सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ हिरवी भिशी… ☆ सुश्री शीला पतकी ☆
फोनची रिंग वाजली म्हणून फोन उचलला तर पलीकडून अंजूचा आवाज उर्मी उद्या माझ्याकडेबरोबर पाच वाजताभीशि आहे पण वेगळी हं! म्हणजे हिरवी मिशी! सर्वांनी हिरवे पोशाख परिधान करून या सगळे हिरवे! मी पदार्थही हिरवे करणार आहे तिची ती भन्नाट कल्पना ऐकून मी पांढरी फटक पडायची वेळ आली. मी म्हंटल बर बर येते बाई !
फोन खाली ठेवल्यापासून डोक्याला हिरवाईने घेरलं…. साडी हिरवी. कुंकू हिरवं.. कानातले गळ्यातले हिरव्या खंड्यांची अंगठी.. हिरव्या वादीची चप्पल, बांगड्या, हिरवी साडी हिरवी पर्स !माझा हा सगळा जामानिमा पाहून हे म्हणाले, ” आता हिरवी लिपस्टिक लाव म्हणजे ध्यान दिसशील” एवढ काही नको हं हे एवढ छान केलय तुम्हाला मेल कौतुकच नाही! या वाक्याने आमचा संवाद संपला…?
मंजूकडे गेले बंगल्याच्या फाटकासमोर हिरव्या पानांची सुंदर रांगोळी काढली नव्हे गालीचा होता. मध्ये फक्त थोड्याशा रंगीत पाकळया दारावर आंब्याचं तोरण आणि हिरव्या वाटाण्यानी सजवलेली नक्षीदार महिरप… फार सुंदर सजलं होतं दार ! दोन्ही बाजूला सुंदर हिरव्या कुंड्या त्यात डेरेदार उंच मयुर प्लॅन्ट… दारात हिरवी पायपुसणी हॉलमध्ये हिरवे पडदे…. सोफ्याला हिरवे कव्हर हिरव्या नक्षीदार छोट्या उषा खाली हिरवा गालीचा पसरलेला हिरव्यागार छोट्या छोट्या छोट्या पोपटांचे कॉर्नर्स हँग केलेले. एका भिंतीवर हिरव्या फॅनेलचा बोर्ड त्यावर हिरव्या रंगाचे वर्णन असलेल्या गाण्याच्या दोन दोन ओळी लिहिल्या होत्या आणि त्या हिरव्या पानांनी पिनअप केल्या होत्या हिरव्या हिरव्या रानात;
हरियाली और रास्ता; हिरवे हिरवे गार गालीचे…. इत्यादी सारखी गाणी होती ! माझ्या अंजूच्या घराची ती हिरवाई न्याहाळतांना मी थक्क झाले आणि तिचं कौतुकही वाटले. इतक्यात अंजू बाहेर आली बाई ग.. मी तर बघतच राहिले! गोरीपान अंजू.. हिरवी पैठणी.. हिरवे दागिने.. सुंदर हेअरस्टाईल त्यावर हिरवा बो आणि त्यावर हिरव्या पानांची फुल करून माळलेला गजरा मध्ये फक्त चार शुभ्र फुले होती. दागिने सुंदर होते आणि सगळे हिरव्या रंगांना धारण करणारेही होते! मी तर बाई बघतच राहिले….. ! पाठोपाठ तिची मुलगी आली तिनेही हिरव्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केलेला. “बाई समद झालया नव्ह” असं म्हणत दोन कामवाल्या बाया बाहेर आल्या त्यांनी हिरवी इरकली लुगडी नेसली होती. हिरव्या बांगड्या घातल्या होत्या.
हळूहळू सगळ्या मैत्रिणी जमा झाल्या प्रत्येकीच्या एंट्रीला कुतूहल !अय्या काय गोड दिसतेस! किती सुंदर! झकास! टाळ्या काय न वाजणाऱ्या शिट्या काय….. प्रत्येकीची एन्ट्री दणाणून सोडत होती. प्रत्येकीच्या बौद्धिक क्षमतेची जणू परीक्षा होती. इतक्यात हिरव्या टी शर्टचा तिचा मुलगा बाहेर पडला आणि आम्हा सर्वांवर नजर फेरीत म्हणाला, ” मम्मा कोण म्हणतंय कि सोलापुरात यंदा कमी पाऊस झालाय “असं म्हणत त्यांना पोबारा केला. आम्ही खूप हसलो! वेलकम ड्रिंक म्हणून तिने वाळ्याचे सरबत ठेवले होते सुंदर हिरव्या ट्रेमधून हिरव्या रंगाच्या ग्लासामध्ये, त्या ग्लासाला छोट्या हिरव्या छत्र्या हिरवे सुंदर स्ट्रॉ वर्ती हिरव्या पुदिन्याची पानं पेरलेली होती पेय सुंदर रंगतदार होत… !
खूप गप्पा झाल्या काही गेम्स झाले शेवटच्या गेममध्ये एका हिरव्या प्लास्टिकच्या डिशमध्ये खूप नाणी होती ती हातानी उचलायची.. किती प्रयत्न केला तरी एक दोन चार नाण्याच्या वर जास्त मजल जात नव्हती आम्ही जिंकलेली सर्व नाणी एका हिरव्या बटव्यात एकत्र केली.
मग आले खाद्यपदार्थ सुंदर हिरव्या पत्रावळींचे डिझाइन असलेल्या डिशेश त्यात पालक पुलाव त्यावर खोबरं पलीकडे हिरव्या कोथिंबिरीची खोबऱ्याची चटणी हिरव्या मटारची उसळ पालक पुरी आणि हिरव्या रंगाची पिस्ता बर्फी…. अहाहा… बेत चवदार लज्जतदार तसा रंगतदार ही होता !
खाणे पिणे झाले शेवटी पिस्ता आईस्क्रीमचे सुंदर कप त्यावरचा पिस्ता खाताना खूपच मजा आली अंजूच्या कल्पकतेचे कौतुक प्रत्येकजण तोंडभरून करत होता इतक्यात हिरव्या सुबक केळीच्या पानात मस्त हिरवेगार गोविंद विडे आले… मी म्हणाले अंजू पुरे ग किती धक्के देशील? ती म्हणाली थांबा तिने आपल्या सहकारी मावशांना बोलावले आणि मगाचे हिरवे बटवे आमच्या काही ज्येष्ठ भगिनींच्या हस्ते त्या महिलांना बक्षीस म्हणून दिले त्यांनाही खूप आनंद झाला या तिच्या कृतीने आम्ही भरून पावलो म्हणजे या सुंदर प्रसंगाला एक छान भावनेची बाजूही होती आणी ती हिरवी कंच होती अंजूच्या कल्पकतेचे तोंडभरून कौतुक करीत मिळालेल्या नवीन कल्पनेचा सुखद हिरवट गारवा अंगावर लपेटत मी घरी आले ओठावर गाणं होतं हिरव्या हिरव्या रानात ——-
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈