डॉ. माधुरी जोशी

? मनमंजुषेतून ?

मी घर आवरत्येय… मोकळी होत्येय की गुंतत्येय !!!!! डॉ. माधुरी जोशी 

अखेर सह्या झाल्या. बिल्डिंग री डेव्हलपमेंटला गेल्याचं शिक्कामोर्तब झालं…. थोडा अवधी होता हातात… नवीन जागा मिळण्याचा भविष्यातला आनंद खुणावत होता…. आणि या भिंती मधला सारा भूतकाळ सतत सामोरा येत होता… आता चमचा नॅपकिन्स पासून कागदपत्रांपर्यंत किती आणि काय काय आवरायचं होतं. मनात ही वास्तू, आणि काही वस्तू सोडून जायची हलकीशी वेदना होती… पण घर आवरायलाच हवं होतं आणि खरं म्हणजे मनही!!! कामाला लागले आणि लक्षात यायला लागलं आवरणं कमी होतंय आणि आठवणींच्या साम्राज्यात गुंतणंच वाढतंय…

किती खोलवर रुजलेल्या, रुतलेल्या स्मृती.. एकेक आठवणींचं गाठोडं…. समोर आलेली फोटोंची पिशवी तर मनाला सगळ्यात जीवंत करणारी… सणवार, वाढदिवस, लग्नकार्य, ट्रीप्स, बक्षिस समारंभ, ट्रॉफ्या, एअरपोर्टवर मुलांना शिक्षणासाठी जातांना भरल्या डोळ्यांनी हासत दिलेले निरोप, दृष्टी आड, काळाच्या पडद्याआड झालेले वडीलधारे, कुणी सोबती, कुणी अगदी क्वचित भेटलेले तरी जवळचे, वाड्यातले, किती किती आठवणी…

तर काही कागदावर पेनानं उमटलेली अक्षरं, मनातल्या विचारांना सजवणारी… सुख दुःखाची, यशापयशाची, मन मोकळं करणारी…. कधी वर्तमानपत्रांनी दाद देऊन छापलेली, काही कविता, कार्यक्रमाची निवेदनं, त्यावरंच कुठल्याशा कोपऱ्यात लिहीलेले पत्ते, फोन नंबर्स…. चाललं मन गुंतत….

आणि अभ्यास, नोट्स, नोंदी, फेअर वर्क…. माझं संगीतातलं, मुलांचं इंजिनिअरिंगचं, यांचं गड किल्ल्यांचं… सुटत चाललेले, पिवळे पडलेले, क्वचित तुकडे पडणारे…. किती किती जुने कागद…. खूप दिवसात सापडंत नव्हतं ‘ ते ‘ पुस्तक…. कशात तरी दडलेलं. आनंदाच्या भरात तेच चाळलं… गुंतलं वेडं मन… अचानक सामोऱ्या येणाऱ्या जुन्या पावत्या… बिलं…. जगण्यातला इतक्या वर्षांचा आर्थिक आलेख मांडणाऱे… फोडायचंच राहिलेलं एखादं आहेराचं पाकिट आणि अमक्याकडून केंव्हातरी आलेला पण आज मिळालेला आहेर… आपलेच पैसे परत छुपा आनंद देणारे… मग ते पाकिट देणाऱ्यांच्या आठवणी… एखादी कपड्याखाली जपून ठेवलेली अन् आता चलनातंच नसलेली नोट…. चाललं… चाललं मन हिंडायला…. गंमत म्हणजे हे सारं आपल्या जागी होतंचकी.. निवांत, शांत पहुडलेलं…. या इथून निघण्यानी ते निघालं जागेवरून…. मोकळा श्वास घेतला कागदांनी…. स्मृती वगैरेंचे कागद परत आत गेले पाऊचमधे आणि सटरफटर गेले केराच्या टोपलीत… किती पसारा, , किती कागद, , किती काय जपलेलं, चुकून राहिलेलं, उगीच सांभाळलेलं…. आवरलं ते सगळं खरं पण मन मात्र आठवणींच्या गुंत्यात गुंतलेलं राहिलं….

इथून निघेपर्यंत स्वयंपाकघरात जेवणखाण बनणार होतं… ते शेवटी आवरू असं ठरवलं खरं…

पण रोज लागणाऱ्या भांड्यांपेक्षा किती तरी जास्त काही भांडी होतीच…. अनेक वर्ष जमवलेली. भांडी…. २५ लोक आले तरी घरात तयार असणारी वेळोवेळी घेऊन जमवलेली, हौसेची, आवडीची, मुलांची मुद्दाम नावं घालून घेतलेली, तर काही आहेरात आलेली, नावं नसलेली पण पदार्थ घालून शेजारपाजारची आलेली कन्फ्यूज्ड भांडी, मी जपून ठेवून मालक शोधणारी, काही तर बॉक्स मधूनही न निघालेली… कप, मग्ज्, न लागणाऱ्या बशा, दह्या दुधाचे सट, गंज, कल्हई लावलेली पितळी पातेली… लोखंडी तवे कढया पळ्या…. बापरे…. ४६ वर्षांचा पसारा…. सासुबाईंच्या वजनदार पितळी, स्टीलच्या भांड्यापासून अगदी निर्लेप तरीही हवाहवासा…. प्राणपणानी जपलेला, वाढवलेला पसारा… सारं सोबत होतं इतकी वर्षं….

पण आता मन आवरायला हवं होतं… मोजकं, गरजेचं, चांगलं, ठेवून मोकळं व्हायचं होतं… आणि मग भांडी निवडली…. गुंतलेल्या माझ्याच मनाविरुद्ध जणू लढंत राहिले….

मग असेच नातवंडांचे खेळ, कपडे, अगदी बॉक्स सुद्धा न उघडलेल्या गिफ्टस्,…. सगळं काढतांना मन अस्थिर… टाकणाऱ्या हाताला परत मागे खेचणारं… कधी आठवणींची कासाविशी कधी दुर्लक्ष झाल्याचा अपराधीपणा….

आवरणं कसलं…. मनाचं धावणं चारही दिशांना…. भूतकाळात.. कसं आवरायचं? आठवणींच्या गुंत्यातून कसं अलगद, न दुखावता सोडवायचं?यातलं काय ठेवावं? काय टाकावं? आता कुणाला दाखवायच्या आहेत त्या ट्रॉफ्या, सर्टीफिकेट्स, पत्र, लेख….. मुलं तर सगळ्यातून दूर… १००% प्रॅक्टीकल सल्ला देणारी…. नवीन पिढीच अशी… न गुंतणारी… स्पष्ट…..

आम्ही फार गुंतलोय का ? फारच भावनिक आहोत का?चुकलं का?

नाही नाही…. मन कबूल होत नाही…. कारण आम्ही आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर क्षण अन् क्षण जगलो…. जे, जसं, जेंव्हा, जेवढं मिळालं त्यात आनंदात राहिलो. म्हणून तर पुढे श्रीमंत सिल्क नेसलो तरी आईच्या मायेचा चिटातला फुलांचा फ्रॉक, खणाचं परकर पोलकं आजही मनाजवळ आहे…. मुलांच्या घरात बॉयलर आले तरी तांब्याच्या लालभडक बंबाच्या ठिणग्या आणि पत्र्याच्या बादलीतल्या वाफाळत्या पाण्याची ऊब सोबत आहे… मिक्सर आले तरी पाटावरवंट्याचं खसखशीत वाटंण चवीत आहे…. वस्तू नाहीत पण आठवणी घट्ट आहेत…. मन गुंतून राहिलंय आजवर…

बरं या आठवणींचं तरी असं आहे…. आज फ्रीज जवळ गेलं की क्षणात विसरायला होतं काय घ्यायला आलो होतो ते… पण त्याच मनात ५वी, ६वी मधल्या नाना वाड्यातल्या शाळेत काव्य गायनासाठी गायलेल्या कविता लख्खं स्मरणात आहेत. किती उतारे, नाटकातले संवाद, समुहगीतं, अभंग, भावगीतं बंदिशी, तराणे…. मग शिक्षिकेची नोकरी करतांना मुलींचं यश, ते आलेले नंबर, त्या घोषणा…… हे सगळं आठवणीत आहे कारण सारं मन लावून, जीव ओतून केलंय. आज हे फोटो, सर्टिफिकेट्स पुन्हा ४० /५० वर्ष मागे नेतात ते त्या जिव्हाळ्यामुळे…

तेच स्वैपाकात.. प्रेमानं, मायेनं खाऊ घालण्याच्या भावनेत आहे. मग ती लोखंडी, पितळी, जाडजूड स्टीलची जुनी भांडी पण मऊ स्पर्श देतात. केवढी सेवा दिली त्यांनी…. ती टाकायची, नाकारायची कशी? ते कागद, पत्रं फोटो, ती पत्र, सर्टीफिकेट्स, भांडी, कपडे साऱ्यांनी तर सोहळा केला जगण्याचा…. पण मग मी मनाची समजूत घालते…. परत परत चाळण लावते…. मोजकं ठेवते…. काही दूर सारते… डोळे भरून पाहून घेते. तासाभरात आवरुया असं ठरवते सकाळी आणि दिवस कलायला येतो तरी मी त्याच पसाऱ्यात असते. पत्रं, भांडी, फोटो, पावत्या, पुस्तकं, कपडे सगळं सगळ्यांकडे आहेच…. एक गोड पसारा आयुष्यभर मांडलेला…

… सगळ्यांचं असंच होतं असेल का?आवरायला काढलं खरं…

पण किती प्रसंग, विषय, घटना, आनंद, दु:ख, यश अपयश… कुठेकुठे मन हिंडून येतं… हिंडवून आणतं….

पण भावनिक मनाला प्रॅक्टिकल मन समजावतं…. आवरायला लावतं सामान आणि भावना !!! तरी भावनिक मन चोरून याच्या नकळत काही पिशवीत भरतंच…………… आवरण्यातली ही गुंतवणूक !!

© डॉ.माधुरी जोशी

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments