सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ शिक्षक दिनानिमित्त… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
५ सप्टेंबर — शिक्षक दिन !
.. हा दिवस सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस! हा आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो..
मी शिक्षिका म्हणून शाळेत नोकरी केली नसली तरी शिक्षण देण्याचे काम घरात राहून बरेच वर्ष केले. माझे वडील आयुष्यभर शिक्षण खात्यात नोकरी करत होते.. बदलीनिमित्ताने ते महाराष्ट्रभर
वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले होते. नांदेड जिल्ह्यातील अगदी लहानशा गावात असणाऱ्या सरकारी हायस्कूल वर हेडमास्टर म्हणूनही त्यांनी काम केले होते. ते खरे हाडाचे शिक्षक होते. एखादा विषय शिकवायचा म्हणजे जीव ओतून, अगदी मुळापर्यंत जाऊन शिकवणे!
त्यांचे स्वतःचे इंग्रजी खूप चांगले होते. ते घरी सुद्धा आम्हाला इंग्रजी शिकवत, पाठांतर करून घेत असत. आमच्या अभ्यासाकडे त्यांचे पूर्ण लक्ष होते. नोकरीनिमित्ताने ते मराठवाड्यात गेले आणि आम्ही मुले होस्टेलवर राहून आमचे शिक्षण पूर्ण केले. खरोखरच ते आम्हाला गुरु समान होते.
माझ्या लग्नानंतर मी सासरी आले. माझे मिस्टर मेडिकल ऑफिसर म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये काम करत होते. त्यामुळे मला नोकरीची गरज नव्हती आणि पहिली पाच वर्षे दोन मुलांच्या संगोपनात चालली होती. ज्यावेळी आम्ही सांगलीला बदली करून आलो, तेव्हा माझा मोठा मुलगा शाळेत बालवाडीत जाऊ लागला. तेव्हा माझी छोटी मुलगी तीन वर्षाची होती. तिला जवळपास बालवाडी नव्हती. त्याच वर्षी जून मध्ये माझे वडील माझ्याकडे आले होते. मी संसारात गुरफटून बाकी क्षेत्रात निष्क्रिय झाले होते. ते त्यांना बघवत नव्हते. ‘ अगं, तू एवढी शिकलीस, काहीतरी कर.. ‘ आणि त्याला निमित्त मिळाले की, छोटीला जवळ बालवाडी नाही, तेव्हा तू बालवाडी चालू कर’ असे त्यांच्या मनात आले आणि त्या दृष्टीने त्यांनी मला प्रोत्साहन दिले. माझ्यासाठी एक कॅटलॉग आणून दिला. “दुर्वांकुर” बालवाडी मी सुरू केली. प्रथम माझ्या बालवाडीत फक्त पाच मुले होती. वाढत वाढत ही संख्या 25 मुलांपर्यंत वाढली, पण त्यासाठी घर लहान होते. तरीही रोज बारा ते अडीच शाळा आणि ३ वाजेपर्यंत डबा खायला देणे आणि मुलांचे पालक आले की मुलांना सोडणे…. असा कार्यक्रम सुरू झाला होता. श्लोक, गाणी, नाच, गोष्टी सांगणे यात दोन-तीन तास कसे जात हे कळत नसे. खेळायला आमच्या घराचे अंगण पुरेसे होते. या बालवाडीमध्ये माझे मन रमले होते, पण नंतर असे झाले की माझ्या बालवाडीतील मुलांना दुसऱ्या शाळेत पहिलीत प्रवेश घेताना अडचण येऊ लागली, कारण माझी बालवाडी रजिस्टर्डं नव्हती. शेवटी हा बालवाडी प्रयोग मी थांबवला आणि क्लासेस घेण्यास सुरुवात केली.
आता माझी मुले थोडी मोठी झाली होती. त्यामुळे मी गणित आणि इंग्लिश चे क्लास सुरू केले. प्रथम प्रथम मलाच कॉन्फिडन्स वाटत नव्हता की, आपण पाचवी, सहावी पासूनचे विषय शिकवू शकू की नाही! तेव्हा शेवटी गुरु कोण होते तर माझेच वडील! त्यांनी मला प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, ‘तू सुरुवात तर कर, म्हणजे आपोआपच तुला क्लास घेणे कळू लागेल. इकडे सासर घरात ‘आमचे सगळे नीट करून मग उरलेल्या वेळेत तू काय ते कर’ असा दृष्टिकोन असल्याने मलाच थोडी तारेवरची कसरत करावी लागली. सकाळी लवकर उठून गडबडीने सर्व आवरून साडेआठ ते साडेदहा/ अकरा पर्यंतच्या वेळेत क्लास चालू ठेवायचा आणि दुपारी तीन ते पाच या वेळेत क्लास घ्यायचा. त्यातही वेगवेगळ्या वर्गाची, शाळेची मुले- मुली ॲडजस्ट करत राहायचे.. ही सगळी कसरत तेव्हा स्वेच्छेने केली. कारण पैसा मिळवणं हा हेतू आणि मोठी गरज नव्हतीच!
माझ्या मुलांबरोबरची मुले- मुली क्लासला येऊ लागली. नकळत मुलांचाही अभ्यास चांगला होऊ लागला. साधारणपणे पंधरा वर्षे मी वेगवेगळ्या वर्गांचे क्लास घेत होते.
त्या नंतर मुलांच्या काॅलेज शिक्षणाच्या काळात मला क्लास बंद करावे लागले. पण या काळात मनाला खूप समाधान मात्र मिळाले. अजूनही जुने विद्यार्थी- विद्यार्थिनी भेटले की” बाई” म्हणून हाक मारतात,
कधीतरी गुरुदक्षिणेची फुले मोबाईलवर देतात, तेव्हा आनंद वाटतो. ‘अरे, आपल्या नकळत हे विद्यादान थोडे तरी घडले आहे. आणि त्यातूनच काही मुले इंजिनियर, डॉक्टर, व्यावसायिक आणि विविध क्षेत्रात काम करत आहेत, हे पाहिले की मन आपोआपच भरून येते! खूप काही घडवले असे नाही, पण आपणही या शिकवण्याच्या ज्ञान यज्ञात छोटासाच स्फुल्लिंग पेटवू शकलो याचे मनाला समाधान मिळते, हे तर खरेच! पण या सगळ्याच्या मुळाशी माझे वडील माझे गुरु होते, या भावनेने मन भरून येते !
त्या वडिलांच्या स्मृतीला मी आज वंदन करते !
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈