श्री मकरंद पिंपुटकर

??

कार्बन फुटप्रिंट आणि तुम्ही आम्ही – भाग – २  ☆ श्री मकरंद पिंपुटकर 

 (जमिनीची कृषी संबंधित उत्पादन क्षमता कमी होऊ लागली आहे, पाण्याच्या उपलब्धतेच्या अनियमिततेमुळे शेतीचे नुकसान होऊ लागले आहे.) – इथून पुढे —-

 Climate change, वाढते तापमान यामुळे चक्रीवादळे, त्सुनामी यासारख्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत, त्याने infrastructure चं प्रचंड नुकसान होऊ लागले आहे, विमा कंपन्यांची आर्थिक गणितं विस्कळीत झाली आहेत.

तापमान वाढल्याने जास्त air conditioning वापरलं जाऊ लागलं आहे, आणि या अधिक वापराने आणखी कार्बन फुटप्रिंट तयार होऊन तापमान आणखी वाढतंय, असं एक कापूसकोंड्याच्या न संपणाऱ्या गोष्टीसारखं दुष्टचक्र सुरू झालंय.

पुढचं विश्वयुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी होईल म्हणतात, या वाढत्या ग्रीन हाऊस गॅसेसने तो दिवस आणखी आणखी जवळ येत चालला आहे. नैसर्गिक साधन संपत्तींसाठी झगडे होणार आहेत, स्थलांतरं होणार आहेत, होऊ लागली आहेत. ” 

मुलगा अत्यंत कळकळीने कैफियत मांडत होता.

 “अरे बाप रे. यातल्या बऱ्याचशा वेगवेगळ्या घटना माहीत होत्या, पण यामागे सूत्रधार कार्बन फुटप्रिंट आहे, हे माहीत नव्हतं. पण मग या सगळ्यापासून वाचण्यासाठी उपाय काय ?” एखाद्या ऋषी मुनींनी शाप दिला, की ज्या अजीजीने उ:शाप मागितला जातो, तद्वत मी विचारता झालो.

“बाबा, उद्योगधंदे असोत किंवा तुम्हीआम्ही असोत, कार्बन फुट प्रिंट कमी करण्याचे काही मार्ग कॉमनच आहेत.

कमी इंधन वापरणारी यंत्रसामुग्री वापरणे – घरी मिक्सर, फ्रीज, AC चांगल्या energy rating चे घेणे. कमी ऊर्जा वापरणारे LED बल्ब वापरणे, कारखान्यांमध्ये शक्य असल्यास पवन ऊर्जा वापरणे, सौर ऊर्जेचा वापर करणे, single use plastic चा वापर टाळणे, घन कचरा व्यवस्थापन (solid waste management), rainwater harvesting या आणि अशा अनेक गोष्टी घर आणि उद्योगधंदे या दोन्ही पातळींवर अतिशय समर्थपणे राबवता येतील.

 विशेषत: व्यवसायांत, जेथे शक्य आहे तेथे कागदाचा वापर कमी करता येईल का हे तपासून पाहणे. एकट्या भारतीय रेल्वेने ऑनलाईन तिकिटे वापरायला सुरुवात केल्यावर रोजच्या रोज टनावारी कागदाची बचत होऊ लागली आहे. प्रत्यक्ष meetings घेण्याऐवजी जर online meeting घेतल्या, तर प्रवासासाठी देण्याचे कंपनीचे पैसेही वाचतील आणि इंधन जाळणे टाळता येईल.

आयएसओ १४००१ सारखी पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली राबविल्यानेही कार्बन फुटप्रिंट लक्षणीयरीत्या कमी करता येईल.” 

माझा चेहरा हळूहळू मी वर्गात बसल्यावर जसा बधीर होऊ लागायचा तसा होऊ लागतोय हे ध्यानात येताच चिरंजीवांनी चाणाक्षपणे चर्चाविषय गृहपातळीवर आणला.

“गरज नसताना विद्युत उपकरणे बंद ठेवणे, AC चे तापमान २६° किंवा त्याहून जास्त ठेवणे, गळक्या नळांची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय टाळणे या आणि अशा उपायांनी खर्चही कमी होतील आणि कार्बन फुटप्रिंटही. ” 

ही उदाहरणे माझ्या परिचयाची आणि आवाक्यातली होती, त्यामुळे मला ती चटदिशी समजली. “म्हणजे स्वार्थही साधला जाईल आणि परमार्थही, ” मी अनुमोदन दिले.

“Electric अथवा hybrid गाड्यांचा वापर करणे, शक्यतो सार्वजनिक परिवहन (public transport) चा वापर करणे, दोघा चौघांनी मिळून गाडीतून प्रवास करणे (carpooling), छोट्या अंतरासाठी शक्यतो पायीच जाणे, किंवा चारचाकी गाडीऐवजी दुचाकी वापरणे या सर्व गोष्टीही अवलंबता येतील. “

हा घाव जरा वर्मी लागला. “हो, म्हणजे, morning walkला मी उद्यानापर्यंत मोटारसायकलने जातो, ते उद्यापासून पायीच जात जाईन, ” मी कबूली दिली.

“आईच्या राज्यात असंही आपण पटकन कोणती वस्तू फेकून देत नाहीच म्हणा, ” माझ्या जबाबाकडे काणाडोळा करत चिरंजीवांनी ज्ञानामृत पाजणे सुरूच ठेवले, “जुन्या पँटच्या पिशव्या, जुन्या पिशव्यांची पायपुसणी असं recycling आपल्याकडे चालूच असतं, ” आई आजूबाजूला नाही याची खात्री करून घेत तो म्हणाला, मी मात्र चांगलाच कावराबावरा झालो. “टाकाऊतून टिकाऊ यानेही कार्बन उत्सर्ग कमी करण्यात मदत होते, ” त्याचं चालूच होतं.

“खरंतर, मांसाहार करण्याने कार्बन फुटप्रिंट खूप वाढतो. प्राण्यांचे १ किलो वजन वाढवण्यासाठी त्यांना ६-७ किलो अन्नधान्य खावे लागते. त्यामुळे चिकन मटणापेक्षा शाकाहार केल्याने निसर्गाला कमी त्रास होईल.

जसं ज्यायोगे कार्बन उत्सर्जन वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, तसंच ज्या उपायांनी निर्माण झालेला कार्बन शोषला जाईल ते उपाय केले पाहिजे. सगळ्यात सोप्पं म्हणजे खच्चून बेदम झाडं लावली पाहिजेत. गेल्या वेळी म्हणे महाराष्ट्र सरकारने कोट्यवधी झाडं लावली होती. अशी झाडं खरंच लावली असतील, तर त्यांचे संगोपन केलं गेलं पाहिजे. ही वृक्षवल्लीच तयार झालेला कार्बन डायऑक्साइड वापरेल आणि कार्बन फुटप्रिंट कमी करेल.

फिलिपाईन्स सरकारने २०१९ सालापासूनच विद्यार्थ्यांना पदवी मिळवायची असेल तर दहा झाडे लावणे आणि त्यांची निगा राखणे अनिवार्य केले आहे. दिल्ली विद्यापीठानेही अशा प्रकारचा उपक्रम २०२१ पासून सुरु केला आहे. राजस्थानमध्ये पिपलांत्री गावाच्या परिसरात प्रत्येक मुलीच्या जन्मानंतर ग्रामस्थ १११ झाडे लावतात. ही आणि अशी उदाहरणे आपल्यासाठी आशेचा किरण आहेत.

कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय, तो कमी का व कसा केला पाहिजे याविषयी जनजागृती केली पाहिजे, ” इतकं सगळं बोलून चिरंजीव श्वास घेण्यासाठी थांबले.

मी आता त्याच्याकडे नव्या आदराने पाहू लागलो होतो. आपण समजतो तशी ही नवी पिढी अगदीच वाया गेलेली नाही. सामाजिक विषयांची त्यांना जाणीवही आहे, भानही आहे, आणि त्याविषयी ते कृतीशीलरीत्या जागरूकही आहेत, हे पाहून मी निश्चिंत झालो आणि गाडी, AC आणि अन्नाची नासाडी याविषयी शेजारच्या काकांचे बौद्धिक घ्यायला ताबडतोब निघालो.

(मी एखाद्या गोष्टीचे पैसे भरले आहेत, मग मी त्या गोष्टीचे काय वाट्टेल ते करेन – असा एक उद्दाम मतप्रवाह हल्ली आढळतो. मग यातूनच लग्न कार्यात अथवा हॉटेलांत ताटात भरपूर अन्नाची नासाडी करणे, भांड्यातील अथवा बाटलीतील थोडेसेच पाणी पिऊन बाकीचे फेकून देणे असे प्रकार सर्रास दिसतात.

माझ्या एकट्याच्या अशा कृतीने काय फरक पडणार आहे असं लंगडं समर्थनही केलं जातं, पण आपल्या सर्वांच्या अशा एकत्रित कृतीचा परिणाम भयाकारी असतो.

गाडीच्या आरशावर लिहिले असते त्याप्रमाणे objects in the mirror are closer than they appear – आपण जर वेळीच जबाबदारपणे वागू लागलो नाही, तर आपली व सभोवतालच्या निसर्गाची अपरिमित हानी होईल, ही जाणीव राखली पाहिजे.)

— समाप्त —

© श्री मकरंद पिंपुटकर

चिंचवड

मो ८६९८०५३२१५   

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments