डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ श्रावणसरी… – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

या महिन्यात बरेच सण येऊन गेले नागपंचमी पतेती, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जयंती, दहीहंडी… वगैरे वगैरे… ! परंतु माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सण म्हणजे 15 ऑगस्ट ! 

आयुष्याच्या सुरुवातीला भेटलेल्या भीक मागणाऱ्या आजोबांनी मला मदत केली होती, यानंतर मी आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करत होतो, परंतु या आजोबांसाठी किंवा ज्या समाजाने मला त्यावेळी मदत केली, त्यांच्यासाठी मी काहीच करू शकलो नाही आणि आता त्यांच्यासाठी काहीतरी करावे या भावनेने ; 15 ऑगस्ट 2015 रोजी मी आंतरराष्ट्रीय संस्थेचे राजीनामा देऊन रस्त्यावर आलो.

आज नवव्या वर्षातून दहाव्या वर्षात आम्ही पदार्पण करणार आहोत. मधल्या काळात ज्या घटना घडल्या त्या विषयी 15 ऑगस्ट माझाही स्वातंत्र्य दिन या लेखात स्वतंत्रपणे सर्व काही लिहिले आहे. याचा ऑडिओ मी काही दिवसात आपणास पाठवून देईन.

या नऊ वर्षात 3000 पेक्षाही जास्त स्थानिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

माझ्या कामावर आणि माझ्यावर लोकांनी इतकं भरभरून प्रेम केलं, आशीर्वाद दिले आणि स्तुती केली… ती क्वचितच एखाद्या माणसाला त्याच्या जिवंतपणी मिळते ! 

हा भाग्यवान मीच आहे… !!!

पण गेल्या नऊ वर्षात मात्र एक शिकलो… स्तुती ही सोन्याच्या अलंकारासारखी असते… अंगभर घातलेले सोन्याचे दागिने एखाद्या सण समारंभात ठराविक वेळी छान दिसतात….

पण ते कितीही छान दिसले आणि मौल्यवान असले; तरी रात्री झोपण्याअगोदर मात्र हे दागिने उतरून ठेवावे लागतात… नाहीतर ते टोचतात… बोचतात !….. स्तुतीचंही तसंच, एखाद्या समारंभात “स्तुती अलंकार” तेवढ्यापुरते घालून मिरवायचे असतातच ; परंतु एका क्षणी ते स्वतःच उतरून सुद्धा ठेवायचे असतात… नाहीतर ते आपल्यालाच टोचतात आणि बोचतात सुद्धा.

सतत हे स्तुती “अलंकार” घालून फिरलं की त्याचा “अहंकार” निर्माण व्हायला सुध्दा वेळ लागत नाही.

आणि मग हा “स्तुती अहंकार”, अलंकार न राहता, आपल्यालाच टोचायला आणि बोचायला लागतो…

तेव्हा तो योग्य वेळी काढणं हेच बरं… ! 

असो…. ! 

तर, जो समाज आपल्याला मदत करत आहे, त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करावे, त्यांनी दिलेल्या मदतीतून आपण काय दिवे लावले, हे त्यांनाही कळवावे, आपण योग्य रस्त्यावर आहोत का, हे पडताळून पाहावे, चुकत असेन तर सल्ले घ्यावे, आपल्याला जे समाधान मिळत आहे ते सर्वांना थोडेसे वाटावे… गेली नऊ वर्षे दर महिन्यात आपल्याला “लेखाजोखा” सादर करण्याचा फक्त हाच हेतू असतो !

… तर, ऑगस्ट महिना नुकताच सुरू झाला आणि आषाढातली “अमावस्या” समोर आली.

अनेकांची आयुष्यं सुद्धा अशीच असतात. आत्ता कुठे आयुष्य सुरू झालं म्हणता म्हणता, ” भाकरीचा चंद्र “ कुठेतरी हरवून जातो…. काळोख्या त्या रात्रीत भुकेल्या पोटी चाचपडत बसण्याशिवाय दुसरा मग त्यांना कोणताही पर्याय नसतो.

… कोणाचाही आधार नसलेल्या, उजेड हरवून बसलेल्या तीन ताई… यांना या महिन्यात हातगाड्या घेऊन दिल्या, व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल दिले.

… जिच्या डोळ्यातलाच सूर्य हरवला आहे… अशा अंध ताईला रक्षाबंधनाच्या अगोदर राख्या विकायला दिल्या.

… श्वास चालू आहेत म्हणून जिवंत म्हणायचे… असा एक जण रस्त्याकडेला एक्सीडेंट होऊन पडून होता, मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून त्याच्यावर उपचार केले, पूर्ण बरा झाला. निराधारांसाठी चालत असलेल्या एका वृद्धाश्रमामध्ये “सेवक” म्हणून त्याला रुजू करून दिला आहे. वृद्ध निराधार आजी आजोबांची सेवा करत स्वतःचं पोट पाणी आता तो सन्मानाने भरेल.

… अशाच एका मृत म्हणून घोषित झालेल्या युवकाला आपण उचलून आणले… ऍडमिट केले… आमच्या या प्रयत्नाला आशीर्वाद म्हणून निसर्गाने त्याच्यामध्ये “प्राण फुंकले”… पूर्णपणे खडखडीत बरा होऊन, आज तो एका चांगल्या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करत आहे…

अशा वरील सहा जणांना, या महिन्यात व्यवसाय टाकून दिले आहेत / नोकरी मिळवून दिली आहे, ते आता प्रतिष्ठेने जगू लागले आहेत… ! आपण प्राण कोणाला देऊ शकत नाही; परंतु भीक देणे बंद करून एखाद्याला पायावर उभं राहण्यासाठी मदत करून, प्रतिष्ठा नक्की देऊ शकतो… ! 

प्रतिष्ठा नसेल; तर प्राण काय महत्त्वाचे ? 

अमावस्या सरली म्हणता म्हणता, पतेतीची पहाट उगवली…. पारशी नववर्षाचा आदला दिवस म्हणजे “पतेती”… ! 

पतेती म्हणजे “पश्चात्तापाचा दिवस”… ! 

पतेती म्हणजे केलेल्या चुका मान्य करून “कबुलीजबाब” देण्याचा दिवस… !!

पतेती म्हणजे आत्मनिरीक्षणाचा दिवस… !!! 

शेपूट लपवून, माणूस असल्याचे ढोंग करत समाजात फिरणारी अनेक माकडं मला भेटतात. आपल्या आई-वडिलांना रस्त्यावर सोडून, या फांदीवरून त्या फांदीवर कोलांट उड्या मारत स्वतः मस्त मजेत जगत असतात…. या माकडांनी, अशा रस्त्यावर सोडलेल्या वृद्ध आई-बाबांना आम्ही रस्त्यावरच आंघोळ घालतो, नवीन वस्त्र देतो आणि एखाद्या वृद्धाश्रमामध्ये त्यांना दाखल करतो. जेव्हा या आई-बाबांना आम्ही रस्त्यात आंघोळी घालतो; त्यावेळी आता आम्हाला कुठेही “अभिषेक” करण्याची गरज उरली; असं मला वाटत नाही… ! आमचा अभिषेक तोच… आमची पूजा तीच… ! 

… अशा 75 आई बाबांना आजपर्यंत सुरक्षित स्थळी ठेवले आहे. आयुष्यात अशा 75 पूजा मांडल्या… ! 

जे जगले त्यांचे सून आणि मुलगा झालो…

जे गेले त्यांचे सून आणि मुलगा होऊन अंत्यसंस्कार केले… !

. अशा 75 आई-बाबांना आपण उचलून कुशीत घेऊ शकलो, याचे भाग्य समजू ? 

आनंद मानू ? हे सर्व करण्याची मला संधी मिळाली, यात समाधान मानून हसू ? ….

… की; सुकलेल्या पालापाचोळ्यासारखे कितीतरी वृद्ध आई-वडील अजूनही रस्त्यावर पडून आहेत, याचे दुःख मानू ? 

… कधीतरी सुगंधी असणारे, धगधगते आई बापाचे हे जीव, कापरासारखे वाऱ्याबरोबर उडून जातात… परत कधीही न येण्यासाठी… ! त्यांनी आयुष्यात पाहिलेली स्वप्नं मग, चिते मधल्या अग्नीत जळूनतरी जातात किंवा कायमची जमिनीत दफन तरी होतात… !!! धुरासारखी जळून गेलेली स्वप्नं, मग आकाशातले ढग होतात….. त्या आई-बाबांचे अश्रू आकाशातून कधीतरी असह्य होऊन, धो धो कोसळू लागतात…

आणि घराच्या खिडकीतून आपण डोकावून, कॉफीचा मग हातात घेऊन म्हणतो, ‘ यंदाचा पाऊस जरा जास्तच आहे नाही का ‘… ???

हा… हा.. पाऊस नसतो हो… ! 

पूर नदीला येतंच नाही…. हा पूर असतो गेलेल्या आई बापाच्या डोळ्यातला… ! 

… ज्यांनी आपल्या आई-वडिलांना असं रस्त्यावर सोडलं आहे, त्यांच्या आयुष्यात येईल का हा पश्चातापाचा दिवस ? … करतील का ते कधी आत्मपरीक्षण ?? … देतील का ते कधी कबुली जबाब स्वतःला ??? 

… येईल का त्यांच्याही आयुष्यात “पतेती”… ???

मी त्या नववर्षाची वाट पाहत आहे… !!!

– क्रमशः भाग पहिला 

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments