्या पतीला जमते, त्याचा प्रपंच सुखाचा होण्याची शक्यता असते.
पतीसाठी घरदार सोडून आलेल्या, नवऱ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या मुलीला आपल्या नवऱ्याचे घर आपले वाटावे, किमान इतकं तरी त्या नवऱ्याने आणि सासरच्या माणसांनी तिच्याशी सौजन्याने वागले पाहिजे….
आधी संवाद, मग सहवास, पुढे त्यातून विश्वास आणि अकृत्रिम स्नेह…
आणि
मुख्य म्हणजे प्रपंचात राहिलेल्या ‘गाळलेल्या’ जागा रिकाम्या न ठेवता ज्याला दिसतील त्याने मूक राहून भरणे…
हे यातील काही टप्पे असू शकतील….
एकेमकांना जाणून घेत, घरातील माणसांशी जुळवून घेत, दैनंदिन व्यवहारात प्रेम, माया, स्नेह जपत, वाढवत केलेला प्रमाणिक व्यवहार पती पत्नीचे नाते दृढ आणि उबदार करीत असतो आणि याला जर सम्यक सुखाची जोड मिळाली तर मग पती पत्नीच्या नात्याला बहार येते, मोगऱ्याचे ताटवे बहरू लागतात….
ज्या जोडप्यांनी, जोड्यांनी असे प्रयोग करून पाहिले असतील, अनुभवले असतील, लेख वाचताना त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकले असेल….
प्रत्येकाने आपल्या जोडीदाराला समजून घेत आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करू….
आपल्याला नक्की जमेल…. शुभेच्छा!!
© श्री संदीप रामचंद्र सुंकले (दास चैतन्य)
थळ, अलिबाग.
८३८००१९६७६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈